मुळा धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तने

0
रब्बीला एक तर उन्हाळी हंगामाला दोन; तीन आवर्तनासाठी मुळातून 13.57 टीएमसी पाणी देणार

राहुरी/नेवासा (प्रतिनिधी)- मुळा धरणातून रब्बी व उन्हाळ हंगामासाठी आवर्तन निश्‍चित करण्यात आले असून रब्बी हंगामासाठी एक तर उन्हाळ हंगामासाठी दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एका आवर्तनाची कपात करण्यात आली असली तरी यंदा आवर्तनाचा कालावधी जास्त काळ राहणार आहे. यंदा मुळा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने यंदा चारऐवजी तीनच आवर्तन देण्यात येणार आहे. रब्बीच्या एका आवर्तनासाठी 5.07 टीएमसी तर उन्हाळ हंगामातील दोन आवर्तनासाठी एकूण 8.50 टीएमसी पाणी वापर होणार आहे. काल मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तीन आवर्तनासाठी 13.57 टीएमसी पाणी वापर होणार आहे.

दरम्यान, रब्बीसाठी दि. 15 डिसेंबरपासून तर उन्हाळ आवर्तन दि. 1 मार्च 2018 पासून सुरू होणार आहे. मुळा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे आवर्तनाचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. दि. 15 ऑक्टोबर 2017 रोजी मुळा धरणात उपलब्ध असलेला 21.50 टीएमसी पाणीसाठा गृहीत धरून हे नियोजन आखण्यात आले आहे. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

तर राहुरी तालुक्यात सरासरी 105 टक्के पाऊस झाल्याने आवर्तन उशिराने सोडण्यात येणार आहे. मुळा धरणात सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी 3.57 टीएमसी पाणी बाष्पीभवन, गाळसाठा, कॅरीओव्हर असे गृहीत धरण्यात आले आहे. तर बिगर सिंचन व सिंचनासाठी 17.93 टीएमसी पाणी पिण्यासाठी, औद्योगिक वापर व पिण्यासाठी आरक्षित करण्यात येणार असून प्रवाही कालव्यासाठी 14.70 टीएमसी, वांबोरी चारी, भागडा चारी व महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी 1.13 टीएमसी पाण्याचा वापर गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे मुळा उजवा कालवा व डाव्या कालव्याच्या आवर्तनासाठी 13.57 टीएमसी पाणी वापरण्यात येणार आहे.

सन 2017-18 च्या रब्बी हंगामासाठी मुळा उजव्या कालव्यातील लाभक्षेत्राखालील 35 हजार हेक्टर क्षेत्र तर डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राखालील 4 हजार हेक्टर क्षेत्रात एकूण 39 हजार हेक्टर क्षेत्राला या आवर्तनातून 5.07 टीएमसी पाणी वापर गृहीत धरण्यात आला आहे.

मुळा उजव्या कालव्यातून दि. 15 डिसेंबर 2017 ते दि. 30 जानेवारी 2018 पर्यंत असे 47 दिवसाचे आवर्तन राहणार असून एकूण 4.57 टीएमसी पाणी वापर होणार आहे. तर डाव्या कालव्यातून दि. 15 डिसेंबर 2017 ते दि. 10 जानेवारी 2018 पर्यंत असा 27 दिवसांचा कालावधी राहणार असून त्यासाठी 0.50 टीएसी पाणी वापर गृहीत धरण्यात आला आहे.

रब्बीच्या आवर्तनानंतर उन्हाळी हंगामाचेही नियोजन बैठकीत करण्यात आले आहे. उन्हाळी हंगामात दोन आवर्तन सोडण्यात येणार आहेत. मुळा उजवा व डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राखाली एकूण 23 हजार हेक्टर क्षेत्र गृहीत धरण्यात आले असून मुळा उजव्या कालव्याखालील 20 हजार हेक्टर क्षेत्रासाठी पहिले आवर्तन दि. 1 मार्च 2018 ते दि. 15 एप्रिल 2018 या कालावधीत सुरू राहणार असून हे आवर्तन 46 दिवस चालणार आहे.

तर मुळा उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन दि. 14 मे 2018 ते दि. 7 जून 2018 पर्यंत चालणार असून त्याचा कालावधी 26 दिवसांचा राहणार आहे. यातील पहिल्या आवर्तनासाठी 5 टीएमसी तर दुसर्‍या आवर्तनासाठी 2.50 टीएमसी पाणी वापर होणार आहे. मुळा डाव्या कालव्याखालील 3 हजार हेक्टर क्षेत्रासाठीही दोन आवर्तन सोडण्यात येणार आहे.

