Tuesday, April 23, 2024
Homeनगरसंकेत धावणे यांचे यूपीएससी परीक्षेत यश

संकेत धावणे यांचे यूपीएससी परीक्षेत यश

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावचा भूमिपुत्र व राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. गोकुळ धावणे यांचा सुपुत्र संकेत याने यूपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादित केले. त्याने राज्यात 12 वे तर देशात 727 वे स्थान पटकावले. संकेत हा यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारा प्रवरा परिसरातील पहिला मराठा तरुण आहे.

- Advertisement -

लोणी बुद्रुक येथील शेतकरी आणि पंचवीस व्यक्तींच्या एकत्रित आदर्श कुटुंबातील संकेत बालपणापासून हुशार होता. बाभळेश्वर येथील विद्या विकास पब्लिक स्कुलमध्ये त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. लोणीच्या विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातून त्याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुणे येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने बी.ई. मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण करताना कॉलेज टॉपरचा मान मिळवला.

शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता केंद्रीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्धार करीत संकेतने तयारी सुरू केली. आई-वडील आणि सर्व कुटुंबाचे भक्कम पाठबळ मिळाल्याने संकेतचा आत्मविश्वास दुणावला. दिल्ली येथील वाजीराम क्लासेस जॉईन करून त्याने आपली तयारी केली. दुसर्‍याच प्रयत्नात संकेत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाला. करोनाच्या संकटामुळे परीक्षा पुढे ढकलली पण तो निराश झाला नाही.त्याने जिद्द आणि चिकाटीने यश मिळवलेच.

द्राक्ष बागायतदार संघ पुणे विभागाचे अध्यक्ष रामभाऊ धावणे व द्राक्ष तज्ज्ञ गोरक्ष धावणे यांचा संकेत हा पुतण्या आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील ,आ. आशुतोष काळे यांनी दूरध्वनिवरून संकेत व धावणे कुटुंबियांचे अभिनंदन केले. लोणी बुद्रुक ग्रामस्थांना ही बातमी कळताच त्यांनी आनंद व्यक्त केला.

माझे कष्ट आणि अनेकांच्या सहकार्याने यश : संकेत

निकाल जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना संकेत म्हणाला, मी इंजिनियरिंग पूर्ण करताच भारतीय प्रशासकीय सेवेत जायचा ठाम निर्धार केला. मला कुटुंबियांचा त्यासाठी पाठींबाही मिळाला.तयारी सुरू केली. काही दिवसांनी दिल्लीत गेल्याशिवाय ध्येय गाठता येणार नाही याची जाणीव झाली. दिल्लीत गेलो आणि क्लासेस जॉईन केले. खूप कष्ट करीत राहिलो.चंदीगढचे आयएएस अधिकारी निळकंठ आव्हाड आणि हैद्राबादचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी महाराष्ट्रातील मुलांसाठी विशेष मार्गदर्शन केले.त्यांनी महाराष्ट्रातील मुलांचा ग्रुप बनवला होता. त्याचा खूप फायदा झाला.यूपीएससीमध्ये आयएएस,आयपीएस आणि आयईएस यासाठी निवड केली जाते. मला आयएएस मिळेल अशी खात्री आहे पण मिळाले नाही तर पुन्हा तयारी करून ते मिळवणारच असा ठाम विश्वास संकेतने व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या