दुधाला 5 ते 7 रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावे : आमदार बाळासाहेब थोरात

0
संगमनेर (प्रतिनिधी) – श्‍वेत क्रांतीमुळे महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असून दूध उत्पन्न वाढले आहे. सध्या खाजगी दूध संघ शेतकर्‍यांना कमी भाव देत असून सहकारी दूध संघ मात्र नियमाप्रमाणे भाव देत आहे. यामुळे दोन्ही संघांच्या विक्रीत मोठी तफावत होत असून अतिरिक्त दुधावर पर्याय म्हणून शासनाने प्रतिलीटर दुधाला किमान 5 ते 7 रुपये अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी माजी महसूल व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंती शताब्दी निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले, दूध व्यवसायाने ग्रामीण भागातील कौटुंबिक व अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. या दूध व्यवसायाला सरकारने पालकत्वाची भूमिका घेत मदतच केली पाहिजे. सध्या राज्यात दुधाचे उत्पादन वाढले आहे.
अशावेळी सध्या खाजगी दूध संघ मनमानीपणे 18 ते 19 रुपये भाव देत आहे. मात्र सहकारी दूध संघ शेतकर्‍यांना नियमाप्रमाणे भाव देतो. कमी भावामुळे खाजगी लोक कमी भावातच दूध विक्री करतात. त्यामुळे सहकारी दूध संघांच्या दुधाची विक्री कमी होते. यामुळे सहकारी दूध संघाची परिस्थिती अडचणीची झाली आहे. अशी स्थिती राहिल्यास सर्व सहकारी दूध संस्था मोडकळीस येतील. त्यांना जाणीवपूर्वक मदत करताना शासनाने प्रतिलिटर 5 ते 7 रुपये अनुदान दिले पाहिजे.
कोणताही अभ्यास न करता सरकार फक्त लोकप्रिय घोषणा करत आहेत. एकीकडे मेट्रोसारखे भव्य दिव्य उद्घाटने होत आहेत; परंतु राज्यात व देशात जनसामांन्यांच्या विकासाचे कोणतेही काम नाही. या मेट्रोत बसण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसे तर पाहिजे? म्हणून जो या मेट्रोने प्रवास करणार आहे, त्याची परिस्थिती कशी सुधारेल यासाठी काम करावे. तसेच सरकारने पालकाची भूमिका घेत अभ्यासपूर्ण मांडणी करावी.
मदत करणे शक्य नसेल तर सर्व शेतकरी, कामगार, राज्यातील जनता यांना विश्‍वासात घेऊन आम्ही मदत देऊ शकत नाही. विनाकारण अपेक्षा ठेवू नका असे खरे तरी सांगावे. मात्र फक्त फसव्या जाहिराती बंद करून थांबलेला विकास सुरू करत शेतकर्‍यांना मदत करावी. या सरकारच्या कोणत्याही आश्‍वासनांना निश्‍चित असा वेळ नाही असा टोला ही त्यांनी यावेळी भाजप सरकारला लगावला.

आघाडी सरकारच्या काळात ही अशा परिस्थितीत सरकारने दूध उत्पादकांना मदत केली होती. आज शेतकर्‍यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहे. भाजप सरकारने कर्जमाफीची जाहिरात मोठी केली; परंतु अजून कुणालाही कर्जमाफी मिळाली नाही. फक्त मी लाभार्थीच्या फसव्या जाहिराती सुरू आहेत. अनेक उद्योगपती, कारखानदार यांनाही सरकारने लाभ दिला. त्यांच्या पोटाला का लाभार्थीच्या पाट्या चिकटविल्या नाहीत? गरीब शेतकर्‍याला काहीही लाभ न देता मात्र त्यांच्या पोटाला लाभार्थीची पाटी चिकटवून जाहिरात करणे अत्यंत खेदजनक असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

LEAVE A REPLY

*