Friday, April 26, 2024
Homeब्लॉगविशेष लेख : मुंबईविरुद्ध षडयंत्र?

विशेष लेख : मुंबईविरुद्ध षडयंत्र?

मुंबई |  किशोर आपटे

कोरोना संकटाने आपले अक्षरश: डोळे उघडले आहेत, आता सावरलो नाही तर कधीच नाही हे समजून घेण्याची हीच ती वेळ नाही का? सध्याच्या काळात ‘कोरोना’च्या विळख्यात राज्य होरपळताना दिसत आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसत असताना ज्यांनी यावर अंकुश लावायचा प्रयत्न करायला हवा तो विरोधी पक्ष वेगळ्याच मनोभूमिकेत दिसत आहे. विरोधी पक्षांची सावली होऊन नैतिक आणि योग्य भूमिकेच्या पाठीशी उभे राहण्याची अपेक्षा असणारी माध्यमे लुळी पांगळी झाली आहेत का? त्यांच्यासमोर जनसामान्यांच्या हालापेष्टा आणि विध्वंस दिसत असताना पत्रकारिता मात्र त्यातील उणिवांवर बोट ठेवायच्या मनःस्थितीत नाही. आपल्याच अस्तित्वासाठी अखेरचे हुंदके देताना दिसत आहे.

- Advertisement -

मुंबई पुण्यात आणि मोठ्या महानगरांतून रोजगाराच्या आशेने आलेला व मोलमजुरी करीत झोपडपट्ट्यांत राहून नरकयातना सहन करीत जगणारा कष्टकरी समाज आता रोजगार नाही, त्यामुळे उपासमार नको म्हणून जीवाच्या भितीने मुंबई आणि महानगरांतून ‘कोरोना’च्या भितीने गावाकडे पलायन करीत आहे. सरकारच्या आवाहनांना आणि नेत्यांच्या भूलथापांना आता कुणी बधणार नाही अशी स्थिती आहे. कोकणातील चाकरमानी, पश्चिम महाराष्ट्रातून आलेला हमाल माथाडी, उत्तर प्रदेश, बिहार, बंगला, आंध्र, राजस्थानवरून आलेला मजदूर असे सारेच आता जीवाच्या मुंबईतून जीवाच्या आकांताने गावाकडे निघाले आहेत.

येथे जगण्याचे साधन नाही आणि वरून ‘कोरोना’ची दहशत त्यात सरकारच्या टाळेबंदीचा जाच नको म्हणून या कष्टक-यांनी तेथे जाण्याची साधने नसतानाही जीव धोक्यात घालून जगण्यासाठी गावाकडे धूम ठोकली आहे. पावसाच्या चार महिन्यांत शेतीवर काम करू व चार पैसे मिळतील त्यात जीव वाचवून राहू, अशी यांची भूमिका आहे.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या हिरक महोत्सवी वर्षातच मुंबईचे व्यापारी महत्व कमी करण्याचे प्रयत्न केंद्रात बसलेल्या नेत्यांनी चालवले आहेत. राज्यातील त्यांच्या पक्षाचे घरभेदी नेते त्यांना साथ देत आहेत. कोरोनानिमित्ताने मुंबई कायमची बंद पाडण्याचे षडयंत्र तर रचले जात नाही ना? अशी शंका यावी अशा घटना घडत आहेत. ‘मराठी माणसा जागा राहा, रात्र वै-यांची आणि घरभेद्यांची आहे!’ अशी शाहीर अमर शेखांसारखी साद घालण्याची ही वेळ नाहीना? मुंबई शहर ही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा आहे. २४ तास कष्ट करणारा इथला कष्टकरी समाज कोरोनाच्या बहाण्याने घाबरवून त्याला येथून कायमचा पळवून लावला तर नव्याने जागतिक व्यापार केंद्र अन्यत्र हलवताना सोपे व्हावे, असा शकुनीकावा तर साधला जात नाही ना?

नव्याने वसवल्या जाणा-या जागतिक व्यापार शहरांमध्ये हा कष्टकरी नेऊन मग राबवता येणे सहज शक्य होणार आहे, असे षडयंत्र आहे का?. संपूर्ण व्यापार उद्योग अडचणीत असताना अदानी आणि अंबानी मात्र कोट्यावधीच्या नव्या गुंतवणुका करीत अधिक श्रीमंत होताना ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ या आपल्या व्यापारी वृत्तीचा परिचय देत आहेत. भविष्यात नव्या मनूचा पाया घालताना दिसत आहेत.

