‘मुळा’100 टक्के

0

मुळा नदीपात्रात 542 क्युसेसचा विसर्ग

राहुरी (प्रतिनिधी)- दक्षिण नगर जिल्ह्याला जलसंजीवनी देणारे व 26 हजार दलघफूट पाणी साठवण क्षमता असलेले मुळा धरण काल गुरूवारी सायंकाळी 6 वाजता (दि. 21) पूर्ण क्षमतेने भरले. धरणात 25 हजार 500 दलघफूट पाणीसाठा झाल्यानंतर काल ठिक 6 वाजून 30 मिनिटांनी मुळा नदीपात्रात कळ दाबून 542 क्युसेकने धरणाच्या दोन मोर्‍यातून पाणी सोडण्यात आले. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच धरणातून हे पाणी मुळामाईच्या नदीपात्रात झेपावले. मुळा धरण भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या आठवडाभरापासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ झाली होती. 48 तासात 25 हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात होत असल्याने धरणाच्या पातळीचा आलेख उंचावला होता. तर दोन दिवसांपासून लाभक्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात परतीच्या मान्सूनने जोरदार बॅटींग केल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणात एकूण 25 हजार 500 दलघफूट पाणी जमा झाल्याने पाटबंधारे खात्याने नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, अ‍ॅड. सुभाष पाटील, रावसाहेब चाचा तनपुरे, राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, नगरसेवक शहाजी जाधव, नितीन तनपुरे, विजय डौले, दत्तात्रय ढूस, अ‍ॅड. पंढरीनाथ पवार, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, शाखाभियंता शामराव बुधवंत, आदी मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून धरणात पाणी सोडण्यात आले. यावेळी मुळा धरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.  प्रारंभी मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यापूर्वी राहुरीच्या प्रशासनाने नदीपात्रातील बंधार्‍यांच्या फळ्यांची व बंधार्‍यांची तपासणी केली.

LEAVE A REPLY

*