खंडणीप्रकरणी मनसेना पदाधिकाऱ्यासह वकील ताब्यात

0
नाशिक | वडिलोपार्जित जमिनीचा वाद सुरू असताना हा वाद लोकअदालतमध्ये मिटला. मात्र तत्पूर्वी हा वाद दिवाणी न्यायालयात सुरू असताना वकिलास कोर्टात केस चालवण्यासाठी ठराविक रकमेची पूर्तता करूनदेखील संबंधित वकिलाने वेळोवेळी 30 लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे वसुलीसाठी मनसेना पदाधिकार्‍यास सांगून त्वरित 3 लाख रुपये आणून दे अन्यथा हातपाय तोडून टाकीन, अशी दमदाटी केल्याप्रकरणी वकिलासह मनसेना पदाधिकार्‍यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संतोष शांताराम तुपसाखरे (45, रा. पार्वती पॅलेस अपार्टमेंट, हिरावाडीरोड, पंचवटी) यांच्या तक्रारीवरून अ‍ॅड. राजेंद्र मनोहर खंदारे आणि मनसेनेचा शहर सरचिटणीस सत्यम खंडागळे यांच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार संतोष तुपसाखरे यांची घोटी तसेच पाडळी येथे 18 एकर वडिलोपार्जीत जमीन होती. यात वाद असल्याने संतोष यांचे वडील शांताराम तुपसाखरे यांनी तक्रारदार यांचे काका अनंत तुपसाखरे यांच्या विरुद्ध दिवाणी दावा नाशिक कोर्टात 1992 साली दाखल केला होता.

दाव्यात संतोष तुपसाखरे यांच्या वडिलांनी वकीलपत्र अ‍ॅड. राजेंद्र खंदारे यांना दिले होते. या दिवाणी दाव्याचा निकाल 1996 साली तक्रारदार यांच्या बाजूने लागला. तेव्हा ठरल्याप्रमाणे अ‍ॅड. खंदारे यांना त्यांची फी दिली. मात्र या दाव्याच्या निकालानंतर संतोष तुपसाखरे यांच्या काकांनी हायकोर्टात निकालाविरुद्ध अपील दाखल केले. सन 2000 मध्ये हे अपील नाशिक कोर्टाकडे वर्ग झाले. तेव्हा परत संतोष तुपसाखरे यांच्या वडिलांनी हा दावा चालवण्यासाठी राजेंद्र खंदारे यांना वकीलपत्र दिले. हे अपील 2004 साली निकाली निघाले तेव्हादेखील खंदारे यांची ठराविक फी देण्यात आली होती.

दरम्यान, डिसेंबर 2015 साली झालेल्या लोकअदालतीत नातेवाईकांत असलेला जमिनीचा वाद मिटला. यावेळी तुपसाखरे यांना दाव्यापोटी मोठी रक्कम मिळाल्याने राजेंद्र खंदारे यांनी वकीलपत्र काढून घेत तक्रारदार संतोष तुपसाखरे यांच्याकडे वेळोवेळी 30 लाख रुपयांची मागणी करून तुला खोट्या केसेसमध्ये फसवेल, अशी दमदाटी दिली.

यानंतर 13 सप्टेंबर रोजी संतोष तुपसाखरे यांना मनसेना पदाधिकारी सत्यम खंडागळे याने राजेंद्र खंदारे यांच्या सांगण्यावरून फोन करून तुला खंदारे वकिलांनी सांंगितल्याप्रमाणे 3 लाख रुपये त्वरित माझ्या ऑफिसला आणून जमा कर, नाहीतर तुझे हातपाय तोडून टाकीन, अशी दमदाटी केली होती. यानंतर संतोष तुपसाखरे यांनी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची भेट घेत त्यांना सर्व प्रकार सांगितला.

यानंतर या प्रकरणी बुधवारी रात्री संशयित वकील राजेंद्र खंदारे आणि सत्यम खंडागळे यांच्याविरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित सत्यम खंडागळे यास अटक करण्यात आली असून वकील राजेंद्र खंदारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

*