पहिले आवर्तन दि. 1 मार्च 2018 ते 30 मार्च 2018 पर्यंत सुरू राहणार असून त्याचा कालावधी 30 दिवसांचा राहणार आहे. त्यासाठी 0.50 टीएमसी पाणी वापर होणार आहे. दुसरे आवर्तनही 30 दिवसांचे असून दि. 14 एप्रिल 2018 ते दि. 13 मे 2018 पर्यंत आवर्तन सुरू राहणार आहे. दुसर्‍या आवर्तनाला 0.50 टीएमसी पाणी वापर होणार आहे. उन्हाळ हंगामात मुळा व उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्राखालील एकूण 23 हजार हेक्टरला 8.50 टीएमसी पाणी वापर होणार आहे.

दरम्यान, यंदा राहुरी तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडल्याने उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत 16 टक्के वाढ झाली आहे. आता आवर्तनाचा कालावधी निश्‍चित करण्यात आल्याने ऊस लागवडीखालील क्षेत्र आणखी झपाट्याने वाढण्याचे संकेत आहेत. त्यातच यंदा डॉ. तनपुरे कारखाना सुरू होणार असल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळाले आहेत. त्यामुळे यावर्षी राहुरी तालुक्यात पुन्हा उसाचे मळे फुलणार आहेत.

पाटबंधारे खात्याने सध्या 7 नंबरचे पाणी मागणी अर्ज भरून घेण्याचे नियोजन केले असून त्याची मुदत 24 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात पेरणी करावयाच्या पिकांसाठी मशागतीला युद्धपातळीवर सुरूवात केली असून आतापर्यंत 65 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. कांदा, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीला वेग आला आहे.

समाधानकारक पावसामुळे राहुरी तालुक्यात तळे, बंधारे, विहीरी व कुपनलिकांची पाण्याची पातळी चांगली आहे. मात्र, महावितरणच्या आडमुठ्या कारभारामुळे विजेचा खेळखंडोबा होत असल्याने पेरण्यांमध्ये पाणी असूनही व्यत्यय येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्याच्या पश्‍चिमेकडील भागात जिरायत क्षेत्र जास्त असल्यामुळे या भागातून प्रामुख्याने ज्वारीची पेरणी मोठ्या क्षेत्रावर झाली आहे. उर्वरित शेतकर्‍यांनी मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात गहू, हरभरा, तूर या पिकांच्या पेरणीला प्राधान्य दिले आहे.

राहुरी तालुक्यात पाणीपातळी चांगली असूनही मात्र, सध्या ग्रामीण भागातून तीन ते चार तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याने पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याचे चित्र आहे. त्यात रात्री-अपरात्री वीज येत असल्याने बिबट्याच्या भितीने रात्री पिकांना पाणी देता येत नाही. सध्या पाणीपातळी चांगली असल्याने पाणी मागणी अर्ज भरण्याकडे शेतकर्‍यांचा म्हणावा तसा कल दिसत नाही. मात्र, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पाणी पातळी घटते, त्यावेळी धरणातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, आताच पाणी मागणी अर्ज भरले तरच पुढील नियोजन पाटबंधारे विभागाला करता येणार असल्याने शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

भंडारदरा धरणातून यावर्षी पाच आवर्तने –
भंडारदरा (वार्ताहर) –
भंडारदरा धरणातुन यावर्षी रब्बी हंगामासाठी दोन व उन्हाळी हंगामासाठी तीन असे एकूण पाच आवर्तने घेण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबई येथे प्रवरा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दरम्यान घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरिश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार भाऊसाहेब कांबळे, वैभव पिचड, सुधीर तांबे, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, जलसंपदा सचिव बिराजदार, मुख्यअभियंता उपासनी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी रब्बी हंगामासाठी दोन व उन्हाळी हंगामासाठी तीन असे पाच आवर्तने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.रब्बीच्या पहिल्या आवर्तनाचा निर्णय मागणीनुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विचारात घेण्यात येईल तर निळवंडे धरणात शिल्लक राहत असलेल्या 1700 दलघफु पाण्यातून प्रवरा नदीवरील को.प.बंधार्‍यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केली त्यानुसार रब्बीचे दुसरे आवर्तन संपल्यावर त्यालाच जोडुन प्रवरा नदीवरील को.प. बंधार्‍यासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

*