Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुळाचा साठा 23000 दलघफू

Share

जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा 50 टक्क्यांवर, नगरचे संकट टळले

कोतूळ, अस्तगाव (वार्ताहर)-मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारपासून ओसरला. काल बुधवारीही पावसाचे प्रमाण कमी राहिले दिवसभरात कमी अधिक प्रमाणात श्रावण सरी झडत होत्या. पावसाचा जोर ओसरल्याने मुळा नदीचा प्रवाह कमी झाला आहे.मुळा धरणाकडे जाणारी आवक मंदावली आहे. सकाळी मुळा धरणाकडे 17 हजार 243 क्युसेकने आवक सुरू होती. दुपारी 12 हजार क्युसेकने तर सायंकाळी 12 हजार 486 क्युसेकने मुळा धरणाकडे आवक सुरू होती. आज या धरणातील पाणीसाठा 23000 दलघफूच्यापुढे सरकणार आहे.

दरम्यान जायकवाडी धरणातील जिवंत पाणीसाठा आज 50 टक्क्यांवर पोहचणार असल्याने नगर-नाशिक जिल्ह्याला द्यावे लागणार्‍या पाण्याचे संकट टळणार आहे. शिवाय नगर-नाशिक विरूध्द मराठवाडा यांच्यात होणार्‍या राजकारणही यंदा थंड राहण्याची चिन्हे आहेत. 26 टीएमसी क्षमतेचे नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे असणार्‍या मुळा धरणाचा पाणीसाठा आठ-दहा दिवसांत झपाट्याने वाढला. यावर्षी 18 टीएमसीपेक्षा अधिक नवीन पाणी जमा झाले. धरणाचा पाणीसाठा 22 हजार 436 दलघफू झाला असून धरण 86 टक्के भरले आहे. ,धरण पूर्ण भरण्याची आशा निर्माण झाल्याने मुळा धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याच्या हालचाली मुळा पाटबंधारे विभागाकडून सुरू केल्या आहेत.

मुळा नदीचे पाणलोटात अंबित, कुमशेत जानेवाडी, हरिश्चंद्रगड , कोतूळ परिसरात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाचे सातत्य असल्याने खरीप पिकांवर विपरीत परिणाम होऊन खरीप पिके हातातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अतिवृष्टीमुळे पीक हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यात रेडअलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तुफानी पाऊस कोसळणार आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे; खडकवासला धरणातून रात्री आठ वाजल्यापासून 35574 क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

नगर, नाशिकमध्ये सतर्कतेचा इशारा
येत्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने नाशिक व नगर जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टी झाल्यास गोदावरी व अन्य नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!