मुळा धरणग्रस्तांची आता ‘करो या मरो’ची भूमिका

0

26 ऑक्टोबरला नगर पाटबंधारे कार्यालयावर आंदोलन ः खेवरे

 

उंबरे (वार्ताहर) – ज्यांनी त्याग केला आणि त्याच त्यागावर मुळा धरणाची उभारणी झाली. मात्र, धरणग्रस्तांचे अनेक प्रश्‍न 40 वर्षांपासून अद्यापही प्रलंबित आहेत. धरणग्रस्तांना नोकर्‍या द्या, रिकाम्या हाताला काम द्या, पोटभर अन्न द्या, धरणग्रस्तांची हेळसांड थांबवा, या मागण्यांसाठी दि. 26 ऑक्टोबर रोजी नगर येथील पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिली.

 

 

राहुरी खुर्द येथील धर्माडी विश्रामगृहावर धरणग्रस्तांची बैठक शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आला. यावेळी धरणग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या 40 वर्षापासून धरणग्रस्तांच्या दोन पिढ्या अपेक्षांचे ओझे सांभाळताना बरबाद झाल्या. शासनासह शासकीय अधिकार्‍यांनी धरणग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने धरणग्रस्तांची मोठी हेळसांड सुरू आहे. धरणग्रस्तांचे सुमारे 400 हून अधिक तरूण बेरोजगार आहेत. रोजगारासाठी दारोदार जाऊन रोजगारीची याचना करीत आहेत. शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून धरणग्रस्तांची एक पिढी यापूर्वीच उद्धवस्त झाली आहे. आता दुसर्‍या पिढीचीही सहनशीलता संपल्याने धरणग्रस्त कुटुंबातील तरूणांनी ‘करो या मरो’ची भूमिका घेतली असल्याचे खेवरे यांनी स्पष्ट केले.

 

 

मुळा धरण प्रकल्पग्रस्तांना अधिनियम 1999 चे कलम 6 नुसार वर्ग ‘क’ व ‘ड’ च्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या धरणग्रस्तांना खास विशेष बाब म्हणून 50 टक्के सेवेत सामावून घेणे शक्य आहे. याबाबत शासकीय आदेशाची प्रत यापूर्वीच सुपूर्त केली आहे. मुंबई येथे दि. 8 जून 2015 रोजी धरणग्रस्त उपोषणाला बसले होते. दि. 9 जून 2015 रोजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण सोडण्यात आले. दि. 10 जून 2015 रोजी ना. गिरीश महाजन यांच्या दालनात याबाबत बैठक झाली. त्यात प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर समिती नेमून ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून योग्य ती कार्यवाही करून दोन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र, यावर आता 2 वर्ष उलटून गेले असून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्या समितीत धरणग्रस्तांचा एक प्रतिनिधी नेमावा, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे. त्यावर निर्णय घेऊन धरणग्रस्तांना न्याय देण्याची मागणी खेवरे यांनी केली आहे.

 

 

बैठकीस अण्णासाहेब बाचकर, ठकाजी बाचकर, गुजीनाथ सोडनर, दगडू बर्डे, गोरक्षनाथ तमनर, सोपान वडितके, पोपट शिरसाठ, संतोष पानसंबळ, विकास गायके, रंभा अडसुरे, दत्ता कळमकर, चंद्रकांत कुलथे, नितेश शेलार, उत्तम गुलदगड, रामदास खेमनर, मच्छिंद्र तमनर, नितीन तमनर, गंगाधर तमनर, संतोष पवार, अशोक काळे, विजय अडसुरे, शरद भुजाडी, दादासाहेब शिंदे, अजय बाचकर, शशिकांत शेंडगे, बापूसाहेब बाचकर, आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*