MOVIE REVIEW : ‘कच्चा लिंबू’

0
रेटिंग 4 स्टार

 

जयवंत दळवींच्या ‘ऋणानुबंध’ या कादंबरीवर आधारित `कच्चा लिंबू’ हा नवीन चित्रपट आज प्रदर्शित झाला.’कच्चा लिंबू’चे दिग्दर्शन अभिनेता प्रसाद ओकने केले असून त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे.

कथा : ‘कच्चा लिंबू’ ची कथा घडते तो काळ 1960-70 च्या काळात. ही कथा मुंबईतील गिरगाव (चर्नीरोड) या त्यावेळच्या अस्सल मराठमोठ्या भागात चाळीत राहाणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात घडते. या चा‌ळीतील एका खोलीत मोहन काटदरे व त्यांची पत्नी शैला काटदरे हे राहात असतात. त्यांना मुलगा हा गतिमंद आहे. त्याला ते लाडाने बच्चू असे म्हणत असतात. आपल्या खिशाला परवडतील ते सारे वैद्यकीय उपचार काटदरे दांपत्य बच्चूसाठी करतात. या उपचारांनंतरही तो बरा होत नाही हे दिसल्यानंतर ते विविध गुरुंकडे जातात, नवस बोलतात पण कशानेही गुण येत नसतो. मोहन काटदरे तारविभागात कायम रात्रपाळी करायचे व सकाळी घरी यायचे व सकाळी शैला काटदरे आपल्या नोकरीवर जायची. त्यामुळे सकाळी बच्चूला मोहन व रात्री बच्चूला त्याची आई शैला सांभाळायची. शैलाच्या शारिरिक गरजा नवऱ्याकडून पूर्ण होत नाहीत, आई म्हणूनही तिच्या वाट्याला नीट सुख नाही. त्यामुळे मनाचा प्रचंड कोंडमारा झालेली शैला आपले कार्यालयातले साहेब श्रीकांत पंडित यांच्याकडे आपले मन मोकळे करते. श्रीकांत पंडित शैला काटदरेला मदत करायचे ठरवितात. तिला कार्यालयामध्ये बढती मिळावी म्हणून शिफारस करतात. या सग‌ळ्या माहोलमध्ये मोहन काटदरेच्या कार्यालयातील वेंकटने आपला आजारी मुलगा कृष्णाला झोपेच्या ५५ गोळ्या दुधात मिसळून ते प्यायला लावलेले असते. त्यानंतर कृष्णा मरण पावतो. हे मोहनला सांगून टाकतो. मोहन या अनुभवाने हादरतो. पण बच्चूमुळे होणाऱ्या त्रासापासून कायमची सुटका करुन घेण्यासाठी मोहनला वेंकटने सांगितलेल्या सत्यातून एक मार्गही दिसू लागतो. श्रीराम पंडितांनी सुचविल्याप्रमाणे कंपनीच्या इन्स्पेक्शनचे कारण देऊन शैला दोन दिवस लोणावळ्याला पंडितांबरोबर फिरण्याची योजना आखते. ती मोहन काटदरे यांना खोटे सांगून लोणावळ्याला जायला निघते. दुसऱ्या बाजूला वेंकटने आपला मुलगा कृष्णाला कसे संपविले तो तपशील डोक्यात घेऊन त्याच मार्गाने बच्चूला कायमचे संपविण्यासाठी मोहन काटदरे उंदीर मारायचे औषध विकत घेतात. श्रीकांत पंडित यांच्या बरोबर शैला लोणावळ्याला जाऊन दोन दिवस राहाते का? आयुष्यात पारखी झालेली सुखे ती या मुक्कामात पंडितांकडून मिळवते का? मोहन काटदरे उंदरांना मारायचे औषध दुधात मिसळून ते बच्चूला प्यायला देऊन मारतात का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उकल होण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.

अभिनय : शैला काटदरेच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी व मोहन काटदरे यांच्या भूमिकेत रवी जाधव वावरले आहेत. सोनाली कुलकर्णीने मध्यमवर्गीय व मध्यमवयीन मराठी नोकरदार स्त्री उत्तम साकारली आहे. आयुष्यातल्या साऱ्या इच्छा बाजूला सारलेले मोहन काटदरे रवी जाधव यांनी तरलतेने साकारले आहेत. रवी जाधव यांच्या अभिनय कामगिरीमुळे सोनाली कुलकर्णी हिच्या भूमिकेला अधिक उठाव आला आहे. शैला काटदरेच्या साहेबाची म्हणजे श्रीकांत पंडित याची भूमिका सचिन खेडेकर यांनी  प्रगल्भतेने केली आहे.

दिग्दर्शन : अभिनेता प्रसाद ओक याने पहिल्या पदार्पणातच अतिशय परिपक्व दिग्दर्शन केलेले आहे. बच्चू या गतिमंद मुलामुळे मने पार उद्‌ध्वस्त झालेल्या काटदरे कुटुंबाचे चित्रण करायचे होते. काटदरे दांपत्याच्या जीवनात काही वाईट म्हणजे कृष्णवर्णीय व काही बऱ्या म्हणजे धवल गोष्टीही आहेत. पण काटदरेंची मने उद्ध्वस्त झाली आहेत हे दाखविण्यासाठी व ते प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यासाठी प्रसाद ओक यांनी कच्चा लिंबू चित्रपटातील सात-आठ रंगीत दृश्ये वगळता बाकीचा सारा चित्रपट कृष्णधवल ठेवला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेला हा प्रयोग वेगळा व त्यांची कलात्मकता दाखविणारा आहे. जयवंत दळवींच्या आणखी काही साहित्यकृतींवर प्रसाद ओक यांना भविष्यात चित्रपट बनवायचे आहेत. साठ-सत्तरच्या दशकातील मुंबईतील वातावरण उभे करताना तेव्हाचे सारे तपशील कच्चा लिंबूमध्ये दिग्दर्शकाने अतिशय बारकाईने व अचूक दाखविले आहेत.

संगीत : कच्चा लिंबू या चित्रपटाला राहूल रानडे यांनी संगीत दिले असून गाणी संदीप खरे यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाच्या अखेरीस एक गाणे येते ते म्हणजे `माझे आई बाबा माझे आई बाबा स्पेशल आईबाबा देवाजीचे दोन हात सारे आई बाबा.’ हे गाणे अवधूत गुप्ते याने अतिशय तरलपणे गायले असून त्या गाण्यातून या चित्रपटाचे जणू काही सारे सारच उलगडते.

 

LEAVE A REPLY

*