शिर्डीत आम्ही करुन दाखविले तेच संगमनेरात घडू शकते- खा. डॉ. सुजय विखे
Share

संगमनेर (प्रतिनिधी)- शिर्डी आणि संगमनेर मतदार संघातील विकास कामाची तुलना करण्याची संधी विधानसभा निवडणुकीच्या निमिताने आली आहे. शिर्डीत आम्ही करून दाखविले तेच संगमनेरात घडू शकते, मात्र यासाठी परिवर्तन घडविण्याची हिम्मत दाखवावी लागेल. तुम्ही परिवर्तन घडवा विकासासाठी संगमनेर तालुका दतक घेतो असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरातील घासबाजारात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत खा. डॉ. विखे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट निशाणा साधला. वाळू तस्करी, लॅन्ड माफीया आणि ठेकेदारी प्रवृतीने बरबटलेल्या या पक्षांना जनता कंटाळली असून जे लोकसभेत घडले तेच विधानसभेत घडणार असून संगमनेर विधानसभा मतदारसंघातही परिवर्तन घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते उमरभाई बेग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस शिवसेनेचे उपनेते अल्ताफभाई शेख, जनार्दन आहेर, बापुसाहेब गुळवे, बाबासाहेब कुटे, आप्पा केसेकर, कैलास वाकचौरे, ज्ञानेश्वर करपे, जयंवत पवार, संतोष रोहोम, रोहीदास डेरे, श्रीराज डेरे, अमर कतारी, राजेंद्र सांगळे, पूजा दिक्षीत, शितल हासे, जावेद जहागिरदार, शौकत जहागिरदार, राजेश चौधरी, अमित चव्हाण, संजय फड, शरद थोरात, पप्पु कानकाटे, दिपक थोरात आदी यावेळी उपस्थित होते.
शिर्डी मतदार संघात वीस हजार कुटूंबांना मोफत रेशन कार्ड वाटले, बोगस लाभार्थीची नावे काढून सामान्य माणसाला धान्य मिळून दिले. संगमनेरात बोगस लाभार्थ्यांची नावे काढायची हिंमत तरी कधी दाखवली का याकडे लक्ष वेधून, वर्षानुवर्षे पालिकेची सता ताब्यात असतानाही शहराला शुध्द पाणी मिळू शकत नाही. सांडपाण्याची कोणतीही व्यवस्था करू शकला नाहीत. कोणत्या विकासाच्या गप्पा तुम्ही करता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर झालेल्या इडीच्या कारईवर भाष्य करून डॉ. विखे म्हणाले, एक कारवाई झाली तर तुमच्या डोळ्यात पाणी आले, पण मुळा प्रवरा वीज संस्था बंद पाडून कामगारांना देशोधडीला लावले तेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू का आले नाहीत. तीन महीन्यापुर्वी खासदार झालेले अमोल कोल्हे अचानक शेतीवर बोलायला लागले याचे आश्चर्य वाटल्याचा टोला लगावून अडीच वर्षात कोण जेलमध्ये दिसते हे तुम्हाला दिसलेच असा इशारा त्यांनी दिला.
संगमनेर तालुक्याचे माझ्यावर खूप प्रेम असल्याचा उल्लेख करून डॉ. विखे म्हणाले की, लोकसभेची उमेदवारी मिळायला आणि मला खासदार करायला या तालुक्याच्या नेतृत्वाचे प्रयत्न कारणीभूत ठरले. त्यामुळे त्यांचे फोटो मी घरात लावणार असल्याचा उपरोधिक उल्लेख करून, राज्यात 150 जागा येण्याची भाषा, येण्याचे स्वप्न पाहायला निघालेले प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यात फक्त तीन जागांवर उमेदवार उभे करू शकले हे दुर्देव असल्याचे मत व्यक्त करून पंचवीस वर्षापुर्वी काय केले हे सांगण्यापेक्षा आता काय केले याची गरज लोकांना असल्याचे खडेबोल त्यांनी सुनावले.
उमेदवार साहेबराव नवले म्हणाले, दुष्काळमुक्त तालुक्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. तालुका एक संघ ठेवण्यासाठी महायुतीचे हात बळकट करा. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी युती शासनच वळवू शकेल. यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी. यावेळी संतोष रोहम, वसंतराव गुंजाळ, रोहित चौधरी यांची भाषणे झाली. सभेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.