मोरुस्कर व शिंदे यांना कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार

नाशिक सिटीझन फोरमच्यावतीने 19 जुलैला वितरण सोहळा ; विक्रांत मते - सुफि जीन यांना बेस्ट प्रॅक्टीस अवार्ड

0
नाशिक । नाशिक सिटीझन फोरम यांच्यावतीने शहर विकास व समाज विकासात महत्वपुर्ण योगदान दिल्याबद्दल नगरसेवक संभाजी मोरुस्कर व विलास शिंदे यांची कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार आणि विक्रांत मते व सुफियान जीन यांची बेस्ट प्रॅक्टीस अवार्ड (उल्लेखनीय कामगिरी) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

येत्या 19 जुलै रोजी विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते या पुरस्कारार्थींचा गौरव केला जाणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समिती अध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ नंदकिशोर भुतडा यांनी आज दिली.

शहरातील इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत आज नाशिक सिटीझन फोरमच्यावतीने महापाकिलेच्या सन 2012 – 17 या काळावधीसाठी 2 कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार व 2 बेस्ट प्रॅक्टीस अवार्ड (उल्लेखनीय कामगिरी) यांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष सुनिल भायभंग, मानद सचिव नरेंद्र बिरार, कोषाध्यक्ष तथा पुरस्कार प्रकल्प संयोजक मनिष कोठारी आदी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. भुतडा यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या नगरसेवकांच्या कामगिरीची सविस्तर माहिती दिली. यात भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागात अनेक विकास कामे केली असुन यात त्यांनी सुरू केलेल्या वाचनालयाचे काम उत्कृष्ट आहे. अशाप्रकारे विकास कामे इतर प्रभागात झाली पाहिजेत.

तर शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी आपल्या प्रभागात राबविलेल्या घरकुल योजनेसाठी एमआयडीसीकडुन जागा महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच इतर विकास कामेही त्यांनी केलेली आहे. तसेच विक्रांत मते यांनी महापालिकेत प्रथमच पाण्यावरील घंटागाडीचा उपक्रम राबवून गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्याचे काम केले.

यातून नाशिक महापालिकेला मोठा आर्थिक फायदा झाला. तसेच आपल्या प्रभागात रस्त्यावर 200 मीटरवर क्रॉसपाईप टाकुन यातून नळ व इतर पाईपलाईन टाकण्याचा नवा पायंडा पाडला. तर सुफियान जीन यांनी आपल्या प्रभागात महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार महिलांना रोजगार निर्मीतीसाठी प्रशिक्षण देण्याचे काम करतांनाच बहुसंख्य महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम केले.

या नगरसेवकांच्या अनेक विकास कामांची दखल घेत निवड समितीने त्यांनी पुरस्कारांसाठी निवड केल्याची माहिती अ‍ॅड. भुतडा यांनी दिली. तसेच ही निवड करतांना असणारे निकष व इतर काही बाबी लक्षात घेण्यात आल्या, त्याची उदाहरणा दाखल माहिती दै. देशदूतचे संचालक संपादक तथा निवड समिती सदस्य विश्वास देवकर यांनी दिली.

नाशिक सिटीझन फोरमचा वर्धापन दिन सोहळा येत्या 19 जुलै 2017 रोजी सायंकाळी 5.30 वाजता नाईस संकुल आयटीआय सिग्नल सातपूर याठिकाणी होणार आहे. याच सोहळ्यात विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार व बेस्ट प्रॅक्टीस अवार्ड यांचे वितरण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

याच सोहळ्यात द्वारका ते नाशिकरोड दरम्यान रस्त्याच्या विकासाचे मॉडेल सादर करण्यात येणार आहे. नाशिक सिटीझन फोरम यांनी या रस्त्यांचे तपशिलवार सर्वेक्षण करुन घेतले असुन त्याआधारे आयटीडीपी या संस्थेचे हर्षद अभ्यंकर यांनी या रस्त्यांच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. या रस्ता विकास आराखड्याचे सादरीकरण या सोहळ्यात होणार आहे.

LEAVE A REPLY

*