Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

घरगुती जोडणीचा स्थिर आकार ११० रुपये होणार; अडीच कोटी मध्यमवर्गीय ग्राहकांना बसणार फटका

Share

महावितरणकडून सहा हजार कोटींच्या दरवाढीचा प्रस्ताव

नाशिक । प्रतिनिधी

महागाईची झळ सोसणार्‍या मध्यमवर्गीयांसमोर आता वीज दर वाढीचे संकट उभे ठाकले आहे. संपूर्ण राज्यात वीजपुरवठा करणार्‍या महावितरण कंपनीने 5927 कोटी रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दाखल केला असून तो मान्य झाल्यास महिन्याकाठी 100 युनिटपर्यंत विजेचा वापर करणार्‍या जवळपास अडीच कोटी ग्राहकांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. याबरोबरच घरगुती जोडणीसाठीचा स्थिर आकार 90 रुपयांऐवजी 110 रुपये करण्याची मागणी देखील महावितरणकडून करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरांसह संपूर्ण राज्यात महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येतो. राज्य वीज नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीजदर पद्धतीनुसार इतर वीजवितरण कंपन्यांसह महावितरणने देखील सन 2020 ते 2025 या पाच वर्षांच्या काळासाठी वीजदरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे दाखल केला आहे.

हेही वाचा : 

पुढील पाच वर्षे टप्प्याटप्प्याने महावितरणची वीज महागणार

त्यात एप्रिल 2020 ते मार्च 2021 या काळासाठी 5.80 टक्के, 2021-22 मध्ये 3.25 टक्के, 2022-23 मध्ये 2.93 टक्के, 2023-24 मध्ये 2.61 टक्के तर 2024-25 मध्ये 2.54 टक्के वीजदरवाढीस मंजुरी मिळावी असा प्रस्ताव महावितरणकडून दाखल करण्यात आला आहे. महावितरणला गेल्या तीन वर्षांत 8 हजार 754 कोटींचा तोटा झाला आहे. यापूर्वी वीज नियामक आयोगाने 12 हजार 382 कोटींची दरवाढ मंजूर केली आहे.

 

ही दरवाढ देखील पुढील पाच वर्षात वसूल केली जाणार आहे. येत्या फेब्रुवारीत राज्यातील सर्व महसुली मुख्यालयांच्या शहरांत महावितरणच्या या प्रस्तावावर सुनावणी होणार आहे. त्यात ग्राहक संघटना व इतरांना हरकती घेता येतील. सध्याच्या वीजदरातून महावितरणला 76 हजार 998 कोटी रुपयांचा महसूल मिळतो.

तर नवीन वीजदर लागू झाल्यानंतर 82 हजार 925 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असून ही दरवाढ 5927 कोटी रुपयांची म्हणजेच सरासरी 5.80 टक्के इतकी असणार आहे. त्यामुळे आता राज्य वीज नियामक आयोगाकडून महावितरणच्या प्रस्तावानुसार प्रत्यक्षात किती दरवाढ मंजूर केली जाते यावर वीजग्राहकांच्या खिशावर वाढणारा भार अवलंबून असणार आहे.

दरमहा 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍या सामान्य घरगुती ग्राहकांचा वीजदर 3.05 रुपये प्रति युनिट असून तो 3.30 रुपये करावा असे महावितरणने सुचवले आहे. 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍यांचा दर 6.95 रुपयांवरून 7.30 रुपये प्रतियुनिट करावा आणि 301 युनिटपेक्षा जास्त वीज वापरणार्‍या बडया घरगुती ग्राहकांसाठी सध्याचा वीजदर कायम ठेवावा असे सांगत महावितरणने या बड्या ग्राहकांवर कृपादृष्टी ठेवली आहे.

याशिवाय घरगुती वीजग्राहकांसाठी जोडणीचा स्थिर आकार दरमहा 90 रुपयांवरून 110 रुपये करण्याची मागणी महावितरणच्या प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे. जास्त वीज वापरणार्‍यांना फायदा 200 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या वाणिज्य ग्राहकांसाठी असणार्‍या 6.10 रुपये प्रतियुनिट दरात वाढ करून तो 7.90 रुपये करावा तर 200 युनिटपेक्षा जास्त वीज वापरणार्‍या ग्राहकांसाठी सध्याच्या 9.25 रुपये दरात कपात करून तो 7.90 रुपये करावा असे महावितरणने सुचवले आहे.

औद्योगिक ग्राहकांसाठी मात्र सरसकट एक टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. कृषिपंपांचा वीजदर 5 टक्क्यांनी तर यंत्रमागधारकांचा वीजदर 4 ते 5 टक्क्यांनी तर रेल्वे-मेट्रो-मोनो आदींचा वीजदर देखील 10 टक्क्यांनी वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!