जिल्ह्यात मान्सून बरसला!

0
नाशिक | दि.११ प्रतिनिधी- कोकणसह राज्यातील बहुतांशी भागात शनिवारी मान्सूनचे आगमन झाले. कोकणात जोरदार सलामी दिल्यानंतर आज मुंबईतील अनेक भागात सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. तसेच नाशिक जिल्ह्यात आज काही तालुक्यांत मान्सून दाखल झाला आहे. नाशिक शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसाने सर्वांची धावपळ उडवून दिली.

दुपारनंतर नाशिक शहर परिसरात दोन तासांत २६.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याने शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, भेंडाळी, सोनगाव आदी भागांत पाऊस झाला. सिन्नर तालुक्यातील डुबेरे परिसरात दुपारी पाऊणे चार वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळपर्यंत तालुक्यात काही भागांत रिमझिम पाऊस सुरू होता. त्र्यंबकेश्‍वरसह तालुक्यातील काही गावात देखील पावसाने हजेरी लावली.

कोकणासह राज्यात दोन दिवस उशिराने मान्सून दाखल झाल्यानंतर आता सर्वच जिल्ह्यांत पावसाळी वातावरण तयार झाले आहे. मान्सूनपर्व पावसाने निर्माण झालेल्या गारव्यानंतर उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे वेधशाळेने राज्यात कोकणासह विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शुक्रवारी शक्यता वर्तवली होती.

तसेच शनिवारी पुन्हा येत्या २४ तासांत कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला. आज सकाळपासूनच मुंबईत अनेक भागात पाऊस सुरू झाला. नाशिक जिल्ह्यात शनिवारी काही भागात पाऊस पडल्यानंतर आज मान्सूनने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर उकाडा वाढत गेला.

अखेर दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहर आणि परिसराला दुपारी सव्वा वाजता आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. काही मिनिटांतच रस्त्यावर पाणी वाहू लागले. अनेक भागात पावसाचे पाणी साठल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. सुमारे अर्धा पाऊण तासांनंतर पावसाचा वेग कमी झाला. मात्र रात्री उशिरापर्यत पावसाची रिपरिप सुरू होती.

LEAVE A REPLY

*