Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मराठा व धनगर समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या – रोहित पवार

Share

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील अनेक तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यभरात वेगवेगळी आंदोलने केली. लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्रा महाजन या चौंडी येथे आल्या असता धनगर समाज बांधवांनी त्यांना आरक्षणाबाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी स्थानिक प्रशासनाने त्यांना सहकार्य केले नाही. उलट पोलिसांनी लाठीमार करून त्यांच्यावर 307, 120 ब, 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले. लोकशाहीच्या चौकटीत राहून त्यांनी ही आंदोलनं केली आहेत. त्यामुळे या आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत,अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आधीच्या सरकारने केवळ सूड भावनेने हे गुन्हे दाखल केले असून त्यात शिक्षण पूर्ण झालेले आणि नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍या तरुणांचाही समावेश आहे. पण गुन्हे दाखल झाल्यामुळे या तरुणांचे भविष्य कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. याबाबत राज्यातील वेगवेगळ्या भागातील मराठा व धनगर समाजातील तरुणांनी सामाजिक आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती.
नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असलेला चारित्र्याचा दाखला या युवकांना मिळत नसल्याने त्यांना नोकरी मिळणे कठीण बनले आहे.मराठा तसेच धनगर समाज बांधवांनी,तसेच विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याकरिता आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी असलेल्या विद्यार्थी तसेच इतर नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत तातडीने आदेश व्हावेत अशी मागणी आमदार पवार यांनी केली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी कायदेशीर बाबी तपासून मराठा व धनगर समाजातील तरुण आंदोलकांवरील हे गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांना दिले. यावेळी रोहित पवार यांनी पीएसआय,आरटीओ आणि फॉरेन्सिक लॅब कर्मचारी यांच्यासंदर्भातील अनेक विषयांवरही चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!