आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे अवयवदान जनजागृती

राज्यभर विविध उपक्रम राबवणार

0

नाशिक । नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे सध्या मानवी अवयव प्रत्यारोपण करणे शक्य होत आहे. याबाबत अवयवदानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचणे व जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे संपूर्ण राज्यात 30 ऑगस्टपर्यंत अवयवदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. यासाठी पंतप्रधानांनीदेखील अवयवदानाचे महत्त्व जाणून रुग्णसेवेसाठी मोठ्या प्रमाणात अवयवदान जागृती होण्याकरिता अवयवदानाचे अभियान हाती घेण्याबाबत सूचीत केले आहे.

विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनातर्फे या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या अभियानात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे. यामध्ये विद्यापीठाच्या राज्यभरातील संलग्नित महाविद्यालयात अवयवदान विषयावर रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला, व्याख्यान, चर्चासत्र व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी माहिती सांगितले, अवयवदानाविषयी समाजात प्रबोधन करणे काळाची गरज आहे. अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार करणे ही एक सामाजिक बांधिलकी असून या महान कार्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. या स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या पोस्टरचे प्रदर्शन 29 व 30 ऑगस्ट रोजी मुंबई येथील सेंट जॉर्जेस् हॉस्पिटल आवारातील शासकीय दंत महाविद्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.

अवयवदान विषयावर आयोजित खुल्या पोस्टर स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकासाठी बक्षीस रु. वीस हजार, द्वितीय क्रमांकासाठी रु. पंधरा हजार, तृतीय क्रमांकसाठी दहा हजार रुपये व दोन उत्तेजनार्थ बक्षीस रु. पाच हजार, पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेतील पाच उत्कृष्ट पोस्टर्सची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील उत्कृष्ट पाच पोस्टर्सची शासनामार्फत छपाई करून राज्यातील विविध महाविद्यालये, रुग्णालये व शासकीय कार्यालयांत लावण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी चित्र 20 इंच बाय 30 इंच आकारात माऊंट बोर्डवर काढण्यात यावे. पोस्टरमध्ये रंग वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. या स्पर्धेसाठी पाठवण्यात येणारी कलाकृती ही कुठल्याही कलाकृतीची प्रतिकृती, नक्कल अथवा अनुकरण नसावे.

ही कलाकृती डिजिटल किंवा हॅण्डमेड असावी. कलाकृती विद्यार्थ्याने तयार केली असल्याचे प्रमाणपत्र संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडून प्रमाणित केलेले असावे व ते कलाकृतीच्या मागील बाजूस चिकटवावे. वैयक्तिक सादरीकरण करावयाचे असल्यास स्पर्धकाने स्वत: प्रमाणित करून देण्यात द्यावे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. याबाबत अधिक माहितीसाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे प्राध्यापक तथा समन्वयक अविनाश घरडे यांच्याशी अथवा आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी किंवा संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*