देशाच्या उद्योग अर्थकारणाच्या नकाशावरून मुंबईचे महत्व पुसून टाकायची संधी ‘कोरोना’ संकटाच्या निमित्ताने आली असल्याने त्यांनी ती साधली नाही तरच नवल! मुंबई शेअर बाजारात या मंदीच्या महोलातही ज्यांचे समभाग गगनाकडे झेपावताना दिसत आहेत तेच लोक गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारच्या केंद्रस्थानी कार्यरत असल्याचे दिसत आहेत, असे निरीक्षण याबाबत जाणकार व्यक्त करताना आहेत. महाराष्ट्र सरकारच्या हक्काचा हजारो कोटी रूपयांचा करांचा वाटा न देता तो थकवून ठेवायचा आणि या सरकारला गुडघ्यावर आणायचे, दुसरीकडे उद्योग व्यापाराची बलस्थाने व श्रमशक्तीला देशोधडी लावायचे आणि राजकीयदृष्ट्या देखील येथील सरकारच्या कामात अडथळे आणून त्यांना नामोहरम करायचे, असा त्रिसूत्री कार्यक्रम महाराष्ट्राच्या मारेक-यांनी आखला असल्याचे भीषण संकेत मिळत आहेत.

मुंबई महाराष्ट्रापासून आणि देशापासून तोडायचा हा डाव साधला जात तर नाही ना? ‘मी हात वर केला तर महाराष्ट्र पेटून उठेल’ असे म्हणणा-या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या हाती राज्याचे नेतृत्व असताना हे षडयंत्र रचले आणि अंमलात आणले जात आहे का? त्यामुळे मराठीपणाचा कणा शाबूत ठेवायचा असेल व मुंबईला पंगू बनवायचे नसेल तर ‘उठ मराठ्या जागा राहा, रात्र वै-यांची आणि घरभेद्यांची आहे’ हे वेळी ओळखायला हवे.

संस्कार जागवू या!

सध्या ‘कोरोना’निमित्ताने आम्हाला सोशल डिस्टन्सिंग आणि विषाणूला दूर ठेवायची पथ्ये पाळावी लागणार, असे सांगितले जात आहे. कारण कोरोना अजून काही वर्षे सोबत राहणार आहे. तोवर आपण घरात बसून राहून शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘घरात बसा सुरक्षित राहा’ किंवा ‘देशभक्तीचा हा संदेश नवा, घरात राहा’ हा वेडेपणा आहे हे वास्तव म्हणून हळूहळू मान्य करावे लागत आहे. ‘कोरोना’ला बाजूला ठेवून व टाळून आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत कसे करायचे, याचे आत्मभान आपल्याला येऊ लागले आहे. त्यासाठी कठीण काहीच नाही. भारतीय संस्कृतीचे पालन आपण वेगळ्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून करू लागलो तरी ‘कोरोना’ला टाळून आपण आपले आर्थिक नुकसान टाळून सहज जीवन जगू शकणार आहोत. आपल्या संस्कारांत पूर्वापार काही गोष्टी चालीरिती म्हणून पाळल्या गेल्या. आजही पाळल्या जात आहेत. आता आधिक डोळसपणाने त्यांचे पालन करून भीतीमुक्त वातावरणात जगू शकतो.

अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर आंघोळीशिवाय घरात इथे-तिथे शिवायची किंवा काही करायची परवानगी पूर्वी नसे. यामागचे सहज कारण असे की, बाहेरून नकळत आपण संसर्ग घेऊन आलो असू तर तो घरात पसरू नये. आता आपल्याला हेच जुने संस्कार नव्या ढंगात आचरणात आणावे लागतील. आपल्याकडे चप्पल, पादत्राणे घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश केला जातो तो कशासाठी?

जंतूसंसर्ग टाळण्यासाठीच! हे आता आपल्याला कटाक्षाने पाळायचे आहे! घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची? (यालाच आज ‘होम क्वारंटाईन’ म्हटले जात आहे का?) कारण पूर्वीच्या काळी मृत्यूसमयी माणसाला काही ना काही आजार असायचा. त्यातून संसर्ग होण्याची शक्यता पूर्वीपासून आजही कायम आहे. मृत शरिरातून झालेला संसर्ग टाळण्यासाठी इतरांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी इतर लोकांपासून १२ दिवस अंतर ठेवावे.

याला सुतक म्हणतात. काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे. याला ‘सुयर’ म्हणतात. या संकल्पना जुनाट म्हणून आपण त्यागल्या होत्या त्याच आता कामाच्या झाल्या नाहीत का? बाळंतिणीच्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे. यामागे चालीरिताचा पगडा होता आणि संस्कार म्हणून ते करण्याचा आग्रह होता.

मात्र त्यामागचा हेतू नवजात बालकाची प्रतिकारक शक्ती कमी असल्याने बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे, निर्जंतूकांचा वापर करणे हे केले जात असावे. हळद तेलाची मालिश जसे आपण आता करीत आहोत. मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२ व्या नंतर घरात साफसफाई का करतात? या सा-या जुन्या वाटणा-या प्रथा-परंपरा का होत्या याचे गमक आता आपल्या लक्षात येण्याची वेळ आली आहे.

आपल्या देशी व्यंजनांमध्ये हळद आणि मसालेयुक्त अन्न शरिराच्या प्रतिकार शक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो? आता युरोपात कोरोना रूग्णाना लोक हळद दूध प्यायला सांगत आहेत. आपण लहान मुलांना, अशक्त रूग्णांना तसेच निरोगी तरुणांना नेहमी सांगत असतो. यात फरक एवढाच की ते त्याला टरमरिक लॅटी’ म्हणतात. आता त्यांच्या शहरातील कोणत्याही कॉफी शॉपवर जाऊन टरमरिक लॅटी मागवून तर बघा.

भारतीय घराघरात उद, कापूर जाळणे, धूप फिरवणे यामागे काय कारण असावे? ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल? उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा संसर्ग होण्याच्या शक्यतेचा असतो. या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते? आपल्याकडे सामान्यत: मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करायची पद्धत का रूढ आहे? गुगल करा… cremate or bury”. अनेक संशोधने मिळतील. ‘कोरोना’नंतर चीन आणि जगभर मृतदेहांना पुरण्याऐवजी जाळण्याचे आदेश दिले जात आहेत.

जो आपल्याकडे अंत्यसंस्कार समजला जातो. जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे. असे का? याचा कधी विचार केला आहे का? भारतात आपण प्राण्यांत देवतांना पाहतो. झाडे, दगड, नद्या, पर्वतांना पुजतो. हा पर्यावरणाचा समतोल ठेवण्याचा संस्कार आहे. जगाने ‘इको-फ्रेंडली व्हा’ असे आता आपल्याला शिकवणे म्हणजे मोठा विनोद नाही का?

जागतिक आरोग्य संघटनेने आता जगभर कोणते प्राणी खावेत आणि खावू नयेत याची नियमावली करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आजवर कोणत्याही विषाणूचा जन्म भारतातून झाला असे ऐकिवात का नाही? कारण इकडे मांसाहाराला मर्यादा आहेत. नियम आहेत. ते पाळले जातात. उठसूठ हात मिळवणे, आलिंगने देणे असे प्रकार आपल्या संस्कारात नाहीत.

हात जोडून नमस्कार करायची पद्धत का आहे? भारतीय जीवन पद्धतींचे महत्व आज जगाला समजले आहे. आपल्याला ते समजवावे लागत आहे, या परते दुर्दैव ते कोणते? ‘तुझे आहे तुज पाशी’ अशी आपली स्थिती नाही का?

आपली संस्कृती हजारो वर्षांपासून टिकून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभवसंपन्न झाली आहे. आमची संस्कृती वैज्ञानिक आहे हे आता अनुभवातून शिकणे गरजेचे नाही का? स्वतःच्या संस्कृतीला कमी समजून ज्या मार्गाने आपण जात होतो त्यातले धोके समजल्यानंतर योग्य ती विचारसरणी ‘कोरोना’ने आपल्याला शिकवली नाही का? याचा विचार आणि पालन करून सुरक्षित राहू या! मग ‘कोरोना’ला घाबरून घरात बसण्याची गरज उरणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या