Type to search

Featured सार्वमत

‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले

Share

आ.थोरात यांची टीका : संगमनेर येथे नागरी सत्कार

संगमनेर (प्रतिनिधी) – दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण आपण पूर्ण केले. बोगद्यांसह काही कालवे पूर्ण केले. मात्र मागील 5 वर्षांत कामात खंड पडला. आता निवडणुका आल्या म्हणून बैठका सुरू झाल्या आहेत. ज्यांचे निळवंडेच्या कामात कोणतेही योगदान नाही, तेच आता श्रेयासाठी सरसावले आहेत, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासासाठी झटणारा पक्ष आहे. तो टिकणार व वाढणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल तालुक्याच्यावतीने आयोजित नागरी सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव पाटील खेमनर होते. आ.डॉ. सुधीर तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, सौ. कांचनताई थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शरद आहेर, रामदास पा.वाघ, ज्ञानदेव वाफारे, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजितभाऊ थोरात, शरयुताई देशमुख, अमित पंडीत, शिवाजीराव थोरात, भाऊसाहेब कुटे, कृषी सभापती अजय फटांगरे, सभापती निशाताई कोकणे, रावसाहेब शेळके, राहूल दिवे, किरण पाटील, डॉ. तुषार शेवाळे, दादासाहेब मुंडे, बाबा ओहोळ, विश्‍वासराव मुर्तडक, अर्चनाताई बालोडे, शंकर पा.खेमनर, नवनाथ अरगडे, बाळासाहेब गायकवाड, प्रा. ज्ञानेश्‍वर गायकवाड, संभाजीराव रोहकले आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी आ. थोरात म्हणाले, 1999 ला राज्यमंत्री झाल्यानंतर आपण धरणासाठी पुढाकार घेतला. ‘आधी पुर्नवसन, मग धरण’ हा आदर्शवत उपक्रम राबविला. पुर्नवसनासाठी स्वत:ची 5 एकर जमीन दिली. विस्थापीतांना संगमनेरात सहकारात नोकर्‍या दिल्या. 2014 पर्यंत अनेक अडचणींवर मात करत धरणाचे काम पुर्ण केले. काम मोठे होते. सातत्याने निधी मिळवून बोगद्यांसह काही कालवे झाली. मात्र 2014 नंतर कामे पुर्ण बंद होती. अकोलेतील प्रश्‍न चर्चेने सोडवावा, हा आग्रह कायम ठेवला. मात्र केंद्राचा व राज्याचा कोणताही निधी मिळाला नाही. ज्यांनी निळवंडेच्या कामात कोणतेही योगदान दिले नाही, तेच आता श्रेयासाठी सरसावले आहे. आपल्याला राजकारण करुन बैठकीला बोलाविले नाही. पण धरण आपणच पुर्ण केले हे जनतेला माहिती आहे. कालवे पुर्ण करुन आपणच पाणी देणार आहोत.
आ. डॉ. तांबे म्हणाले, आ. बाळासाहे थोरात यांची पक्षनेतेपदी निवड ही काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठतेचे फळ आहे. आपण सर्वजण सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे कार्यकर्ते आहोत. देशात सध्या द्वेष पसरविण्याच्या शक्ती प्रबळ झाल्या आहेत त्यांच्या विरुद्ध संघर्षासाठी सर्वांनी एक झाले पाहिजे. खा. राहूल गांधी यांनी मोठा विश्‍वास आ. बाळासाहेब थोरात यांचेवर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा राज्यात भरारी घेईल.

आ. कांबळे म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात हे विकासाची दृष्टी असलेले नेते आहे. माझ्या निवडणूकीत खूप मदत केली. स्व.जयंतराव ससाणेही माझे परमस्नेही होते. त्यांचे माझेवर खूप उपकार आहेत. काही मंडळींनी करण ससाणे यांनी गैरसमज करुन दिला. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणे दुर्देवी आहे. आ. थोरात हे राज्याचे भविष्य असून आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहोत.

नाशिकचे शरद आहेर म्हणाले, आ. थोरातांवर राज्याचे नेतृत्व मिळणे हे संगमनेरकरांचा सन्मान आहे. बाळासाहेब गायकवाड म्हणाले, नेतृत्वावर जर कोणी बोलत असेल तर जागेवर उत्तर द्या तोच खरा सैनिक कार्यकर्ता असतो. यावेळी अ‍ॅड. माधवराव कानवडे, नवनाथ अरगडे, अर्चनाताई बालोडे, नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, कर्जतचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, पारनेरचे संभाजीराव रोहकले, दिगंबर शिंदे, बीडचे दादासाहेब मुंडे आदिंनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत शहराध्यक्ष विश्‍वाराव मुर्तडक, प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ तर आभार भाऊसाहेब कुटे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील, जिल्ह्यातील व राज्यभरातून नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांचा डाव हाणून पाडा
आ.थोरात यांनी यावेळी राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता टीका केली. निळवंडे कालवे सुरु होण्यासाठी कृती समितीचे योगदान मोठे आहे. पण त्यांना ही मंडळी डावलत आहे. काही शक्ती दुष्काळी जनतेच्या मनात विष पेरत आहे. त्यांना वेळीच रोखा. संगमनेरचा विकास, चांगलेपणा, चांगला सहकार, बाजारपेठ त्यांना पहावत नाही. त्यांचे हे सर्व मोडण्याचा डाव आहे. हे आपण एकजुटीने हाणून पाडा.

ती बुद्धीभेद करणारी मंडळी
काँग्रेस पक्ष व नेतृत्वाने आपल्यावर मोठा विश्‍वास दाखविला आहे. आपण कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठता जपली. हा गोर गरिबांचा, वंचितांचा पक्ष आहे. हा पक्ष पुन्हा उभारी घेईल. लोकशाही व राज्यघटना टिकविण्यासाठी काँग्रेस पक्षाचा विचार टिकला पाहिजे. संगमनेर तालुक्याचे राजकारण सरळ आहे. आपण कधीही कुणाचे वाईट चिंतले नाही. मात्र बुद्धीभेद करणारी मंडळी येथे आली आहे. त्यांचा वेळीच बंदोबस्त करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मतभेद विसरून एकत्र या
गावागावांत आपलेच कार्यकर्ते आहेत. आपल्या मतभेदांचा बाहेरचे फायदा घेतील. ते आपल्या तालुक्याचे चांगले चाललेले मोडण्यासाठी टपलेले आहेत. ते संगमनेरकरांचा बेत पाहू म्हणतात. त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकत्र या, असे आवाहनही आ. थोरात यांनी यावेळी केले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!