Type to search

maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

मान्सून अंदमानमध्ये दाखल

Share
पुणे – नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) काल (18 मे) अंदमानात दाखल झाले आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मान्सून अंदमानात पोचला असून, वार्‍यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली होती. बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकूल वातावरण होते. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

केरळपर्यंत 6 जूनपर्यंत प्रवास पूर्ण करील, असे सूत्रांनी सांगितले. दुष्काळात होरपळणार्‍या महाराष्ट्रासह संपूर्ण देश मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे; पण यंदा तो उशिरा दाखल होत आहे. मान्सूनच्या सरी साधारणतः 1 जूनला केरळमध्ये बरसतात; पण यंदा त्यासाठी सहा जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात ढगांची दाटी होऊ लागली आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनने सर्वसाधारण वेळेपेक्षा दोन दिवस आधीच म्हणजे 29 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. केरळ ते महाराष्ट्र असा प्रवास करत मान्सून 8 जूनला तळकोकणात हजेरी लावली होती. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल निश्‍चित होते.

मान्सूनचा प्रवास – अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे सर्वप्रथम आगमन होते. सर्वसाधारण 20 मेपर्यंत मान्सून अंदमानात पोचतो. त्यानंतर बंगालच्या उपसागरावरून या वार्‍यांची उत्तरेकडे, पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांकडे वाटचाल होते. त्यानंतर 1 जूनपर्यंत तो केरळमध्ये, तर 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात (कोकण) दाखल होतो.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!