कोल्हार खुर्द येथे ‘गाढव’विरोधात मोर्चा

0

गाढवांकडून शेतीपिकांची नासधूस होत असल्याची तलाठ्यांकडे तक्रार

कोल्हार (वार्ताहर) – वाळू वाहतूक करणार्‍या गाढवांचा तात्काळ बंदोबस्त करा अशा घोषणा देत कोल्हार खुर्द येथील संतापलेल्या शेतकर्‍यांचा मोर्चा तलाठी कार्यालयावर धडकला. नदी पात्रातून वाळू वाहतूक करणारे गाढव त्यांच्या मालकांकडून मोकाट सोडली जातात. हीच गाढवं उभ्या शेतीपिकात चरतात, नासधूस करतात. या नित्याच्या त्रासाला वैतागलेल्या शेतकर्‍यांचा असंतोष सोमवारी येथे मोर्चाद्वारे प्रकटला.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसली जाऊन गाढवांवरून तिची वाहतूक केली जाते. त्यानंतर गाढवांच्या मालकांकडून ही गाढवं मोकाट सोडली जातात. तीच गाढवं उभ्या शेतामध्ये जाऊन पिकाची नासाडी करतात. या उपद्रवाला कंटाळून येथील शेतकर्‍यांनी वेळोवेळी महसूल खात्याला तसेच येथील तलाठी कार्यालयामध्ये लेखी निवेदने देऊन वाळूवाहतूक करणार्‍यांना समज देण्याची मागणी केली होती. परंतु त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.
दिवसेंदिवस गाढवांचा व त्यासोबत डुकरांचा शेतकर्‍यांना उपद्रव आणखी वाढू लागला. त्यामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेत कोल्हार खुर्द तलाठी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आधीच अवैधरीत्या वाळूउपसा करायचा आणि त्यात भर म्हणून शेतकर्‍यांच्या शेतीपिकांची नासधूस करायची, हे असह्य झाल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. कोल्हार खुर्दचे सरपंच प्रकाश पाटील यांनी यावेळी संबंधित मालकांना बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्याचे आश्‍वासन दिले.
याप्रसंगी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष श्रीधर शिरसाठ, गणेश राऊत, रवींद्र शिरसाठ, संजय भोसले, प्रकाश चिखले यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच दोन दिवसांत यावर कारवाई न झाल्यास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा सजड इशाराही दिला.
कोल्हार खुर्दचे तलाठी हरिश्‍चंद्र मुठे व मंडलाधिकारी बी. एल. वडीतके यांना यावेळी लेखी निवेदन देण्यात आले. त्यावर श्री. वडीतके म्हणाले, संबंधित गाढव मालकांची यादी तयार करुन ती यादी तहसीलदारांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. याखेरीज ग्रामस्थांचे म्हणणे असेल तर जेसीबीच्या साह्याने नदीपात्राच्या रस्त्यावर खड्डे खोदून प्रतिबंध केला जाईल असे आश्‍वासन दिले.

 

 

LEAVE A REPLY

*