Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नरच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला गेले तर उद्रेक होईल

Share

नाशिक | प्रतिनिधी

दुष्काळाच्या खाईत वर्षानुवर्षे लोटलेल्या सिन्नर तालुक्याचा दुष्कळी तालुका असा कलंक पुसण्यासाठी साकारण्यात येणाऱ्या गारगाई-वैतरणा-कडवा-देव या प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाचे पाणी मराठवाडयाला देण्याच्या शासनाचा निर्णय रोखावा. सिन्नरचे पाणी जर मराठवाड्यासाठी सोडले तर सिन्नरवर अन्याय होईल परिणामी नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय रोखून मराठवाड्यासाठी स्वतंत्र योजना आखावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.

खा. गोडसे म्हणाले,  सिन्नरच्या प्रस्तावित नदी जोड प्रकल्पातील पाणी मराठवाडयाकडे वळविल्यास सिन्नर तालुक्यांवर मोठा अन्याय होईल. मराठवाडयाला अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्यासाठी शासनाने कोकण खो-यावर नवीन स्वतंत्र नदीजोड प्रकल्प तयार करावा असा पर्याय गोडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश मजन यांच्याशी चर्चा करतांना सुचविला.

सिन्नर तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी खासदार गोडसे आणि जलचिंतन संस्था यांच्या प्रयत्नातून साकारात असलेल्या गारगाई-वैतरणा-कडवा-देव नदीजोड प्रकल्पातील प्रस्तावित पाणी मराठवाडयाला देण्याचा निर्णय नुकताच राज्यशासनाने घेतला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे सिन्नर तालुक्यासह अवघ्या जिल्हयांत खळबळ उडाली आहे.मराठवाडयाला पाणी वळविण्याच्या शासनाच्या निर्णयाला सिन्नर तालुक्यातील राहिवाशांकडून कडाडून विरोध होत आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार गोडसे यांनी आज मुंंबई येथे जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली. दुष्काळी परिस्थितीतून मुक्तता करण्यासाठी खासदार गोडसे आणि जलचिंतन संस्थेचे राजेंद्र जाधव यांनी तीन वर्षापासुन काम सुरु केले होते.

वैतरणेची उपनदी गारगाई-पिंजाळ व दमणगंगेच्या उपनद्या वाघ व वाल या पश्चिम वाहिनी नद्यांवर धरणे बांधून थेट पाईप लाईनद्वारे पाणी कडवा धरणात टाकण्याचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे सात टीएमसी अतिरिक्त पाणी सिन्नर तालुक्याला मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी जलसंपदा मंत्रालयाने तेवीस कोटी रुपये मंजूर केलेले असून सत्तर टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले आहे. नदीजोड प्रकल्पामुळे येत्या काही वर्षात तालुका सुजलाम सुफलाम होणार असल्याने तालुकावासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अशातच राज्य शासनाने वरील नदीजोड प्रकल्पातून निर्माण होणारे अतिरिक्त पाणी मराठवाडयाकडे वळविण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हयावासियांमध्ये विशेषत: सिन्नर तालुकावासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिन्नर तालुक्यासाठी मोठया शर्थीने प्रस्तावित केलेल्या नदीजोड प्रकल्पातील पाणी मराठवाडयासाठी जाणार असल्याची गंभीर दखल घेत आज खासदार गोडसे यांनी मुंबईत जावुन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि विभागाचे प्रधान सचिव चहल यांची भेट घेतली.

नदीजोड प्रकल्पातून सिन्नरसाठी प्रस्तावित असलेले पाणी मराठवाडयाला वळविल्यास सिन्नरकरावर मोठा अन्याय होईल. सिन्नरकरांच्या भावनांचा उद्रेक होवून जनक्षोप तयार होईल तसेच दुष्काळग्रस्त म्हणून तालुक्याची असलेली ओळख पुसली  जाणार नसल्याने तालुक्यातील शेती आणि उद्योगांचा विकास होणार नाही असे स्पष्ट करत गोडसे यांनी प्रस्तावित नदीजोड प्रकल्पातून मराठवाडयाकडे पाणी वळविल्यास विरोध केला आहे.

सिन्नरचा वाटा हिरावू देणार नाही

मराठवाडयाला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र त्यासाठी कोकण खो-यावर नवीन स्वतंत्र नदीजोड प्रकल्प प्रस्तावित करावा. जे काही करावे लागेल ते सर्व काही करु परंतू सिन्नरकरांसाठी प्रस्तावित केलेल्या नदीजोड प्रकल्पातील पाणी मराठवाडयाकडे जावू देणार नाही.

हेमंत गोडसे, खासदार, देवळाली लोकसभा मतदारसंघ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!