डॉ. सुजय विखे भाजपकडूनच खासदार होतील : आ.कर्डिले

0

करंजी (वार्ताहर)- आगामी काळात होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे हे भाजपच्या तिकीटावर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले तर निश्चित खासदार होतील असा विश्वास माजीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ आ.शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. 

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील एका कार्यक्रमप्रसंगी आ. कर्डिले व डॉ. सुजय विखे शुक्रवारी एकाच व्यासपिठावर आले असता या दोघांमध्ये नेहमीप्रमाणे रंगणारा राजकीय कलगीतुरा येथेही उपस्थितांना अनुभवायास मिळाला. यावेळी राष्ट्रीयसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झालेले आहे. विखे व आ. कर्डिले यांनी एकत्र लढविलेल्या राहुरी कारखाना व बाजार समित्यांच्या निवडणुकीमुळे कर्डिले व विखे यांची जवळीक लपून राहिलेली नाही. त्यातच भर म्हणून आ.कर्डिले यांनी अनेकवेळा विखेंना भाजपात येण्याची खुली ऑफर दिलेली आहे.

त्याचीच पुनरावृत्ती मिरी येथील एका खाजगी कार्यक्रमात पाहावयास मिळाली. डॉ.सुजय विखे हे भाजपकडूनच खासदार होतील असे वक्तव्य करत आमदार कर्डिले यांनी विखेंकडे कटाक्ष टाकताच विखे यांनी देखील स्मितहास्य करत कर्डिलेंच्या बोलण्याला मुकसंमती दिली की काय अशी चर्चा देखील उपस्थितांमध्ये रंगली.

यावर मी वैयक्तिक कोणत्याही पक्षाचा नसून वडील कॉँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते आहेत तर आई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असल्याने मी देखील काँग्रेसचा मानला जात आहे असे स्पष्टकरण देऊन डॉ.सुजय विखे यांनी आ. कर्डिले यांच्या वक्तव्यावर थेट बोलणे टाळले. माझे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत.

परंतु आ.कर्डिलेंची राहुरी कारखाना सुरू करण्यासाठी मला मोठी मदत झाल्याने आपल्याला त्यांच्याबद्दल वेगळा आदर असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.त्यामुळे आगामी काळात डॉ.सुजय विखे नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे .पण येणार्‍या विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये पक्ष बाजूला ठेऊन विखे व कर्डिलेंची युती पहायला मिळणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.

मी कोणत्याच पक्षाचा नाही : डॉ. सुजय विखे – माझ्या भाषणाच्या व्हिडिओ क्लिप थेट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींपर्यंत पोहोचल्या. पण आपण कधीही कोणत्याही पक्षाच्या अथवा व्यक्तीच्या विरोधात बोलत नसल्याने कुणावर काय कारवाई करायची करा असे मी कळवले, असेही डॉ. विखे यांनी म्हटले.

 

LEAVE A REPLY

*