आमदार स्वीय सहाय्यकाचा जि.प. महिला कर्मचाऱ्याशी वाद; सीईओंना ई-निविदा कक्षात रोखले?
Share

नाशिक। प्रतिनिधी
ठेकेदार व कर्मचाऱ्यांच्या वादविवादाने कायमच चर्चेत असलेला जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.या विभागात जाऊन एका आमदार स्वीय सहाय्यकांने कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याची चर्चा जी.प.वर्तुळात चांगलीच रंगली.हा वाद विकोपाला गेल्याने विभागात एकच गर्दी झाली होती. अखेर हा वाद मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांच्यापर्यंत पोहचला.
गुरूवारी (दि.१) सकाळी एका आमदाराचे स्वीय सहाय्यक मतदारसंघातील कामांच्या मंजुर फाईलबाबत या विभागातील महिला कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. या संबंधित कर्मचाऱ्यांनी फाईलची रजिस्टरमध्ये नोंद होत असून नंतर या असे सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या स्वीयसहाय्यकांने संबंधित कर्मचाऱ्यांला तुम्ही कशाला वेतन घेता, काय काम करता असे सुनाविले.
त्यावर कर्मचारी व स्वीय सहाय्यक यांच्यात चांगलाच वाद झाला. दोघेही मोठमोठयाने वाद घालत असल्याने , विभागात कर्मचारी व ठेकेदारांची मोठी गर्दी झाली. या वादानंतर संबंधित स्वीय सहाय्यकांने यासंदर्भात उपाध्यक्ष नयना गावित यांच्याकडे धाव घेत तक्रार केली. याची दखल घेत, उपाध्यक्षा गावित यांनी तात्काळ संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून घेत, याबाबत जाब विचारला. उपाध्यक्षा गावित यांनी कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली.
हा वाद मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस यांच्यापर्यंत गेला. त्यानंतर भूवनेश्वरी यांनी बाँधकाम विभागाला भेट देत माहिती घेतली. विभागात ठेकेदारांनी गर्दी करण्याचे कारण त्यांनी विचारना केली. यापुढे विभागात ठेकेदारांची गर्दी होताकामा नये अशा सूचना विभागप्रमुखांना दिल्या.
सीईओंना ई-निविदा कक्षात रोखले
बांधकाम विभागाला भेटीनंतर भूवनेश्वरी एस यांनी नव्याने तयार केलेल्या ई-निविदा कक्षाला भेट दिली. त्यावेळी कक्षात ठेकेदारांची गर्दी होती अन कक्षाचा दरवाजा बंद होता. भूवनेश्वरी एस आल्याअसता, कर्मचाऱ्यांनी कक्षाचा दरवाजा देखील उघडला नाही. त्यावेळी त्यांना मागील बाजूने कक्षात जावे लागल्याचे समजते.