MOVIE REVIEW : ‘भिकारी’

0

‘पिचैक्करन’ हा तामिळ भाषिक चित्रपट ४ मार्च २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता यानंतर या चित्रपटाचे चार भाषांतील प्रवासानंतर हा चित्रपट मराठी भाषेचीही पायरी चढला. ‘पिचैक्करन’ हा मराठीत डब केला गेलेला नाही. तर ‘पिचैक्करन’च्या कथेचा गाभा घेऊन ‘भिकारी’ या नावाने मराठीत हा चित्रपट बनविण्यात आला.

कथा  : सम्राट जयकर (स्वप्नील जोशी) हा शारदादेवी जयकर उद्योजिकेचा मुलगा असतो. सम्राट जेव्हा ब्रिटनहून भारतात परततो, त्या दिवशी शारदादेवी एका जाहीर समारंभात सम्राट हा आता शारदादेवी मिल व उद्योगाचा संचालक असेल व  यापुढे तोच उद्योगाची सर्व धुरा सांभाळणार आहे अशी घोषणा करतात. सर्वकाही उत्तम चाललेले असताना एक दिवस शारदादेवी व सम्राट आपल्या मिलमध्ये पाहाणी करण्यासाठी फिरत असतात. त्यावेळी एका मशिनचा स्पेअर पार्ट तुटून तो शारदादेवी यांच्या डोक्यात आदळतो. या अपघातात शारदादेवी कोमात जातात. आईला आयुर्वेदिक, युनानी, होमिअॅपॅथिक असे सर्व प्रकारचे उपचार करवतो पण काहीही गुण येत नाही. एकेदिवशी तलावापाशी उभा असताना तेथे पुजाविधी करायला आलेल्या पुरोहित सम्राटला सांगतो की, तुझ्याकडे असलेले पैसे, दागिने या गोष्टी बाजूला ठेवून सुमारे ४८ दिवस लोकांकडे भीक मागून त्यावर जग. तसे जगण्यासाठी घरातून बाहेर पड. या दिवसांत तुझे खरे नाव कोणालाही कळू देऊ नको. रोज सकाळी अकरा वाजता तुझ्याकडे जितके पैसे असतील ते दान करुन टाक व रिकाम्या हातांनी पुन्हा भीक माग व त्यावरच जग. सम्राट आपली ओळख लपवून व भीक मागून ४८ दिवस राहू शकतो का? या पुण्यकर्माचे फळ म्हणून इश्वरी चमत्कार होऊन सम्राटची आई कोमाच्या बाहेर येते का? भिकाऱ्यांविषयी अत्यंत नफरत असलेली मधू ही सम्राट हा भिकारी आहे हे समजल्यावर सर्वप्रथम कशी प्रतिक्रिया देते? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे मिळवण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. 

अभिनय : आपली आई बरी व्हावी म्हणून मागेपुढे न पाहाणारा मुलगा म्हणजे सम्राट जयकर. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या एका ओळीभोवती हा सिनेमा फिरतो. सम्राटची भूमिका स्वप्नील जोशीने उत्तम साकारली आहे.
लुकमध्ये झालेला हा बदल फार सुखावह आहे. दाक्षिणात्य  चित्रपटांतील नायकाचा सगळा फॉर्म्युला स्वप्नील जोशी कोळून प्यायला आहे हे लक्षात येते. या चित्रपटात मधू या नायिकेची भूमिका करणारी ऋचा इनामदार हिचा हा पहिलाच चित्रपट आहे. ती नृत्यांमध्ये तरबेज आहे. मात्र ती अभिनयात कमी पडते. ती बोलत असलेले संवाद ऐकताना ती नवशिकी असल्याचा भास होतो. ऋचाचे व्यक्तिमत्व देखणे असले तरी संवाद म्हणताना तिच्या चेहेऱ्यावर त्या अनुरुप फारसे भाव उमटत नाहीत. सम्राटचा मामा विश्वनाथच्या भूमिकेत सयाजी शिंदे, सम्राटची आई किर्ती आडारकर, मधुची आई – पद्मश्री कदम, राजेशच्या भूमिकेतील गुरु ठाकूर, खलनायक असलेला मिलिंद शिंदे तसेच प्रदीप कबरे, जयंत गाडेकर, माधव अभ्यंकर, पार्थ आचरेकर आदी कलाकारांनी दिग्दर्शकाने सांगितले तसे स्वप्नीलला चित्रपटात साथ दिली आहे.
दिग्दर्शन : गणेश आचार्य हा मुळात नृत्यदिग्दर्शक. त्यानंतर तो चित्रपट दिग्दर्शक बनला. गणेश आचार्यने पिचैक्करन या तामिळ चित्रपटावरुन भिकारी हा मराठी चित्रपट रद्दड होऊ दिलेला नाही. पिचैक्करनमधील अनेक फ्रेम्स जशाच्या तशा भिकारी चित्रपटात बघायला मिळतात पण त्या अनुनयातला दाक्षिणात्य बटबटीतपणा गणेश आचार्यने दिग्दर्शनात टाळला आहे. स्वप्नील जोशी भिकाऱ्याच्या भूमिकेत शोभून दिसला आहे अशी दादही काही दृश्यांत द्यावीशी वाटते.
संगीत : भिकारी चित्रपटाला मिलिंद वामखेडेकर , विशाल मिश्रा यांनी संगीत दिले असून त्यातील आई संदर्भातले सोनू निगमने म्हटलेले एक गाणे चांगले जमले आहे.

 

LEAVE A REPLY

*