आरोपींच्या अटकेसाठी कोपरगावात मोर्चा

0

मतीमंद मुलीवर अत्याचार घटनेचा निषेध ; महिला व युवकांत संताप

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- शहरात एका मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात शहरामध्ये सर्वपक्षीय निघालेल्या मोर्चात सामिल महिला व युवकांमध्ये संतापाची भावना दिसली. अतिशय प्रक्षोभक वक्तव्ये करून जमावाने तहसील कार्यालय परिसरास गराडा घातला. घटनेतील पकडलेल्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी व एका आरोपीला अटक करून उपयोग नाही, अन्य आरोपींना तातडीने अटक करा, अशा मागण्या करीत बुधवारी सर्वपक्षीय मोर्चाने निषेध व्यक्त केला.
कोपरगाव शहरात गांधीनगर भागातील एका मतीमंद मुलीवर रवींद्र उर्फ नव्वा सुकदेव मोरे याने अत्याचार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन मोरे यास पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून कोपरगावातील व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला.
तर सर्वपक्षीय निघालेल्या मोर्चात आ. स्नेहलता कोल्हे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या संस्थापक पुष्पा काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, नगरसेवक महेमूद सय्यद, माजी नगरसेवक करीम कुरेशी, शिवसेना शहरप्रमुख असलम शेख, पतसंस्था फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष काका कोयटे, अशोक खांबेकर, विकास आढाव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, राष्ट्रवादी पक्षाचे विजय आढाव, मनसेचे संतोष गंगवाल आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोर्चा गांधीनगर भागातील घटनास्थळापासून निघाला. मोर्चात अन्य नागरिकांबरोबर महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चात घटनेचा निषेध व्यक्त करणारी फलके झळकत होती. तसेच आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी मोर्चा तहसील कार्यालयात आल्यानंतर करण्यात आली. यावेळी जमलेला जमाव अतिशय प्रक्षुब्ध झाला होता. पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील, पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर, सुरेश शिंदे, स.पो.नि. देवरे, काद्री व अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी जमावाला काबूत आणण्याचे आटोकाट प्रयत्न झाले.
आ. स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, महेमूद सय्यद आदींनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रांत रवींद्र ठाकरे, तहसीलदार कदम यांच्याशी आम्हाला बोलायचे आहे, असे म्हणून युवकांनी थोडावेळ धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना शांत करण्यात यावेळी यश मिळाले. मोर्चाच्यावतीने प्रांत रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले. त्यात आरोपी मोरे गजाआड गेला असला तरी त्याचे साथीदार अजून मोकाट फिरत आहेत. आरोपी हे विकृत मनोवृत्तीचे असून त्यांनी दहशत पसरवली आहे. अशा घटना कोपरगावचं काय महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडत आहेत. या घटनेची तातडीने चौकशी करा. हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रारंभीच या घटनेचा निषेध केला. सदर पीडित मुलगी ही आमची कन्या भगिनी आहे. तिचेवर झालेला अन्याय हा क्षम्य नाही. या घटनेत जे कोणी सामील असतील त्याला पोलिसांनी पकडून त्यांना शिक्षा करावी व जेणेकरून पीडित मुलीला न्याय कसा मिळेल हे पहावे, अशा सूचना केल्या. यावेळी आ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे यांंना फोनवरून घटनेचे गांभिर्य सांगितले.
नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले, ही मुलगी कुठल्या समाजाची आहे, यापेक्षा मानवतेच्यादृष्टीने या घटनेकडे बघून या दुर्दैवी मुलीला न्याय कसा मिळेल हे पहावे. यावेळी पुष्पा काळे, शहर शिवसेनेतर्फे अजिनाथ ढाकणे, संतोष गंगवाल, भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात, रवींद्र पाठक आदींनी घटनेचा निषेध व्यक्त केला.
पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी या घटनेत सामिल असणार्‍या सर्व आरोपींचा तपास केला जाईल, त्यात कुठलीही कसूर होणार नाही, अशा सूचना तपासी अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे त्यांनी मोर्चाला उद्देशून बोलताना आश्‍वासन दिले. आज कोपरगाव बंद पुकारल्याने गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शाळा महाविद्यालयांनी सुट्टी घेतली होती. त्यामुळे गावात प्रचंड पोलीस बंदोबस्तात तणावपूर्ण शांतता होती.

 

LEAVE A REPLY

*