Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

गणेशोत्सवासाठी २२०० जादा बसेस सोडणार : परिवहनमंत्री दिवाकर रावते

Share

मुंबई : गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व महाराष्ट्रातील जनता यांचे एक अतूट नाते आहे. यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २२०० जादा बसेसची सोय केली आहे. या सेवेचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

यंदा लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने २२०० बसेस मुंबईच्या गणेशोत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार असून, येत्या २७ जुलै (एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे,यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी म्हणजे २७ जुलै पासून करता येणार आहे.

२० जुलै पासून ग्रुप बुकींगला सुरूवात

गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात. मुंबईतल्या विविध उपनगरातील लोक एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा सलग असणाऱ्या गावात जाण्यासाठी एसटीची बसआरक्षित करतात. ही बस त्यांना सोयीची ठरते.

गेली कित्येक वर्ष एसटी या चाकरमान्यांना त्यांच्या मुंबईतल्या घरापासून ते कोकणातील त्यांच्या वाडी वस्ती व गावापर्यंत सुखरूप आणि सुरक्षितपणे नेऊन सोडत आली आहे.अशा गट आरक्षणाला (ग्रुप बुकिंगला) २० जुलै पासून सुरुवात होत आहे. संबंधितांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!