कला, क्रीडा शिक्षकांचे एसएमएस आंदोलन

0

मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविले मेसेज

अहमदनगर (प्रतिनिधी) – कला, क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने राज्यभरातून सरकारला निवेदने दिली, आंदोलने झाली तरी शासनाने त्याची दखल घेतली नाही. अखेर या शिक्षकांनी शालेय स्पर्धेवर व आयोजन बैठकीवर शिक्षकांनी बहिष्कार घालण्यासंदर्भात नेवासे, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील कला, क्रीडा शिक्षकांची बहिष्काराची सभा कासार पिंपळगाव येथे बोलावली होती.

या ठिकाणी उपस्थित शिक्षकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री विनोद तावडे यांना मोबाईलवरुन एस.एम.एस. पाठवून तासिका पूर्ववत करण्याची मागणी केली. या मेसेजचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार असून, महाराष्ट्र भरातून मेसेजेस पाठविले जाणार असल्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला.

शासन शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असून प्रयोगशाळा परिचर, शिपाई, क्लार्क, सुपरवायझर व आता कला क्रीडा शिक्षक समाजव्यवस्थेतून हद्दपार करण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. भविष्यात शासनाची वाटचाल खाजगीकरणाकडे होऊ लागल्याने आर्थिक कारणाने गरीब, होतकरू विद्यार्थी हे समाजव्यवस्थेतून बाहेर पडून शिक्षणाबाबत महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही.

त्यामुळे शासन निर्णयाविरोधात शिक्षकांनी पुकारलेल्या आंदोलनास विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केले.
आर.टी.ई. नुसार कला, क्रीडा शिक्षक समाज व्यवस्थेतील हद्दपार झाला असून, मुलांच्या आरोग्यासाठी खेळ व क्रीडा शिक्षक महत्वाचे असून तो टिकावा म्हणून स्पर्धेवर बहिष्कार कायम राहिल असे माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.

महेंद्र हिंगे, शिरीष टेकाडे व तुवर पाटील यांनी बहिष्काराची दिशा स्पष्ट केली. यावेळी बहिष्काराचे निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांना देण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख रामदास दहिफळे, तुवर पाटील, शिवाजी वाबळे, राजेंद्र कोतकर, आप्पासाहेब शिंदे, महासंघाचे जिल्हा सचिव शिरीष टेकाडे, उपाध्यक्ष पप्पू शिरसाठ, महेंद्र हिंगे,

बाळासाहेब राजळे, बबन गायकवाड, कल्पेश भागवत, विजय जाधव, योगेश जाधव, सचिन शिरसाठ, पोपट काळे, भाऊ धाडगे, रमेश मोरगावकर, अण्णा वांढेकर, बाळासाहेब शिंदे, रावसाहेब मोरकर, प्रवीण बर्हाट, सुदाम कारंडे, अजय शिरसाठ, दत्तात्रय मरकड, दहातोंडे, सुरेश दहिफळे, अरविंद घुगे व तालुक्यातील 250 क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*