Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शासकीय विभागातील ७२ हजार रिक्त पदांची भरती होणार

Share

नाशिक । प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांपासून नोकरीच्या शोधात असणार्‍या राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलिस, महसूलसह अन्य शासकीय विभागांतील जवळपास 72 हजार रिक्त जागांच्या भरतीला पुढील वर्षात सुरुवात होणार असल्याची शक्यता असून मंत्रालयातील महापरीक्षा कक्षाकडून त्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून महाभरती होणार असे सातत्याने सांगितले जात होते. मात्र नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने तरुण बेरोजगारांमध्ये नाराजीचा सूर होता. राज्यातील सत्ता बदलानंतर महापरीक्षा विभागाकडून शासकीय विभागांकडील रिक्त जागांची आकडेवारी मागवण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांत ही भरतीप्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा विश्वास महापरीक्षा सेलच्या सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. महापरीक्षा कक्षाचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्या सूचनेनुसार पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षक व परिचर, डॉक्टरसह अन्य रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मंडळामधील रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया देखील पुढील महिन्यात राबवली जाऊ शकते. शासकीय कार्यालयांकडून मागवलेल्या रिक्त पदांच्या माहितीनुसार तब्बल 72 हजार जागांची भरती केली जाऊ शकते. यासंदर्भात दि. 15 डिसेंबरनंतर सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. जून 2020 पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बहुतांश विभागांतील रिक्त पदांची भरती एकाच वेळी केली जाणार आहे.

डिसेंबर अखेरीस पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया होईल असे नियोजन महापरीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे. नवीन सरकार स्थापन झाल्याने या प्रक्रियेला गती येईल असा विश्वास महापरीक्षा कक्षाच्या सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.

पशुसंवर्धनसाठी दिड लाख अर्ज
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडील सुमारे आठ हजार रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी महाभरती पोर्टलवर अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी इच्छुक असणार्‍या तब्बल दिड लाख उमेदवारांनी पोर्टलवर अर्ज दाखल केले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!