गांधीगिरीने खा. गांधी यांचा निषेध

0

रस्ता ठिकठिकाणी उखडला

कोंढवड (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील ग्रामस्थांनी कोंढवड ते उंबरे या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचे चक्क ‘खासदार दिलीप गांधी महामार्ग’ असे बारसे करून गांधीगीरी मार्गाने लोकप्रतिनिधींचा निषेध केला. विशेष म्हणजे या मार्गाचा फलक या खराब रस्त्यावर लावण्यात आला असून त्यावर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार असा उपरोधिक उल्लेख केल्याने परिसरात तो चेष्टेचा विषय बनला आहे.

गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या कोंढवड-उंबरे रस्ता हा परिसरातील जनतेच्या व शनिशिंगणापूरला जाणार्‍या भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कोंढवड येथील उंबरे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांनी पाटाचे पाणी साचल्याने वाटसरूंना प्रवास करताना खड्ड्यातून रस्ता शोधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यारस्त्याची तातडीने दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा करूनही लोकप्रतिनीधींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या या रस्त्याचे अनेक वर्षापासून काम झालेले नाही. या रस्त्यावरून नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी, शिंगणापूरला जाणार्‍या भाविकांची वर्दळ असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खाचखळगे असून त्यातच पाटाचे व पावसाचे पाणी या खड्ड्यात साचत असल्याने वाहने चालविताना गावकर्‍यांना व प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तसेच वेड्याबाभळींनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने हा रस्ता ठिकठिकाणी अरुंंद झाला आहे. या भागातील शेतकर्‍यांना या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. खासदार गांधी यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राहुरी तालुका वगळता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून अन्य तालुक्यांतील रस्त्यांना निधीची खिरापत वाटली. मात्र, राहुरी तालुक्यातील एकाही रस्त्याला त्यांनी छदामही दिला नाही.

विकासनिधीच्या बाबतीत खा. गांधी हे राहुरी तालुक्याला सावत्रपणाची वागणूक देत असल्याने नागरिक व शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे.  त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गांधीगिरी करून आपला निषेध व्यक्त केलो. यावेळी कोंढवडचे उपसरपंच विजय म्हसे, शिलेगावचे सरपंच रमेश म्हसे, सेवा संस्थेचे जगन्नाथ म्हसे, क्रांतिसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, प्रदेश कार्याध्यक्ष संदीप ओहळ, जिल्हाध्यक्ष जालिंदर शेंडगे, तालुकाध्यक्ष संदीप उंडे, शेतकरी सेलचे गोरक्षनाथ म्हसे, अनिल म्हसे, अनिल हिवाळे, किशोर म्हसे, अर्जुन म्हसे, आकाश म्हसे, विनोद म्हसे, विकास हिवाळे, राहुल म्हसे, पप्पू हिवाळे, यशोदीप म्हसे, रोहित पवार, शुभम म्हसे, बबलू औटी, राजेश्‍वर औटी, मोनू म्हसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*