मुळा 35 टक्के भरले

0

भंडारदरा, निळवंडे, कुकडीत पाण्याची विक्रमी आवक

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाणलोटात पावसाचा जोर कायम असल्यामुळे मुळामध्ये पाण्याची विक्रमी आवक  सुरू आहे. काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत 11 हजार 587 क्युसेकने पाण्याची आवक मुळात सुरू होती.

त्यामुळे मुळा धरण 35 टक्के भरले आहे. भंडारदरा, निळवंडे, कुकडी पाणलोटात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ होऊ लागली आहे. भंडारदरा धरण 58.65 टक्के, निळवंडे 25.86 टक्के भरलेले आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंदावला आहे. परंतु नदी, नाले, ओढे, धबधबे वाहत असल्याने दारणा व इतर धरणांच्या पाणलोटात नवीन पाण्याची आवक सुरू होती. दारणात पाण्याची आवक घटल्याने गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला असून 7 हजार 378 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

गंगापूर धरणाचा साठा 72 टक्क्यांवर गेलेला आहे. त्यामुळे आज धरणातून विसर्ग सुटणार आहे. नांदूर मधमेश्‍वरमधून 22 हजार 384 क्युसेकचा विसर्ग सुरुच आहे. गोदावरीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जायकवाडीला ते पाणी पोहचले! – 
गोदावरीत 50 हजार क्युसेकने सोडलेला विसर्ग काल शनिवारी सकाळी 10.30 वाजता जायकवाडीच्या जलाशयात पोहचला. त्यामुळे काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत जायकवाडी जलाशयाचा पाणीसाठा 1 टक्क्यांनी वाढला होता. काल सायंकाळी 6 च्या आकडेवारीनुसार जायकवाडीत उपयुक्त साठा 396.378 दलघमी इतका होता म्हणजेच 13 हजार 996 दशलक्षघनफूट (14 टिएमसी) झाला होता. तर मृतसह एकूण साठा 40 टिएमसी इतका आहे. काल सायंकाळी जायकवाडी जलाशयात 30 हजार 166 क्युसेकने पाण्याची आवक गोदावरीतून होत होती. गोदावरीवरील वैजापूर तालुक्यातील नागमठाण सरिता मापन केंद्राजवळ 25 हजार 700 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. जायकवाडीत 18.25 टक्के उपयुक्त साठा झाला होता.

 

LEAVE A REPLY

*