ध्यास स्वप्नपूर्तीचा : स्टार्टअप डेस्टिनेशनच्या जनजागृतीसाठी

0
मतदारसंघाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच देशहिताचे प्रश्न संसदेत उपस्थित करत ते सोडविण्याचा प्रयत्न केला. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विमानसेवा, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटी पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक विकासासाठी उद्योग, आय.टी, स्टार्टअपला चालना देत रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले. नदीजोड प्रकल्प, कृषी टर्मिनल, त्र्यंबकचा प्रसाद योजनेत समावेश आदी कामे दृष्टिपथात आहेत.

हेमंत गोडसे, खासदार

रेल्वे व्हिल कारखाना विस्तारीकरण
1983 साली माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी नाशिक येथे रेल्वे इंजिन बनविण्यासाठी 250 एकर जागा आरक्षित केली होती. नाशिकमध्ये रस्ते, पाणी, वीज आदी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असूनही गेली 35 वर्षे या कारखान्याचे विस्तारीकरण होऊ शकले नाही. यासंदर्भात तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश गोयल आणि विद्यमान मंत्री पीयूष गोयल यांच्या पाठपुरावा केला असता, व्हील रिपेअर कारखान्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. कर्षन मशिन कारखान्यामुळे उद्योगात वाढ होणार आहे. औद्योगिक वसाहतीत असणार्‍या कंपन्यांनाही काम मिळणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे.

रेल्वे विकास
नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारकडून सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राकडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. सदर प्रकल्प नीती आयोगाकडे व प्लॅनिंग विभागाकडे आहे. या प्रकल्पामुळे नाशिक, पुणे आणि अहमदनगर हे तीन जिल्हे जोडले जाणार आहे. यामुळे व्यापार व उद्योगालाही चालना मिळणार आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होणे अपेक्षित आहे. नाशिक- मुंबई पंचवटीला पर्याय असलेली राज्यराणी लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत जात होती, ती छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत जावी, अशी प्रवाशांची मागणी होती. प्रवासी संघटनेचा प्रस्ताव न्यायालयाने फेटाळला. मात्र, यासंदर्भात पाठपुरावा करून राज्यराणी सीएसटी पर्यंत नेली यातून प्रवाशांना दिलासा मिळाला. \

द्वारका ते दत्तमंदिर उड्डाणपूल
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 व सिन्नर फाट्यापासून राष्ट्रीय महामार्ग 160 यामधील 5.9 कि.मी. अंतर हे मनपा अखत्यारित आहे. नाशिक मनपा इतका खर्च करू शकत नाही म्हणून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करावा, अशी मागणी आपण केली होती. या प्रस्तावाला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वतः मान्यता दिली. त्यानुसार तांत्रिक सल्लागार नेमून हे प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. यापुलामुळे आडगावकडून जाणार्‍या वाहनांना जर नाशिक पुणे मार्गावर जायचे असेल, तर हा पूल द्वारकाजवळ प्रस्तावित पुलाशी जोडण्यात येणार आहे. \

रस्ते विकास
नाशिक शहरातील राष्ट्रीय महामार्ग 3 वर अमरधाम व जत्रा क्रॉसिंग येथे वाहतूक कोंडी होते आणि परिणामी अपघात घडतात. राष्ट्रीय महामार्गाला शहराच्या आतील 300 फुटी रिंगरोड हा अमरधाम क्रॉसिंगला व शहराच्या बाहेरील 200 फुटी रिंगरोड जत्रा क्रॉसिंगला येत होता. तेथे उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक होते. यासंदर्भात केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असता उड्डाणपुलासाठी 404 कोटी रुपयांच्या कामास मंजूर देण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कामाला सुरुवात झाली आहे. नाशिक-पेठ या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्ग 848 मध्ये वर्गीकरण होते. परंतु धागूरच्या पुढे नाशिक शहर वर्दळीचे शहर असल्याने नियमाप्रमाणे विकास करणे अवघड होते. त्याचबरोबर गुजरातवरून पेठमार्गे येणारी वाहतूक नाशिक शहरात का यावी, हाही प्रश्न होता. त्याकरता आपण धागूर, गिरणारे वाडीवर्‍हे हा राज्य महामार्ग 848 मध्ये करावा तसेच उर्वरित वाडीवरहे साकुर शिंदे, सै.पिंप्री हा 73 कि.मी चा राज्यमार्ग 37 याचेही वर्गीकरण राष्ट्रीय महामार्गात करण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार असून, यामुळे शहरात येणारी अवजड वाहतूक या मार्गाने वळविण्यात येणार असून, शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

