मुळा धरणावर शेतकर्‍यांचा ठिय्या

0
माजी आ. शंकरराव गडाख व जि. प. सदस्य शिवाजीराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्‍यांनी मुळा धरणस्थळी ठिय्या आंदोलन केले. भर पावसात शेतकरी धरणस्थळी बसून होते.

मराठवाड्याला पाणी सोडू नका, केटीवेअर भरून द्या, उन्हाळ्यात दोन आवर्तनाची मागणी; एकाही शेतकर्‍याला काठी लागल्यास धरणात जलसमाधी : गडाख

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – मुळा धरणातून जायकवाडीला आवर्तन देऊ नये, या मागणीसाठी काल मुळा धरणस्थळी नेवासा व राहुरी तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलन चालू असतानाच मुळा धरणावर पावसाने हजेरी लावल्यानंतरही शेतकरी आणि कार्यकत्यार्ंनी भर पावसात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आ. शंकरराव गडाख व जि.प. सदस्य शिवाजीराव गाडे यांनी केले. धरणस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने धरणाला छावणीचे स्वरूप आले होते.

यावेळी प्रचंड घोषणाबाजी करीत कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी धरणाचा परिसर दणाणून सोडला. मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडू देणार नाही, या भूमिकेवर माजी आ. गडाख व शिवाजीराव गाडे हे ठाम राहिले. दरम्यान, माजी आ. गडाख यांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरा त्यांना सोडून दिले. आज शुक्रवार दि. 26 रोजी मुळा नदीपात्रातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून माजी आ. गडाख यांनी पुन्हा मुळा धरणस्थळी येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राहुरी पोलिसांनी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा धरणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.

मराठवाड्याला पाणी सोडू नये, तसेच नेवासा तालुक्यातील केटीवेअर, बंधारे भरून द्यावे व उन्हाळ्यात दोन आवर्तन मिळावे या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख हे सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांसह मुळा धरणावर जेथून नदीत पाणी सोडले जाते, त्याठिकाणी धरणे धरून बसले. मोठा बंदोबस्त असतानाही गडाख हे बारागाव नांदूर मार्गे धरणावर पोहोचले. तेथे पोलिसांनी गडाख यांना अडविले. गुरूवारी सकाळी 9 वाजता शंकरराव गडाख यांनी मराठवाड्याला पाणी सोडण्यात येऊ नये, यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी मेळावा बोलावला. त्यात गडाख यांनी मुळा, भंडारदरा धरणाची आकडेवारी सांगितली व जायकवाडीतील पाण्याचा कसा अपव्यय झाला? हे सांगून शेतकर्‍यांना ही लढाई नेटाने लढावी लागेल, असे आवाहन केले.

धरणस्थळी गडाख यांच्या समवेत कॉम्रेड बाबा अरगडे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे, मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, विश्‍वास पवार, भाऊसाहेब कोहकडे, निवृत्ती देशमुख, डॉ. आघाव, उमेश घाडगे, नाना घोडे, संतोष शिंदे यांच्यासह नेवासा व राहुरी तालुक्यातील हजारो शेतकरी यावेळी उपस्थित होते. माजी आ. गडाख म्हणाले, मुळा धरणाचे एक थेंबही पाणी जायकवाडीला जाऊ देणार नाही. निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्याच्या राजकारणासाठी नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुळा धरणाखालील नेवासा तालुक्याचे सर्वात जास्त नुकसान होणार असल्याची भीती गडाख यांनी व्यक्त केली.

धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या भरवशावर तालुक्यातील शेतकरी कर्ज काढून पिके घेतात. या निर्णयामुळे ही पिके हातची जाण्याचा धोका असून त्याची नुकसान भरपाई शासन देणार का? असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्यातील लोकांच्या मानाने नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा या निर्णयास तितकासा प्रखर विरोध नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठवाड्यातील राजकारणासाठी आपल्या शेतकर्‍यांचा बळी देणार का? असा प्रश्‍न त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना विचारला. या निमित्ताने आपली अवस्था अभिमन्यू सारखी झाली असल्याचे नमूद करून याप्रश्‍नी आंदोलनाची धार व तीव्रता वाढवावी लागणार असल्याचे सांगितले. यंदाचा दुष्काळ फार भयानक असल्याचे वास्तव स्पष्ट करून मुळा धरणाच्या तेवीस टीएमसी पाणीसाठ्यापैकी खर्च झालेल्या पाच टीएमसी पाण्याचे नियोजन लोकप्रतिनिधींनी व्यवस्थित केले असते तर आजची परिस्थिती वेगळी दिसली असती.

आपण आमदार असताना मराठवाड्याला सोडायचे पाणी तालुक्यातील केटीवेअर अडविले त्यामुळे तालुक्याला दुष्काळाची झळ पोहोचली नाही. तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी याबाबत ठोस भूमिका घेतली असती तर शासनाला हा निर्णय मागे घ्यावाच लागला असता असे त्यांनी ठामपणे सांगितले. मात्र, लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती मिळाल्याचे एकीकडे पोकळ वक्तव्य जाहीर करून दुसरीकडे तालुक्यातील सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे सांगत बुद्धीभेद केल्याचा आरोप गडाख यांनी केला. या निर्णयामुळे आता नदीकाठची वीजजोड तोडण्यात येऊन केटीवेअर बंधार्‍याच्या फळ्या काढल्या जातील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शिवाजीराव गाडे म्हणाले, शासनाने याप्रश्‍नी गांभिर्याने पाहिले पाहिजे. मुळा धरणातून जायकवाडीला आवर्तनाची गरज नाही. मात्र, यात सत्ताधारी सरकारने राजकारण करून नगर व नाशिक जिल्ह्याची शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला असल्याची टीका त्यांनी केली. मुळा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडले तर त्यातील केवळ 25 टक्केच पाणी जायकवाडीत पोहोचणार आहे. उर्वरित 75 टक्के पाण्याचा अपव्यय होणार आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील शेती आणि शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. राहुरी तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे बागायती तालुका असूनही पिण्याच्या पाण्याची टंचाई भर पावसाळ्यात जाणवू लागली आहे. पर्यायाने पशुधनही संकटात सापडणार आहे. गडाख हे अत्यंत अभ्यासू आणि धडाकेबाज नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातून ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. जायकवाडीसाठी पाणी जाऊ देणार नाही, या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे गाडे यांनी स्पष्ट केले. शासनाच्या अन्यायकारक निर्णयामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिवाळसणात होळी साजरी करण्याची वेळ आली असल्याची टीका गाडे यांनी केली आहे.

यावेळी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे, पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नेवासा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, सोनई पोलीस ठाण्याचे कैलास देशमाने आदी उपस्थित होते.

आंदोलनचा रेटा पाहून व गडाख यांची आक्रमकता पाहून नेवासा व राहुरी तालुक्यातील केटीवेअर व बंधारे भरून दिले जातील, असे आश्‍वासन गडाख यांना पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

आंदोलनंकर्ते मुळा धरणावर पोहोचले असता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावेळेस शंकरराव गडाख यांनी ठोस भूमिका घेतली. जर एकाही शेतकर्‍याला काठी लागल्यास मी धरणात जलसमाधी घेणार असल्याचे सांगितले.

राहुरी व नेवासा तालुक्यातील मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी व कार्यकत्यार्ंनी पोलिसांना आणि पाटबंधारे खात्याला सहकार्य करावे, कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी केले आहे.

राहुरी तालुक्याच्यादृष्टीने हा जिव्हाळ्याचा विषय असताना जि.प. सदस्य शिवाजीराव गाडे वगळता तालुक्यातील अन्य नेत्यांनी धरणस्थळी पाठ फिरविली. तर लोकप्रतिनिधी आ. शिवाजीराव कर्डिले यांनीही याप्रश्‍नी मौन बाळगून धरणस्थळी आंदोलनात सहभाग घेतला नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*