विरोधी पक्षनेता ‘असा’ नसावा

0

थोरातांचा पुन्हा विखेंवर निशाणा पक्ष बदलणार्‍यांना जागा दाखविण्याची वेळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे कटाक्ष टाकत ‘विरोधी पक्ष नेता कसा असावा’ असा उल्लेख करून ना.विखे यांचा उल्लेख न करता ‘विरोधी पक्षनेता असा नसावा’ असा चिमटा त्यांनी काढला. त्यांनी आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना आमदाराचे खासदार करा, असे आवाहन केले. आघाडीच्या शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. यासाठी मोठे शक्तीप्रदर्शन झाले. अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेत आ.थोरात बोलत होते. यावेळी ना.मुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील, आ. अरुण जगताप, आ. सुधीर तांबे, आ. राहुल जगताप, आ. वैभव पिचड, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, माजी नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, पांडूरंग अभंग, आशतोष काळे, विठ्ठलराव लंघे, सुजित झावरे, नीलेश लंके, सीताराम पाटील गायकर, राजेंद्र फाळके, कपिल पवार, संजय कोळगे, करण ससाणे, सुनील लोंढे, अशोक बापर, संदीप वर्पे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

आ. थोरात यांनी भाषणाची सुरूवात करतानाच ना.मुंडे यांच्याकडे पाहात विरोधी पक्ष नेता कसा असावा, अशी टिपणी केली. आपले वाक्य पूर्ण करत ‘राज्याचा विरोधी पक्षनेता कसा नसावा’ असे त्यांनी उच्चारताच उपस्थितात हंशा पिकला. जिल्ह्यातील दोन्ही आमदारांना खासदार करायचे आहे. यासाठी नगरचे मतदान संपल्यावर राष्ट्रवादीने उत्तरेत यावे. त्या ठिकाणी बुथ पातळीवर संघर्ष करायाचा आहे. मोदी सरकारने पाच वर्षात लोकशाहीचे नुकसान केले आहे. हे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. यावेळी ना.विखेंवर टीका करताना ते म्हणाले, खासदारकीच्या बालहट्टासाठी पक्षाचे नुकसान झाले आहे. काँग्रेस पक्षाने विखे घराण्याला काय दिले नाही? सर्व काही दिल्यानंतर त्यांनी वेळोवेळी सत्तेसाठी पक्ष बदलले आहेत. आता त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे.

यामुळे गावागावातील मतभेद दूर करून एकत्र या. दक्षिणेवर मोठे संकट आले आहे, हे वेळीच ओळखा अन्यथा माझ्या भाषणाची आठवण सर्वांना येईल, असा इशारा आ. थोरात यांनी यावेळी दिला. दरम्यान, उत्तरेतील उमेदवार आ.कांबळे हे सर्वसामान्यांचे उमेदवार आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. जनतेसाठी ते सातत्याने उपलब्ध असतात, असे ते म्हणाले. आघाडीच्या उमेदवारांनी मंगळवारी नगरमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन करत उमदेवारी अर्ज दाखल केले. यावेळी नगर शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तळपत्या उन्हात मोठ्या संख्याने महिला, वृध्द, शेतकरी, कार्यकर्तेे या रॅलीत सहभागी झाले. रॅलीमुळे नगर शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

मोदींच्या राज्यात शेतकर्‍यांचे वाटोळे झाले ः ना. मुंडे
पक्ष बदलून निवडणूक लढविणार्‍यांना धडा शिकवा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच केले आहे. त्यामुळे सूज्ञ मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केेले. ते म्हणाले, मोदी सरकारच्या काळात देशात बेरोजगारी वाढली आहे. शेतकर्‍यांचे वाटोळे झाले. शेतमालाला हमीभाव सोडा, साधा उत्पादन खर्चही हे सरकार देऊ शकलेले नाही. गेल्या पाच वर्षात देशाचा कृषी मंत्री कोण त्याचे नाव कोणी सांगू शकत नाही. पवारांची चमचेगिरी करता, अशी टीका ना.पंकजा मुंडे यांनी ना.धनंजय मुंडे यांच्यावर केली होती. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, आयुष्यभर ज्या आरएसएसने स्व.गोपीनाथराव मुंडे यांना त्रास दिला, त्या आरएसएसची चमचेगिरी माझी बहीण करत आहे. ही निवडणूक सामान्य जनतेच्या प्रश्‍नांवर असून ज्यांना पैशाचा गर्व आणि घमेंड आहे त्यांच्या विरोधात ही निवडणूक आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*