बंधार्‍यांसाठी मुळा नदीत पाणी सोडा

0

पाणी आरक्षण कृती समितीचे आ. बाळासाहेब मुरकुटेंना निवेदन

नेवासा (प्रतिनिधी) – मुळाधरण 18 टीएमसीवर भरले असून सध्या आवकही चांगली असल्याने धरणातून मुळा नदीवरच्या बंधार्‍यांसाठी तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीच्यावतीने आमदार भानुदास मुरकुटे यांना देण्यात आले.
कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप व उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर यांनी निवेदनात म्हटले की, खरीप पिकांसाठी मुळा धरणाच्या डावा व उजवा कालव्यातून आवर्तन सुरू आहे. मुळाथडी परीसरात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर दडी मारल्यामुळे मुळाथडी परिसरातील पाण्याची परिस्थिती फारच बिकट होऊन विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी चिंताजनकरित्या खालावली आहे.
पिकांनाही सध्या पाण्याची अत्यंत गरज असून पशुधनाच्याही चारा-पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. आज ना उद्या बंधारे भरण्यासाठी पाणी सोडावेच लागणार असल्याने ते आताच सोडा म्हणजे शेतकर्‍यांचे ऊस, घास, कपाशी, मका आदी पिकांना त्याचा फायदा होऊन जनावरांचा चार्‍याबरोबरच शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी व्यक्त केली.
धरण उशाला कोरड घशाला अशा परिस्थितीमुळे बंधार्‍यासाठी पाणी न सोडल्यास पाटपाण्याचे आवर्तन बंद करण्यासाठी वेळ प्रसंगी चाक बंद आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीचे सदस्य पंढरीनाथ घावटे यांनी दिला. यावेळी जनार्दन साळुंके, विलास सैंदोरे, किशोर जंगले, सतीश जंगले, अण्णासाहेब बिडे, संपत गुडधे, नारायण आव्हाड, सुहास टेमक, संतोष पवार, सतीश फुलसौंदर, आदींसह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*