मान्सून केरळात एक जूनला धडकणार

jalgaon-digital
3 Min Read

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – येत्या शनिवारपर्यंत (दि. 16 मे) मान्सून अंदमानात आणि निकोबार बेटावर दाखल होणार असून केरळमध्येही त्याचे आगमन अगदी वेळेवर म्हणजे 1 जूनला होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नव्याने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात बुधवारी (ता.13 मे) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांना (मॉन्सून) चालना मिळणार असून शनिवारपर्यंत (ता.16) मॉन्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर डेरेदाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या मॉन्सून आगमनाच्या संभाव्य तारखांच्या नवीन वेळापत्रकानुसार मॉन्सून केरळमध्ये 1 जून दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा 100 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) 15 एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीला एल-निनो स्थिती सर्वसामान्य राहणार असून, शेवटच्या टप्प्यात ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.

मान्सूनच्या वेळापत्रकात बदल?

दरम्यान, मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या सर्वसाधारण वेळापत्रकात बदल होत असल्याचे स्कायमेट या खाजगी संस्थेने म्हटले आहे. त्यानुसार, मान्सून कोलकाता आणि मुंबईत 11 जून रोजी, तर दिल्लीत 27 जून रोजी दाखल होईल, असा अंदाज वर्तन्यात आला आहे.

देशातील चार महिन्यांचा मान्सून हंगाम 1 जूनपासून सुरू होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो. 1901 ते 1940 दरम्यान देशातील 149 ठिकाणांहून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे आगमन, त्याचा वर्षाव, परतीचा प्रवास यात बदल होत आहेत. ते लक्षात घेऊन मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी तज्ज्ञांकडून जोर धरत होती. परिणामी, हवामान खात्याने 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. तर 1971 ते 2019 दरम्यानच्या 48 वर्षांच्या काळातील मान्सूनचे आगमन, परतीचा प्रवास या आधारावर त्याचे आगमन, परतीचा प्रवास यात काही बदल केले.

त्यानुसार, मान्सूनच्या आगमनाची तारीख 1 जूनच आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, केरळनंतर पुढे म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल होण्यास काहीसा विलंब होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही बदल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशातील परतीच्या पावसाची तारीख 15 ऑक्टोबरच ठेवण्यात आली आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *