Sunday, May 19, 2024
Homeनगरमहावितरणचा विज बिलासाठी शेतकर्‍यांना शॉक

महावितरणचा विज बिलासाठी शेतकर्‍यांना शॉक

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

शेतकरी संपाचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणतांबा परिसरातील शेतकरी वर्गाची अवस्था सध्या तरी राज्य सरकारच्या धोरणामुळे अत्यंत बिकट झाली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत थकीत शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता. त्यानुसार राहाता तालुक्यातील 73 सेवा संस्थांतील 9563 सभासदापैकी 8165 सभासदांना 53.27 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. काही शेतकर्‍यांना दुसर्‍या टप्प्यात लाभ मिळाला.

अजूनही अंदाजे 535 सभासद कर्जमाफीपासून वंचित असून त्यात पुणतांबा परिसरातील काही शेतकर्‍यांचा समावेश आहे. या शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली नाही व नवीन कर्जापासूनही ते वंचित आहेत. विशेष म्हणजे कर्जमाफी का नाकारली याचे कारण अजूनही गुलदस्यात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची द्विधा मनास्थिती झाली आहे.

त्यातच परिसरात ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई पंचनामे करूनही अद्याप मिळाली नाही. इतर तालुक्यातील शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळाला मात्र पुणतांबेकर अजूनही वंचित आहेत.

शासन दरबारी विचारणा केल्यानंतर येईल एवढेच आधिकारी वर्गाकडून सांगितले जाते. त्यातच गेल्या 5 दिवसापासून महावितरणच्या अधिकार्‍यांनी अंदाजे 15 कोटी 57 लाख रुपयाच्या थकित बिल वसुलीसाठी धडक मोहिम सुरु केली आहे. अनेक डी.पी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आणखी अडचणीत आला आहे.

शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणतांबेकरांनी दि. 1 जून 2017 रोजी शेतकरी संपाचे अनोखे आंदोलन केले होते. तात्कालिक सरकारने त्याची दखल घेऊन काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्याचे श्रेय पुणतांबेकरांनाच जाते. मात्र त्यानंतर कर्जमाफीचा लाभ न मिळालेले शेतकरी अतिवृष्टीमुळे पिकांची नुकसान भरपाई याबाबत कोणतेही धडक आंदोलन झाले नाही व कोणी केले नाही.

त्यामुळे येथील शेतकरी वर्गाने आंदोलनाकडे पाठ फिरविली की काय? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे त्यातच महावितरणने वीजबिल वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. त्याबाबत कोणीही ठोस भूमिका घेत नाही. तसेच सरकारला धारेवर धरत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

तालुक्यासाठी राहाता मात्र विधानसभेसाठी कोपरगाव मतदारसंघ असलेल्या पुणतांबेकरांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. त्यात महाविकास आघाडी सरकारकडून पुणतांबेकराच्या विकासाचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार यापेक्षा निदान कर्जमाफी व अतिवृष्टीपासून वंचित राहणार्‍या शेतकर्‍यांना न्याय मिळावा तसेच वीज बिलाबाबत सवलत मिळावी एवढीच अपेक्षा मायबाप सरकारकडून शेतकरी वर्गाची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या