Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आंदोलन प्रकरणी गडाखांवरील खटल्याच्या कामकाजास सुरुवात

Share

गडाख आज न्यायालयात उपस्थित राहतील का याबाबत चर्चा

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- शेतकर्‍यांच्या प्रश्नावर माजी आमदार शंकरराव गडाख यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रकरणी दाखल खटल्याच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली असून लवकरच त्यांच्यावर दोषारोप निश्चिती होणार असल्याची माहिती समजली आहे. गडाख आज न्यायालयात उपस्थित राहणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर माजी आमदार गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील घोडेगाव, वडाळा बहिरोबा येथे केलेली रस्ता रोको आंदोलने संपूर्ण राज्यात गाजली होती. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शांततेच्या मार्गाने झालेल्या आंदोलकांवर गुन्हे न नोंदविण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याप्रमाणे राज्याच्या विविध भागांतून याची अंमलबजावणीही करण्यात आली होती. मात्र राजकीय आकसातून राजकीय दबाव टाकून नेवासा तालुक्यात गडाख यांच्यासह असंख्य शेतकरी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यातून गुन्हा न्यायालयात वर्ग झाल्यानंतर न्यायालयाचे समन्स गडाख यांच्यापर्यंत पोहचू न देता त्यांना याबाबत अनभिज्ञ ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.

न्यायालयाने वारंवार समन्स काढूनही गडाख उपस्थित न राहिल्याने अखेर न्यायालयाने अटक वॉरंट काढून त्यांना पकडून हजर करण्याचा आदेश दिला. यानंतर राजकीय दबावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकरवी एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे गडाख यांच्या शोधार्थ मोहीम राबविण्यात येऊन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील निवासस्थानाची झडती प्रकरण घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या गदारोळानंतर गडाख यांनी स्वतःहून न्यायालयात हजर होऊन या गुन्ह्यांप्रकरणी रीतसर जामीन मिळवला होता.

दरम्यान, गडाख यांच्यावरील शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर या दाखल खटल्यांच्या न्यायालयीन कामकाजास ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सुरुवात झाली असून गुरुवारी या सर्व खटल्यांची एकाच दिवशी तारीख देण्यात आली आहे. न्यायालयीन खटल्यास उपस्थित राहण्याबाबत न्यायालयाने त्यांना यापूर्वीच तोंडी समज दिलेली असल्याने निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असलेल्या गडाख यांची त्यामुळे चांगलीच गोची झाल्याची चर्चा आहे. गुरुवारी सकाळी गडाख यांचा राष्ट्रवादीसोबत महत्वाचा मेळावा होणार असतानाच त्यांना याचवेळी न्यायालयातही उपस्थित राहणे बंधनकारक असल्याने ते हे सर्व कसे जुळवून आणतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!