ठेकेदाराच्या मनमानीमुळे भोकर, घुमनदेव व कमालपूर येथील ग्राहक ब्रॉडबँड सेवेपासून वंचीत

jalgaon-digital
4 Min Read

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर, घुमनदेव व कमालपूर येथे राज्यमार्ग व रस्ता रूंदीकरण, मजबुतीकरणाच्या नावाखाली संबंधीत ठेकेदारांच्या जेसीबीसारख्या साधनांनी रस्त्याची दुतर्फा खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे टाकळीभान येथून येणारी दुरध्वनी केबल बेपत्ता झाल्याने अनेकांचे फोन बंद पडले आहेत. त्याचबरोबर ब्रॉडबँड ही इंटरनेट सेवाही विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याप्रश्नी खा. सदाशिव लोखंडे यांनी लक्ष घालून ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटूंबांना परवडणारी बीएसएनएल टेलिफोन सेवा मोबाईलच्या आगमनानंतर सरकार व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षीतपणामुळे ठप्प झाली. स्वत:चे नेटवर्क परंतू कर्मचार्‍यांची उदासिनता व सरकारचे दुर्लक्ष यामुळे चालु यंत्रणा बंद पडली असली तरीही अनेकांना अद्यापही बीएसएनएलशिवाय पर्याय नाही. टेलिफोनच्या जागेवर मोबाईलने आक्रमण केले असले तरी बीएसएनएलच्या तुलनेत मोबाईलच्या इंटरनेट सेवेचा स्पीड व खर्च न परवडणारा आहे.

परीसरातील भोकर, कमालपूर व घुमनदेव या गावांना बीएसएनएलच्या टाकळीभान येथील एक्सचेंजमधून टेलिफोन व इंटरनेट सेवा पुरविली जायची परंतू मध्यंतरीच्या काळात कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे येथील एक्सचेंजमधून दिली जाणारी सेवा विस्कळीत झाली. अनेकांचे टेलिफोन व ब्रॉडबँड कनेक्शन तुटले. लॉकडाऊनपासून अनेकजण घरूनच ऑनलाईन काम करत आहेत. त्यांना इंटरनेट सेवेचा त्याप्रमाणात स्पीड मिळत आहे. परंतू मोबाईलचा खर्च परवडत नाही. दरम्यानच्या काळात अनेक गावात रस्त्यांचे रूंदीकरण, डांबरीकरण, मजबुतीकरणासाठी राज्यमार्गासह गावालगतच्या अनेक रस्त्यांची खोदाई झाली. जेसीबीने झालेल्या कामात भारत संचार निगमच्या मालकीची केबल अनेक ठिकाणी उध्वस्त झाली पर्यायाने ही सेवा कोलमडली.

भोकर येथे आशांकूर महिला केंद्र, दोन सीएससी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय या व्यतीरिक्त अनेक सधन कुटूंबांकडे ब्रॉडबँड कनेक्शन होते परंतू केबल तुटल्यानंतर त्यांनी गप्प बसने पसंत केले. अशीच परीस्थीती घुमनदेव व कमालपूर गावांची आहे. प्रत्यक्षात यापुर्वी खेडेगावात कुठल्याही खोदाई दरम्यान सरकारी यंत्रणेला व साधनांना इजा पोहचविली किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबधीत व्यक्ती अथवा ठेकेदार यांचेकडून संबधीत विभागाने वसुली केल्याचे सर्वश्रूत आहे. परंतू येथे शेवटच्या घटका मोजत असलेल्या एक्सचेंजच्या कर्मचार्‍यांनी याकडे डोळेझाक केली. श्रीरामपूर कार्यालयातील संबधीतांकडूनही दुर्लक्ष झाले. त्यामुळे या तीनही गावातील टेलिफोन व इंटरनेट सेवा ठप्प झाली.

पुर्वी अशा खोदकामादरम्यान केबल तुटल्यास तातडीने जोडली जायची व त्याचा खर्च दंडासह संबधीत व्यक्ती किंवा ठेकेदाराकडून वसुल केला जायचा. मग आता तसे का घडत नाही, यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. टाकळीभान येथील टेलिफोन एक्सचेंजही सध्या अधिकृत कर्मचार्‍याअभावी रामभरोसे दिसत आहे. येथील ब्रॉडबँड सेवा पुरविण्यासाठी ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करण्यात आला परंतू संबधीत व्यक्तीही यात उत्साही नसल्याने बीएसएनलला ग्राहक असूनही मोठा फटका बसत आहे.

ग्रामीण भागातील अनेक जण मागणी असतानाही बीएसएनएलच्या ब्रॉडबँड सेवेपासून वंचीत आहेत. संबधीतांस याबाबत विचारणा केली असता, मला लगतच्या खेडोपाडी केबल पुरविणे अशक्य आहे. ‘तुम्ही केबल आणुन द्या, मी सेवा पुरविण्यास तयार आहे’ असे सांगितले जात असल्याने ग्राहक हातबल झाल्याचे दिसत आहे.

संबधीत ठेकेदाराला केबल उपलब्ध करून द्यायची की, ग्राहकांनी घेवून द्यायची, की बीएसएनएल देणार या वादात तीन वर्षापासून या तीन गांवातील ग्राहक टेलिफोन व ब्राँडबँड सेवेपासून वंचीत आहे. हा ठेका दुसर्‍या व्यक्तीस देवून मागणीची पुर्तता करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. याबाबत काही ग्राहकांनी टेलिफोन विभागाचे श्री. जोशी यांचेशी संपर्क साधला असता, आमच्याकडे केबल नाही, मनुष्यबळ नाही, त्यामुळे संबधीत गावांना कनेक्शन देणं शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ भारत संचार निगम हातबल झाल्याचे दिसत असल्याने याप्रश्नी खा. सदाशिव लोखंडे यांनी लक्ष घालून ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *