रेकॉर्ड ब्रेक… सव्वा पाचला सवारी दिल्लीगेट बाहेर…!

0

मोहरम मिरवणूक शांततेत : पोलिसांचा चोख बंदोबस्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या नगरच्या मोहरम विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी दुपारी कोठला व मंगलगेट हवेली येथून प्रारंभ झाला. या हुसेन, या हुसेन अशा घोषणा… सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. पोलिसांच्या नियोजनानुसार यंदा तब्बल 15 वर्षानंतर बडे इमाम आणि छोटे इमाम यांची सवारी सायंकाळी 5.12 मिनिटांनी दिल्लीगेट बाहेर पडली. पोलिसांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.

मोहरम विसर्जन मिरवणूक सहाच्या आत दिल्लीगेट वेशीबाहेर काढण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने कागदावर आखले होते.यासाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजता कोठल्यातून छोटे बारा इमाम यांची सवारी मंगलगेट हवेलीतील मोठे बारा इमामाच्या भेटीला निघाली. मोहरम विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मार्गावरील रस्ते पोलिसांनी ‘ब्लॉक’ केले होते. दरम्यान कत्तलच्या रात्री सवारी खेळविणार्‍यांना ‘टाईट’ केल्याने पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता.

गुरुवारी (दि.20) कोठला येथून रात्री 12 वाजेच्या सुमारास कत्तल की रात मिरवणुकीस प्रारंभ झाला. कोठला येथील छोटे बारा इमाम यांची सवारी कोठला यंग पार्टी व मोहरम उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिसरात खेळविली. सवारी तेथून बाहेर पडण्यास रात्रीचे 1 वाजले होते. कोठला येथे सवारीच्या मागे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सवारी पुढे सरकविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, खेळविण्याच्या नादात सवारी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या अंगावर जात होती. त्यामुळे तेथे काही काळ तणाव निर्माण झाला.

दरम्यान, छोटे बारा इमाम यांची सवारी राज चेंबर्स परिसरात येण्यासाठी रात्रीचे 2 वाजले. सवारी पुढे जाताच पोलिसांनी आपली वाहने सवारीच्या मागे लावली. मंगलगेट परिसरात मुस्लिम समाजाच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना सोडून देण्याची विनंती पोलिस प्रशासनाकडे केली. तेथे उपस्थित असणार्‍या डीवायएसपी संदीप मिटके व प्रशिक्षणार्थी डीवायएसपी पूनम पाटील यांनी मुलांना सोडून देण्यास नकार दिला.

तुम्ही कत्तलची मिरवणूक व उद्या निघणारी मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत व दिलेल्या वेळेत पूर्ण करा. त्यानंतर तरुणांना सोडण्याच्या मागणीचा विचार करू असे सुनावले. पुढे अवघ्या चाळीस मिनिटांत दोन्ही सवार्‍या एकत्र येत मिरवणूकीस सरुवात झाली. दरम्यान, पोलिसांनी टेंभे फक्त कोठला परिसरात पेटविण्या बजावत सवारीच्या मागे नेण्यास परवानगी नाकारली होती.

दोन्ही सवार्‍या रात्री 3.30 वाजेच्या सुमारास दाळ मंडई परिसरात पोहचल्या. त्याठिकाणी इदगाही मैदान यंग पार्टी व बेपारी मोहल्ला यंग पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सवारी खेळविली. चार वाजेला सवार्‍या तेखीखुंट येथे आल्या. या परिसरात तेलीखुंट यंग पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सवारी खेळविली. पुढे मोची गल्ली येथील कार्यकर्त्यांनी सवारी भिंगारवाला चौकापर्यंत खेळवली. पटवर्धन चौक, सांगळे गल्ली कार्नर, पंचपीर चावडी, जुना बाजार. धरती चौक, हातमपुरा मार्गे दोन्ही सवार्‍या सात वाजता पुन्हा जागेवर पोहचल्या.

दरम्यान आज दुपारी बरोबर 12 वाजता मोहरम विसर्जन मिरवणूक सुरू झाली. कोठल्यातून छोटे बारा इमाम मंगलगेट हवेलीतील मोठे बारा इमामाच्या भेटीला निघाले. मिरवणुकीत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गाला मिळणारे उपरस्ते बंद करण्यात आले होते. दोन्ही सवार्‍या कोठला, फलटण पोलिस चौकी, मंगल गेट हवेली, आडते बाजार, पिंजार गल्ली, जुना कापड बाजार, खिस्त गल्ली, जुना कापड बाजार, पंचपीर चावडी, जुनी महापालिका, कोर्टातील मागील बाजूने दिल्ली गेट वेशीबाहेर निघणार होत्या.

दुपारी सव्वा चारच्या सुमारास दोन्ही सवारी या जुन्या महापालिकेपर्यंत आल्या होत्या. त्या ठिकाणाहून पोलीसांनी विनाथांबा या सवार्‍या सायंकाळी 5.12 वाजता दिल्लीगेट बाहेर आणल्या. तेथून या सवारी बालकाश्रम रोड मार्गे पुढे निघाल्या आणि सावेडीच्या अलीकडे असणार्‍या परिसारात सायंकाळी सात वाजता सवारीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी दोन्ही सवारीच्या मागे पोलिसांनी वेगळा बंदोबस्त होता. तसेच सवारी मार्गावरील नियोजित सेक्टरच्या हद्दीत असणार्‍या पोलिसांना सवारी मिरवणूक पुढे नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

  • कालची मोहरम मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी 2 महिन्यापासून पोलीस प्रशासनाने तयारी केली होती. विविध मंडळांची पदाधिकारी, शांतता कमिटीची सदस्य आणि गणेश मंडळाच्या सदस्य यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. संध्याकाळी गणेश आरती पूर्वी मोहरम विसर्जन मिरवणूक दिल्लीगेट वेशीच्या बाहेर पडावी यासाठी आवाहन करण्यात आले होते. तसेच सर्वांशी समन्वय साधण्यात आला होता. यावेळी नागरिकांचे सहकार्य व पोलीस प्रशासनची भूमिका यामुळे सर्व नियोजन बद्ध काम झाले. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. समाजकंटककडून तेढ निर्माण केला जाऊ नये यासाठी अशा व्यक्तींवर पोलीस नजर ठेवून होते. पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सर्वांनी साथ दिल्याने हा उत्सव नियमित वेळे पूर्वी म्हणजेच सव्वा पाचला वेशी बाहेर सवारी पडल्या.- रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक.
  • पोलिसांचं टाईट प्लॅनिंग…
    मोठे बारा इमामचे पुजारी निसार जहागीरदार यांनी सहा वाजेच्या सुमारास सवारी दिल्लीगेट वेशीबाहेर काढण्यात येणार असल्याचे पोलिसांना सांगितले होते. सहा वाजेच्या सुमारास मुस्लीम कॅलेंडरनुसार दिवस संपतो. त्यामुळं त्यापूर्वीच सवारी बाहेर काढली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले असले तरी तरुणांच्या उत्सावामुळं खरंच तसं होईल की नाही याबाबत साशंकता होती. पोलिसांनी मात्र खास वेळापत्रक तयार करून कडक धोरण स्वीकारले होते. त्यामुळं सवारी सव्वा पाचलाच वेशीबाहेर पडल्या.

LEAVE A REPLY

*