Type to search

maharashtra जळगाव फिचर्स

मोहाडीच्या शेतकर्‍याला अवैध सावकारीचा ‘फास’

Share

दीड लाखाच्या मुद्दलसह 40 लाखांची मागणी

जामनेर

सन 2000 साली खासगी सावकाराकडून घेतलेल्या दीड लाखाचे 40 लाख रुपये व्याजाची मागणी करणार्‍या सावकाराच्या जाचाला कंटाळून मोहाडी येथील शेतकरी जगदीश रतनसिंग राजपूत (वय 50) या शेतकर्‍याने अखेर घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला जळगाव कांचन नगरमधे राहाणार्‍या सावकार विजय बंडू कुमावत व प्रकाश बंडू कुमावत यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मृताच्या नातेवाईकांनी या सावकार भावंडास अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते.

मोहाडी येथील शेतकरी जगदीश रतनसिंग राजपुत (वय 50) हे पत्नी, दोन मुले, मुलगी यांच्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह भागून शेती व्यवसाय करीत होते. आर्थिक अडचणीला सामोरे जात असताना व अनेक संकटांना तोंड देत असताना मुलांचे शिक्षण व कुटुंबाच्या चरितार्थासाठी, शेती साठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी त्यांनी जळगाव येथील सावकार विजय बंडू कुमावत व प्रकाश बंडू कुमावत यांचेकडून सन 2000 साली दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. या बदल्यात सावकाराने शेतकरी जगदीश यांचेकडून त्यांची मोहाडी शिवारातील शेत जमीन सरकारी किंमत 76000 रुपये प्रमाणे त्यांच्याकडून नावे खरेदी करून घेतली होती. मात्र जमिनीचा ताबा शेतकरी जगदीश यांच्याकडे होता.

चार-पाच वर्षांमध्ये पैसे दिले गेले नाही. रक्कम आल्यानंतर शेतकरी जगदीश राजपूत हे पत्नी व काही नातेवाईकांना घेऊन सावकाराकडे गेले व दीड लाखाचे सात लाख रुपये घेऊन आमचे शेत परत आमच्या नावे उलटून द्या, अशी विनंती सावकाराला केली. मात्र या कुमावत बंधूंना थोडासाही घाम फुटला नाही. दरम्यानच्या काळात शेतकरी जगदीश राजपूत हे बर्‍याच वेळा समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती राजकीय व्यक्तींना सोबत घेऊन सावकार कुमावत बंधूंकडे गेले व त्यांनी आपली रक्कम नियमाप्रमाणे व्याजासह परत घ्या व आमचे शेत आम्हाला उलटून द्यावे, अशी विनंती केली. परंतु कुमावत बंधूंनी कोणालाही न जुमानता जमीन परत करण्यास नकार दिला.

चार-पाच दिवसांपूर्वी जगदीश राजपूत व त्यांच्या पत्नी, मुलगा यांच्यासह पुन्हा कुमावत बंधूकडे जाऊन त्यांनी जमीन उलटून देण्यासाठी विनंती केली. मात्र सावकार बंधूंनी शेतकर्‍याकडे 40 लाख रुपयांची मागणी केली. आमचे दीड लाख रुपयाचे 40 लाख रुपये व्याज झाले असून 40 लाख रुपये दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला जमीन परत करणार नाही. आणि आठ दिवसात पैसे दिले नाही तर आम्ही आपली जमीन दुसर्‍याला विकून टाकू अशा धमक्या दिल्या. याचदरम्यान या सावकार बंधूंचे शेतकरी राजपूत यांना फोनवरून धमक्या देणे सुरू होते.

आज अखेर जगदीश राजपूत यांनी या शेतकर्‍याच्या जाचास कंटाळून घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकरी राजपूत हे घरातील कर्ता पुरुष असून पूर्ण परिवार त्यांच्यावर अवलंबून होता. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला जगदीश राजपूत यांचा मुलगा दर्शन जगदीश राजपूत याने जळगाव येथील सावकार विजय बंडू कुमावत व प्रकाश बंडू कुमावत यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून भादंवि कलम 306, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!