विमानसेवेसाठी आता खासदारांचे आंदोलनास्त्र

नागरी उड्डयनमंत्र्यांची भेट घेऊन सेवा सुरू करण्याची मागणी

0

नाशिक | दि. १२ प्रतिनिधी- केंद्र सरकारच्या विमान मंत्रालयाची अतिशय महत्त्वाची योजना उडान ऑक्टोबर २०१६ मध्ये घोषित करण्यात आली होती. भारतातील शहरदरम्यान एअरपोर्ट संपर्क करून सर्वसामान्य नागरिकांना विमानसेवेचा लाभ मिळावा हा मुख्य उद्देश यामागे होता.

मात्र जीव्हीके या मुंबई विमानतळाचे संचलन करणार्‍या खासगी कंपनीने नाशिकसाठी वेळ उपलब्ध करून न दिल्याने नाशिकहून विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे १५ दिवसांत नाशिकसाठी वेळ उपलब्ध करून न दिल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा खा. हेमंत गोडसे यांनी दिला आहे.

उडान योजनेत मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्रातील निवडल्या गेलेल्या १० एअरपोर्टमध्ये एअर डेक्कन मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक, मुंबई-औरंगाबाद, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-जळगाव, मुंबई-सोलापूर-मुंबई अशा विमानसेवेस मान्यता देण्यात आली व ऑक्टोबर २०१७ पर्यंत विमानसेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

३० सप्टेंबरपर्यंत विमानसेवा सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापपर्यंत ही सेवा सुरू होऊ शकली नाही. उडान योजना हा धोरणात्मक निर्णय आहे व त्यासाठी झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे व होते व त्यासाठी केंद्र सरकारच्या सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने जीव्हीके कंपनीस टाईम स्लॉटसाठी विचारणाऐवजी आदेश देणे अपेक्षित होते.

मात्र वेळेचे कारण देत जीव्हीकेने नाशिकला विमानसेवा देण्यास नकार दिला. तर दुसरीकडे गुजरातला सुरत, कांडला व पोरबंदर एअरपोर्टला मुंबई विमानतळावर वेळ उपलब्ध करून दिल्याबाबत खा. गोडसे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे एअर डेक्कनकडून तीन वर्षाचे वेळापत्रक घ्यावे व जीव्हीकेला वेळेची उपलब्धता करून देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी नागरी उड्डयनमंत्री गजपती राजू यांच्याकडे करण्यात आली.

अन्यथा आपल्या मंत्रालयासमोर आपल्या हक्कासाठी आंदोलन करेन, असा इशारा खा. गोडसे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*