MOVIE REVIEW : फास्टर फेणे

0

प्रसिध्द लेखक भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणेने आबालवृद्धांच्या मनावर गारुड केले होते. आजही अनेकांकडे फास्टर फेणेची पुस्तके आहेत.  डीडी नॅशनल चॅनेलवर 1983 साली फास्टर फेणे ही मालिका सुरु झाली होती. त्यात फास्टर फेणेची भूमिका सुमीत राघवन याने केली होती. या मालिकेला अनेकवर्षे झाली तरी त्या मालिकेची अनेकांच्या मनात असलेली आठवण अजूनही कायम आहे. क्षितीज पटवर्धन आणि आदित्य सरपोतदार यांनी त्यांच्या लेखणीतून भागवतांच्या फेणेला अगदी नव्या स्वरुपात लोकांसमोर आणले आहे. रितेश देशमुख यानी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

कथा : चित्रपटातला फास्टर फेणे हा आता 20 वर्षांचा झालेला आहे. नायक बनेश फेणे (अमेय वाघ) हा फार हुशार, तीक्ष्ण बुद्धीचा आहे. बनेश कोल्हापुरहून पुण्याला मेडिकल शाखेच्या प्रवेशपरिक्षेसाठी आले असता त्याच्यासमोर आत्महत्येची घटना घडते. कुठे काही चुकीचे घडले की संवेदनशील फास्टर फेणे स्वस्थ बसणे शक्यच नसते. मुळात हेरगिरी करण्याचाच स्वभाव असल्यामुळे तो स्वतःहून या घटनेचा मागोवा घेतो. त्याचा या घटनेच्या मुळाशी जातानाचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. हे सारे प्रयत्न सुरु असताना फास्टर फेणेला त्याची बालमैत्रिण अबोली भेटते. जस जसा फेणे घटनेच्या मुळाशी जातो तसा तो अधिक संकटात सापडत जातो. या सगळ्यात त्याच्या जवळच्या माणसांवर केले गेलेले हल्ले त्याला घटनेच्या मुळापर्यंत पोहोचू देतात की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.

अभिनय : फास्टर फेणेची भूमिका अमेय वाघ याने केली असून ती त्याने अत्यंत समंजसपणे साकारली आहे. उत्तम भूमिका झाली अाहे ती भा. रा. भागवत रंगविणाऱ्या दिलीप प्रभावळकरांची. पर्ण पेठे ही एक सुजाण अभिनेत्री आहे. तिला नेमून दिलेली अबोली या महिला पत्रकाराची भूमिका पर्णने व्यवस्थित साकारली आहे. या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे गिरीश कुलकर्णी हे खलनायकी भूमिकेत आहेत. गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेला आप्पा हा काही वेळेस त्यांच्या क्रूर अदाकारीने प्रेक्षकांच्या संतापाचाही धनी होतो. सिनेमात अमेयचे काम हे नक्कीच कौतुकास्पद असले तरी संपूर्ण सिनेमा हा जणू गिरीश कुलकर्णीसाठीच तयार केला असावा असे वाटते. सिनेमाच्या सुरूवातीपासून ते शेवटापर्यंत गिरीशवरचे लक्ष हटत नाही. अमेय आणि गिरीश यांच्यातील जुगलबंदी ही सिनेमाची जमेची बाजू आहे. या चित्रपटात अंबादास पाटील या रिक्षाचालकाची भूमिका सिद्धार्थ जाधवने साकारली आहे. अंबादासच्या भूमिकेला काहीही आकारउकार नाही. त्याची भूमिका मुळ कथानकात सपशेल विजोड वाटते. मुळात कथानकात एक पाहुणा सेलिब्रिटी कलाकार हवा अशी खरच काही गरज नव्हती.  शुभम मोरे (भू भू), चिन्मयी सुमित (फास्टर फेणेची आई), श्रीकांत यादव (इन्स्पेक्टर जयंत सोलापूरकर) आदी कलाकारांनी फास्टर फेणेला योग्य साथ दिली आहे.

संगीत : ट्रॉय- आरिफ यांचे बॅकग्राऊंड आणि मिलिंद जोग यांची सिनेमॅटोग्राफी या दोन्ही गोष्टी सिनेमाची कथा पुढे नेण्यास महत्वाची भूमिका बजावतात.

दिग्दर्शन : आदित्य सरपोतदारने फास्टर फेणे हा चित्रपट दिग्दर्शित केला अाहे. माहिती तंत्रज्ञान युगातील फास्टर फेणे दाखविताना त्याला युवकावस्थेत प्रेक्षकांसमोर आणणे व सादर करणे हा चांगला निर्णय चित्रपटलेखक क्षितिज पटवर्धन तसेच दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी घेतला. फास्टर फेणे हा चित्रपट प्रारंभापासून शेवटापर्यंत कुठेही कंटाळ‌वाणा होत नाही हे त्याच्या दिग्दर्शनाचे मोठे यश आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश देशमुखचा डान्स असलेले एक गाणे विविध वाहिन्यांवर गेले अनेक दिवस वाजत आहे.  चित्रपटाचे छायाचित्रण व बाकीच्या तांत्रिक बाजू उत्तम आहेत.

पाहावा कि नाही :  ‘फास्टर फेणे’ आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी एकदा तरी नक्की हा सिनेमा पाहावाच.

 

LEAVE A REPLY

*