स्मार्ट व्हिलेजला मंजुरी
युवांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता असून देखील नाशिकचे टॅलेन्ट नाशिकमध्ये न वापरता पुणे, बंगरूळू अशा ठिकाणी स्थलांतरित होतात. याकरिता कौशल्य विकास विभागाचे सचिव दीपक कुमार त्यानंतर आसिम गुप्ता यांच्याशी पाठपुरावा केला. काही तज्ज्ञांकडून नाशिकमध्ये स्टार्ट अप विकसित होण्यासाठी सूचना मागविल्या होत्या. तसे आपण महाराष्ट्र शासनास कळविले होते. त्यानुसार नाशिकला स्टार्टअप व्हिलेज, इन्क्युबेशन प्रोग्रामला, एक्सलरेअर प्रोग्रामला मंजुरी मिळाली. मात्र, त्यावर न थांबता नाशिक स्टार्टअप पॉलिसीसंदर्भात वर्कशॉपचेही आयोजन केले. जेणेकरून स्थानिक युवकांना पॉलिसी लक्षात यावी. या माध्यमातून मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये स्टार्टअप पार्क उभारण्यात येऊन नवउद्योजकांना संधी मिळणार आहे.

कृषी टर्मिनलच्या माध्यमातून निर्यातीला प्राधान्य
शेतकर्‍यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, शेतीमालाला चांगला भाव मिळावा, तसेच नाशवंत फलोत्पादनाला सुविधा मिळाव्यात, यासाठी सय्यदपिंप्री येथे 100 एकरवर कृषी टर्मिनल उभारण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी मंत्रालयात लागलेल्या आगीत या टर्मिनलचा प्रस्तावाच्या फाईल जळून गेल्या होत्या. मात्र, आपण यासंदर्भात पाठपुरावा करून या प्रकल्पाला मंजुरी मिळावली. यामुळे कृषी उत्पादनांची निर्यात वाढणार असून, जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. तसेच शेतकर्‍यांंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यामुळे उपलब्ध होईल.

कृषी संशोधनाला वाव
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील सावतामाळीनगर येथे 100 एकर जागेवर नाशिकसाठी कृषी महाविद्यालय व्हावे, यासाठी पाठपुरावा करून या महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचा बृहत आराखडा तयार नसल्याने सध्या हा प्रस्ताव प्रलंबित आहे. पुणे कृषी परिषदेचे अध्यक्ष यांनी हा आराखडा शासनाकडे सादर केला आहे. त्यामूळेे लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल. यामुळे शेतीविषयक मार्गदर्शन मिळण्यासाठी कृषी महाविद्यालय सोयीस्कर ठरेल.

ऑनलाईन आरोग्य सेवा
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सुलभ व्हावी, याकरिता लवकरच टेलीमेडीसीन सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयासोबतच सिन्नर, पांढुर्ली, ठाणगांव, देवपूर, सैय्यद पिंप्री, जातेगाव, त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रे इंटरनेटव्दारे जोडली गेली आहेत. ग्रामीण भागातील रूग्णांना नेत्रतपासणी, हृदयरोग तपासणी या सेवा तेथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यकसेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तज्ज्ञ डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सल्ला घेऊन उपचार केले जातात. त्यामुळे ग्रामीण भागात उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य मिशन या योजनेंतर्गत माता व बाल संगोपन केंद्र विकास रूग्णालयासाठी 100 खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे.

व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम
जोपर्यंत औद्योगिक विकास होत नाही, तोपर्यंत रोजगार निर्मिती शक्य नाही. देशात मेक इन इंडिया, राज्यात मेक इन महाराष्ट्र प्रोग्राम राबविले जात असतांना नाशिकच्या उद्योजकांच्या पुढाकाराने मेक इन नाशिक उपक्रम आयोजित करण्यात आला. मात्र यावर न थांबता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये व्हेंडर डेव्हलपमेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात एचएएएल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझंगाव डॉक, मिश्रा धातू, अशा नउ नामवंत कंपन्यांनी सहभाग नोंदवला. नाशिकमधील अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांना अधिक काम मिळेल. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.

विमान सेवेव्दारे सात शहरे जोडणार
कोणत्याही शहराचा विकास करताना तेथे मोठे उद्योग येण्यासाठी विमानसेवा ही अत्यावश्यक बाब आहे, याकरिता केंद्राच्या उडान योजनेत नाशिकचा समावेश करण्यात आला. पहिल्या टप्प्यात नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे ही सेवा सुरू करण्यात आली. काही कारणास्ताव कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही सेवा बंद झाली, याकरिता दिल्लीत आंदोलन केले. कालांतराने ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. तसेच ‘उडान’च्या दुसर्‍या टप्प्यात दिल्ली, हैद्राबाद, बंगरूळू, गोवा, अहमदाबाद, भोपाळ, हिंडण गाझियाबाद या शहरांना जोडले जाणार आहे. नाशिक देशातील तिसरे शहर आहे की, उडान योजनेंतर्गत देशातील तीन मुख्य शहरांना जोडले जाणार आहे.

