Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

भाजपची थंडा करके खावो निती सेनेच्या अंगलट येण्याची शक्यता!; सेनेला बाजूला ठेवून अल्पमताचे सरकार तयार करण्याचा भाजपचा डाव!

Share

मुंबई | किशोर आपटे

राज्यात ९० टक्के तालुक्यात अतिवृष्टीने शेतक-यांच्या तोंडचा घास गेला आहे. राज्य संकटात आहे. नुकत्याच झालेल्या मतदानातून भाजप बद्दल जनतेच्या मनात रोष आहे त्यामुळे अश्या वातावरणात भाजप सत्तेसाठी हापापलेली नाही असा संदेश जनतेमध्ये जाणे आवश्यक असल्याने तुर्तास सत्तास्थापनेची घाई न करण्याचा सल्ला केंद्रीय नेते आणि रा स्व संघाने दिल्याची विश्वसनीय माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे. शिवसेनेच्या राजकीय हट्टाला किंमत द्यायची नाही आणि सत्ता स्थापनेसाठी त्यांच्या नाकदु-या काढत बसायचे नाही असे वरिष्ठ पातळीवर ठरले असून सेनेचा राग शांत झाल्यावर त्याच्या कडून काय प्रस्ताव येतो याची वाट पहा असे देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आले आहे. असे या सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री पदासह महत्वाची खाती सध्याच शिवसेनेला द्यायची नाहीत आणि कोणत्याही प्रकारे नमती भुमिका घ्यायची नाही असे केंद्रीय नेत्यानी ठरविले आहे. कारण राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाले तरी भाजपाला त्यातून फारसा फरक पडणार नाही. कारण केंद्रीय गृहमंत्र्याच्या आदेशाने राज्यपाल अश्या काळात कारभार पाहतात. त्यामुळे राष्ट्रपती राजवट आल्यास तोटा विरोधक आणि शिवसेनेचा होणार आहे, कारण शहा थेट राज्याच्या कारभारात दैनंदीन हस्तक्षेप करणार आहेत.

शिवसेनेच्या  अवास्तव मागण्या मान्य केल्या नाहीत तर सध्याच्या जनादेशाचा आदर करत काळजीवाहक सरकार म्हणून राज्यपालांच्या आदेशाने काही दिवस फडणवीस यांना कारभार पाहता येणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला प्राधान्य देत शिवसेनेल भिक न घालता सडवण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे. मध्यस्थांच्या माध्यमातून ९ तारखेपर्यंत सेनेकडून काही योग्य प्रस्ताव येत असेल तर जास्तीच्या आणि महत्वाच्या खात्यांवर सेनेची बोळवण करत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न देखील स्थानिक नेत्यांच्या पातळीवर भाजप कडून केला जाणार आहे.

त्यामुळे सेनेच्या दबावतंत्राचा बुमरँग होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांची अक्रस्ताळी भुमिका शिवसेनेत महत्वाच्या अनेक नेत्यांना मान्य नाही कारण राऊत आगंतूकपणे या सा-या प्रक्रीयेत शिरले आणि त्यांनी सारी सूत्रे स्वत:कडे घेतली आहेत. बाहेरून सेनेत सत्तेसाठी आलेल्या आयारामांना, अपक्षांनाही ही भुमिका फारकाळ मानवणार नाही आणि त्यांची घुसमट झाल्यावर ते आपसून नमते घेतील अन्यथा सेनेत बंडाळीची स्थिती निर्माण होवू शकेल असे या जाणकारांचे मत आहे.

फार दिवस नव्याने आमदार झालेल्यांना ठेवता येणार नाही या शिवाय मुख्यमंत्री पद भाजपाने दिले तरी ते कुणाला मिळणार यावरूनही सेनेत अंतर्गत विवाद आहेत असे या जाणकारांचे मत आहे. आदित्य ठाकरे नुकतेच आमदार झाले आहेत, उध्दव स्वत: ही जबाबदारी घेण्यास तयार नाहीत अश्या स्थितीत सेनेतल्या शिंदे, कदम, यांच्यासह किमान अर्धा डझन नेत्यांना मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडली आहेत.

त्यामुळे राऊत या स्पर्धेत आले आहेत असे या नेत्याने सांगितले. शरद पवार आणि केंद्रीय नेत्यांच्या संबंधाच्या बळावर राउत अडिच वर्षासाठी मुख्यमंत्री होवू शकतात मात्र हीच गोष्ट सेनेतील अन्य नेत्यांच्या पचनी पडणार नसल्याने वेळ घालविल्यास सेनेतील अंतर्गत धुसफूस आकार घेवू शकते आणि नंतर शांतपणे भाजपला हवी तशी स्थिती मिळून सत्तास्थापना करता येवू शकेल. राष्ट्रपती राजवट आल्यास सहा महिन्यात विरोधकांवर दबाव तंत्राच्या अनेक युकत्या अमीत शहा यांच्या हाती येतील त्यामुळे भाजपकडून सत्तास्थापनेची घाई केली जाणार नसल्याचे या सूत्राचे मत आहे.

‘शेवटच्या एक तासात काहीही होऊ शकते’, असे शरद पवार यांनी त्यामुळेच म्हटले आहे.  पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेत ‘१०५ आकडा ज्यांचा आहे त्यांनी सरकार बनवावे’, असे राऊत म्हणाले आहेत. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर सत्ता स्थापनेचा गुंता पुन्हा वाढला आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.

दरम्यान, भाजपने सत्तास्थापना केल्यास विश्वास दर्शक ठरावास कॉंग्रेस सदस्याना अनुपस्थित ठेवून भाजपला पळवाट देतानाच कॉंग्रेसला संभाव्य फुटीपासून वाचविण्याची खेळी अहमद पटेल आणि राज्यातील कॉंग्रेस नेत्यानी खेऴल्याचे बोल ले जाते.

त्यामुळे भाजपला उपकृत करतानाच कॉंग्रेसला केंद्रातील आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या अडचणी सोडवून घेता येतील तसेच राज्यात पवारांचे प्रस्थ कमी करतानाच शिवसेनेच्या शिडातील हवा देखील काढता येणार आहे.

आपली पुरोगामी विचारांचा पक्ष ही प्रतिमा जपतानाच राज्यात भाजपला अल्पमताचे सरकार तारून नेण्यासाठी पड द्या आडून मदत केल्याचे पूण्य कॉंग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे भविष्यातील त्यांच्या नेत्यांचा त्रासही कमी होवू शकेल अशी माहिती या सूत्रानी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!