मोहरम मिरवणुक शांततेत, दोन डिजे ताब्यात

0
प्रशासनाने सोडला सुटकेचा श्वास
सावेडीत दगडफेक; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज –
शहरातील सावेडी गावात रात्री उशिरा दगडफेकीची घटना घडली. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आली. परंतु सावेडीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण होती.
अहमदनगर (प्रतिनिधी)- एका हजार पोलीस बंदोबस्तात नगरचा नावलौकीक असणारा मोहरम रविवारी (दि.1) रात्री शांततेत पार पडला. किरकोळ पळापळ व अपवाद वगळता या मिरवणुकीली कोणतेही गालबोट लागले नाही. मात्र डिजेमुक्त मिरवणुक होण्याचे स्वप्न पोलिसांचे राहुन गेले.
कोठला व सर्जेपुरा येथे एका नगरसेवकाच्या मंडळाने डिजेच्या तालावर आनंद घेतला. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही डिजे ताब्येत घेतले असून त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर मोहरम शांततेत पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तर पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सर्व जनतेचे आभार व पोलिसांचे कौतूक केले आहे.
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास छोटे इमाम येथून मोहरम मिरवणुकीला सुरूवात झाली होती. मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोणतेही गालबोट न लागता मिरवणुक शांततेत सुरू होती. दुपारी 2:30 वाजता सवारी कोंड्यामामा चौकात आली तेव्हा मोठे इमाम येथे काही अफवेमुळे पळापळ झाली.
मात्र पोलिसांनी त्यावर तत्काळ नियंत्रण केले. हजारो बांधवांच्या उपस्थितीत शहर व्यापुन गेले होते. मिरवणुक मार्गावर सवारीच्या स्वागतासाठी सनई, ताशा, ढोलपथक, बँण्ड लावण्यात आले होते. तर फुलांच्या चादरी सवारीवर टाकण्यात आल्या. मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी पेय्य ठेवण्यात आले होते.
नगर येथील मोहरम देशात दोन नंबरने साजरा केला जातो. हा मोहरम पाहण्यासाठी विविध राज्यातून अनेक बांधव नगरमध्ये दाखल झाले होते. नगरला जातीय दंगली, दगडफेक व गुन्हेगारीची परंपरा असल्यामुळे पोलीस प्रशासनाने एक हजार पेक्षा जास्त बंदोबस्त लावला होता. तर मिरवणुक मार्गावर 160 सीसीटीव्ही व 3 ड्रोन कॅमेरॉच्या सहायाने शुटिंग करण्यात आली.
नवरात्र, भगवान गड, मोहरम, राष्ट्रपती दौरा यातून दोन दिवस चालणार्‍या सणाला शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी मोठी कंबर कसली होती. नगर शहरात मिरवणुकीला गालबोट लागेल अशी चर्चा शहरात तसेच पोलीस वर्तुळात सुरू होती. मात्र त्यासाठी सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे व पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे यांनी चोख नियोजन करून समाजकंटकांचा बिमोड केला.
यावेळी काही संशयीत तरूणांना ताब्यात देखील घेण्यात आले होते. शहरातील मोहरम मिरवणुक ही सर्वत्र उत्साहाच्या वातावरणात पार पडते. मात्र सबजेल कॉर्नर ते निलक्रांती चौक या दरम्यान मोठे तणावपुर्ण वातावरण नेहमी अनुभवण्यास मिळते.
यावेळी पोलीस व भावीक यांच्यात वादात्मक परिस्थिती निर्माण होते. मोहरम मिरवणुकीची पार्श्वभूमी पाहिली तर याच दरम्यान दगडफेक झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या वर्षी पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन जुनी मनपा ते थेट दिल्लीगेट असा धावता प्रवास केला.
कोठला ते जुनी मनपा हे एक किलोमिटरचे अंतर काटण्यासाठी आठ तास मिरवणुक चालते. मात्र सबजेल ते दिल्लीगेट हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी काटले आहे. त्यामुळे संवेदनशील ठिकाणी कोणतीही जोखीम न घेता. पोलिसांनी सवारी थेट दिल्लीगेटला आणली.
त्यामुळे नेहमीप्रमाणे होणारी दुर्घटना टाळण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र यावेळी बंदोबस्त मार्गासह सबजेल चौक ते दिल्लीगेट या दरम्यान सर्व गल्लीबोळांमध्ये तर इमारतींवर पोलीस पहारा लावताना दिसून आले. त्यामुळे प्रथमत:च मोहरम मिरवणुक शांततेत पार पडली आहे.
ही मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक अभय परमार, पांडुरंग पवार, दिलीप पवार, कैलास देशमाने, सुनिल पवार, विनोद चव्हाण, संदीप पाटील, प्रकाश पाटील, नयन पाटील यांच्यासह अनेकांनी महत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहे.
पळापळीनंतर पोलिसांची सजगता – 
दुपारी 2 वाजता कोंड्यामामा चौकात सवारी आली असता किरकोळ कारणामुळे अफवा पसरली. त्यामुळे क्षणभरात पळापळ सुरू झाली. काही महिला व अपंग व्यक्त खाली पडले. मात्र सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह पथकाने गर्दीत प्रवेश केला. पळापळ करणार्‍यांना अडवून शांततेचे आवाहन केला. त्यामुळे जमाव शांत झाला. तसेच पिंजारगल्ली येथे सवारी घेण्याच्या कारणाहुन दोन गटात वाद झाले. हा प्रकार मारमारी पर्यंत गेला. मात्र चव्हाण यांनी सजगता दाखवून दोन्ही गटांना शांत केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

*