डिजिटल शिक्षण
नाशिक महापालिका, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण गुणवत्तेदार आणि दर्जेदार व्हावे, या हेतूने शहर आणि ग्रामीण भागातील शाळा इंटरनेटद्वारे जोडण्यात येऊन ई लर्निंग प्रणाली, डिजिटल शिक्षण पद्धतीचा विकास करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर नाशिक मनपा शाळा क्रमांक 16 मध्ये व्हर्च्युअल क्लासरूमचा शुभारंभ करण्यात आला. मनपा हद्दीतील सहा मनपाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, या प्रत्येक तालुक्यातील एक शाळा अशा दहा शाळा इंटरनेटने जोडून व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे मनपा व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण गुणवत्तेदार आणि दर्जेदार होण्यास मदत होईल.

रामायण सर्किट, प्रसादमधून धार्मिक विकास
नाशिक शहर हे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्रांची पावनभूमी, बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर येथील ज्योर्तिलिंग यामुळे नाशिकमध्ये धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर आहे. याचा विचार करून केंद्राच्या पर्यटन विकास विभागांतर्गत रामायण सर्किट या संकल्पनेत नाशिकचाही समावेश करण्यात आला आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे वास्तव्याच्या खुणा आहेत, अशा स्थळांचा विकास यात होणार आहे. नाशिकमधील रामकुंड, पंचवटी, रामसृष्टी, सर्वतीर्थ टाकेद, लक्ष्मणरेषा, सीता सरोवर, कावनई, अंजनेरी, रामशेज या स्थळांचा विकास याद्वारे केला जाणार आहे. सध्या तांत्रिक समितीकडून याचा सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत प्रसाद योजनेंतर्गत राज्यातून एकमेव त्र्यंबकेश्वर या तीर्थाची निवड करण्यात आली आहे. धार्मिक पर्यटन हा केंद्रबिंदू ठेवून भाविकांना लागणार्‍या सुविधांचा विकास यातून केला जाणार आहे. याकरिता 202 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

कुंभमेळा पोहचवला जगाच्या पटलावर
सिंहस्थ कुंभमेळा हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे. याचा समावेश युनेस्कोच्या यादीत करावा अशी मागणी त्र्यंबकेश्वरच्या ट्रस्टी ललिता शिंदे यांनी केली होती. यासंदर्भात सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार अहवाल तयार करण्यात येऊन मंत्रालयाला सादर करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्राने पॅरीस येथे युनेस्कोकडे पाठवला व सिंहस्थ कुंभमेळा युनेस्कोच्या अमृत महोत्सव यादीत समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे जगाच्या पटलावर या उत्सवाची दखल घेतली गेली आहे. यामुळे भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेला हा उत्सव जागतिक उत्सव झाला आहे.

पुरातन वास्तूचे जतन
सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर या जन्मगावी सावरकर वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले. यामुळे हा वास्तूचे जतन होऊन भावी पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा यातून मिळेल. नाशिक येथील पुरातन सुंदर नारायण मंदिरचेही नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, याकरिता 12.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच अंजनेरी येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिराचे नूतनीकरणाचे कामालाही मंजुरी मिळाली आहे. शहरातील हा ऐतिहासिक वारसा जपला जावा; त्याचे जतन होऊन नव्या पिढीला यातून इतिहासाची ओळख व्हावी, याकरिता पुरातत्त्व विभागामार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे.

नाशिक होईल इलेक्ट्रिक हब
मौजे शिलापूर येथील 100 एकर जागेत इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबोरेटरी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या या जागेच्या कम्पाउंड वॉलचे काम सुरू आहे. लवकरच इमारत व लॅबचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे वीज क्षेत्रातील उपकरणे व यंत्रनिर्मिती प्रकल्पाला संधी मिळेल. याअगोदर इलेक्ट्रिक टेस्टिंगसाठी भोपाळ, बेंगलोरला जावे लागत होते. आता ते नाशिकमध्ये होईल त्यामुळे वेळ आणि पैशांचीही बचत होणार आहे. या माध्यमातून रेाजगारही उपलब्ध होईल.

आयटी उद्योगाला चालना
नाशिक शहरात अनेक आयटी उद्योजक शहराच्या विविध ठिकाणी काम करतात. त्यामुळे 90 टक्के आयटी उद्योजकांनी रजिस्टे्रशन केलेले नाही. या सर्व आयटी उद्योजकांनी एका छताखाली येऊन काम करावे जेणेकरून नाशिकमध्ये आयटी चळवळ उभी राहील, या उद्देशाने औद्योगिक वसाहतीत 30 हजार चौ. फुटांची इमारत कमी भाडेतत्त्वावर द्यावी, अशी मागणी उद्योगमंत्र्यांकडे केली. याला मान्यता मिळाली असून, यामुळे आयटी उद्योगाला चालना मिळेल.

LEAVE A REPLY

*