Type to search

‘मोगरा फुलला’मधील ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

हिट-चाट

‘मोगरा फुलला’मधील ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Share

रोहित राऊत याने संगीतबद्ध केलेले व गायलेले स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’मधील ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, अर्जुन सिंग बरन व कार्तिक निशाणदार ‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्टात होणार प्रदर्शित,  ‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’हा चित्रपट येत्या १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये नेमकं काय काय पहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

यातूनच अजून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत याने संगीतबद्ध केलेले व गायलेले ‘मोगरा फुलला’ मधील श्रवणीय असे ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे आणि या गाण्याला प्रेक्षकांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिला पाहिल्यावर ती आपली ‘मनमोहिनी’ आहे असे वाटते, असच काहीस दर्शविणार, ‘मोगरा फुलला ‘या चित्रपटातील पहिले ‘मनमोहिनी’ हे रोमँटिक गाणे नुकतेच सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी बरोबर सई देवधर हा नवोदित चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘मनमोहिनी’ या गाण्यामधून चित्रपटामध्ये सई देवधर ही स्वप्नील जोशीची मनमोहिनी आहे असे दिसत असून या गाण्यातून या सुंदर जोडीचा उत्तम अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

हे गाणे पूर्णपणे रोमँटिक असून “मनमोहिनी आज पाहिली, छबी तिची पाहता मनी राहिली…” असे या गाण्याचे मंत्रमुग्ध करणारे बोल आहेत. हे गाणे बघितल्यावर प्रेक्षकांना आपल्या मनमोहिनीची आठवण येईल यात काही शंका नाही. त्याचबरोबर ‘मनमोहिनी’ हे गाणे तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखला जाणारा गायक रोहित श्याम राऊत याने स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे. या गाण्याची शब्दरचना अभिषेक कणखर यांची असून फुलवा खामकर यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

‘मोगरा फुलला’ मधील गाण्याच्या अनुभवाबद्दल रोहित राऊत सांगतो की, ‘मोगरा फुलला’ या चित्रपटासाठी काम करताना मला फार मजा आली. अशा सुंदर कथेच्या सिनेमासाठी काम करायला मिळणं हे माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होत. यासाठी मी जीसिम्सचे आभार मानतो. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांचेदेखील मला खूप सहकार्य लाभले, कारण मला असं वाटत की, एखाद गाणं संगीतकाराला सुचण्याआधी ते गाणं कोणत्या परिस्थितीला हवंय हे त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला सुचत आणि त्यानंतर संगीत दिग्दर्शक अचूक गाणं बनवतो, ‘मनमोहिनी’ हे गाणं करताना फार मज्जा आली. ‘मनमोहिनी’ हे पूर्णपणे रोमँटिक, श्रवणीय असं गाणं आहे आणि हे गाणं ऐकल्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येईल त्याचबरोबर प्रत्येकजण हे गाणं स्वतःशी जोडेल एवढं नक्की’.

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, संदिप पाठक, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या ‘पॅनोरमा स्टुडिओज’ने ‘मोगरा फुलला’च्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे.

प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा ‘टच’ देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!