Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्हा परिषदेत काहीही होऊ शकते

जिल्हा परिषदेत काहीही होऊ शकते

खा. डॉ. विखे पाटील : कागदावरील व प्रत्यक्षातील आकड्यात फरक

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रत्यक्ष कागदावरील आणि राजकीय संख्याबळ यामध्ये फरक असतो. केव्हाही काहीही घडू शकते. जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शालिनीताई विखे पाटील या काँग्रेसच्या असल्याने त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत काँग्रेस निर्णय घेईल. राज्यसभेत बहुमत नसतानाही अनेक कायदे मंजूर झाले, तसेच जिल्हा परिषदेतही होऊ शकते, असा सूचक इशारा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

- Advertisement -

नगर शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नागरिकत्त्व संशोधन कायद्यास समर्थन करण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्च्यानंतर खा. डॉ. विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्यासमोर अडचणी असल्या तरी आम्ही ज्या पक्षात आहोत, त्या पक्षाचा अध्यक्ष व्हावा, अशीच आमची भूमिका असते आणि आहे.

राज्यसभेमध्ये भाजपचे संख्याबळ कमी असतानाही नुकतेच झालेले सर्व कायदे बहुमताने मंजूर झाले. त्यामुळे प्रत्यक्षात कागदावर असलेले आकडे व राजकीय गणिते यामध्ये निश्चितपणे फरक असतो. संख्याबळ दिसत नाही, पण मतदानच्या रूपातून ते सिद्ध होतं, असा सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

शालिनीताई काँग्रेसमध्ये, पाठिंब्याचा निर्णय फडणवीस घेणार
जिल्हा परिषदेत कोणत्याही पॅटर्नचा विषय नाही. सगळ्याच गोष्टी 31 तारखेनंतर निश्चितपणे कळतील. आज त्यावर बोलले तर ज्या गोष्टी करायच्या त्यात अडथळे येतील. मी व माझे वडील भाजपमध्ये आहोत. शालिनीताई विखे या काँग्रेसमध्ये आहेत. त्या उमेदवारी करणार की नाही, हा त्यांच्या पक्षातील विषय आहे. शालिनीताई विखे या निवडणुकीला उभ्या राहिल्या व भाजपला पाठिंबा देण्याची वेळ आली तर यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असेही खा. डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

आ. रोहित पवार यांचा अभ्यास कच्चा
नागरिकत्व संशोधन कायद्यामुळे लोकांना आता रांगेत उभे राहून नागरिकत्व सिद्ध करावे लागेल, अशी टीका मंगळवारी आ. रोहित पवार यांनी केली होती. त्यावर बोलताना खा. डॉ. विखे पाटील यांनी त्यांचा अभ्यास कच्चा असल्याचे सांगितले. हा विषय लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाला आहे. आ. पवार राज्यात काम करतात. त्यामुळे पूर्ण अभ्यासाअंतीच यावर बोलले पाहिजे. राष्ट्रपतींची यावर सही झालेली आहे. हा कायदा आ. पवार यांना कळालाच नाही. त्यांनी यावर अभ्यास करावा, असा सल्लाही खा. डॉ. विखे पाटील यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या