मला जेलमध्ये घालण्यासाठी चार मंत्री नगरला मुक्कामी : आ. संग्राम जगताप

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून नगर शहराला विकासाकडे घेऊन जात असताना विरोधकांनी माझ्यासाठी चार मंत्र्यांना नगरात तळ ठोकायला लावला. त्यामुळे शहर विकास थांबला. विरोधकांनी हीच मंत्र्यांची ताकद विकास कामासाठी वापरली असती तर बरं झालं असतं, असा चिमटा काढत आमदार संग्राम जगताप यांनी विरोधकांवर प्रथमच तोफ डागली. दिल्लीगेट पटांगण परिसराचे डांबरीकरण स्वखर्चाने करण्याची घोषणाही त्यांनी केली.
दिल्लीगेट येथील जिव्हेश्‍वर जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार जगताप यांनी हा तोफगोळा डागला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिव्हेश्‍वर मंडळाचे अध्यक्ष संजय सांगावकर, माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव, महापालिकचे कॅफो प्रवीण मानकर, सारंग पंधाडे, दिलदारसिंग बीर, प्रा. अरविंद शिंदे, काशिनाथ झिकरे, अरविंद धिर्डे, अजय चितळे यावेळी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम मी करत होतो. त्यातून नगर शहर विकासाच्या वाटेवर धावण्यास सुरुवात झाली होती. मात्र विरोधकांना ते रुचले नाही. त्यांनी शहर विकासाच्या वाटेत काटे पेरण्याचे काम केले. त्याचे उत्तम उदाहरण दिल्लीगेटचे पटांगण. त्याचे काम आमदार निधीतून होण्यासाठी मी तीन वेळा निधी दिला होता. त्याचे टेेंडर देखील झाले होते. महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवक हे काम स्वेच्छा निधीतून व्हावे यासाठी हट्ट करून बसले. मात्र महापालिकेकडे पैसे नसल्यामुळे ठेकेदार टेंडर भरत नाही. त्यामुळे हे काम प्रलंबित आहे. मात्र आता हे काम स्वखर्चाने करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
सांगावकर म्हणाले, दिल्लीगेट येथील डांबरीकरणाचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी स्थानिक नागरिक आमदारांकडे पाठपुरवा करत होते. महापालिकेतील सत्ताधारी हे काम आमदार निधीतून होऊ नये म्हणून आडकाठी करीत राहिले.
त्यामुळेच दिल्लीगेट परिसर विकासापासून वंचित असल्याची भावना सागांवकर यांनी व्यक्त केली.
सचिन पावले, नितीन पावले, उमेश कोदे, युवराज मानकर, सचिन टोणपे, अजय सवई, योगेश मानकर, सागर सावेकर, मुकुंद सावेकर, राजेंद्र सवई, रोहित सावेकर, सचिन क्षीरसागर, धीरज पावले, विशाल सावेकर, सोमनाथ सवई, पीयूष मानकर, सौरभ सावेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*