Type to search

ध्यास स्वप्नपूर्तीचा : पर्यटन हाच विकासाचा राजमार्ग

माझं नाशिक

ध्यास स्वप्नपूर्तीचा : पर्यटन हाच विकासाचा राजमार्ग

Share
महाराष्ट्राचे चेरापुंजी तसेच नंदनवन म्हणून इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याकडे पाहिले जाते. सह्याद्रीच्या डोंगर – दर्‍यांवर निसर्गाची मुक्त हस्ते उधळण झाली आहे. येथे पावसाळ्यात साधारण 2500 ते 3000 मि.मी. पाऊस पडतो. तसेच धरणांचा तालुका अशीही ओळख या तालुक्याल आहे. मात्र बहुतांश जमीन खडकाळ असल्याने आदिवासी शेतकर्‍यांना फारसा लाभ होत नाही. यामुळे तंत्रज्ञान व पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, आदिवसींचे स्थलांतर थांबविणे व यातून विकास हेच आपले ध्येय आहे.

निर्मला गावित, आमदार

इगतपुरी व त्र्यंबकेश्वर हे आदिवासी बहुल तालुके आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा व निसर्गताच निर्माण झालेली साठवण क्षमता यामुळे या परिसरात लहान-मोठी 50 धरणे आहेत. परंतु या धरणांचे पाणी आदिवासी बांधवांना वापरण्यावर निबर्र्ध आहेत. तसेच बहुतांश जमीन खडकाळ आहे. यामुळे पाणी टिकून राहत नसल्याने पावसाळा संपताच चार पाच महिन्यांत दुष्काळाच्या झळा सुरू होतात. यामध्ये आदिवासी बांधव होरपळत आले आहेत. दुर्गम वाडे-पाडे यामुळे विकासाला मोठी खीळ बसली होती. परंतु आपण प्रारंभ हा हे दुर्गम पाडे चांगल्या रस्त्यांनी जोडण्याचे काम हाती घेतले. चालू आर्थिक वर्षात आदिवासी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तालुक्यासाठी 257 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध केला आहे. आदिवासी असला तरी बहुतांश रस्ते चांगले झाल्याने दळणवळण होऊन आदिवासी पाडे एकमेकांना जोडले गेले आहेत. ठक्कर बाप्पा योजनेतून बहुतांश गावांअंतर्गत रस्ते काँक्रिटीकण, सभामंडप उपलब्ध केले आहेत. राज्य तसेच आमदार निधीतून कधीही वीज ना पाहिलेल्या आदिवासी पाड्यांवर सौरउर्जेवरील विद्युत पथदीप, हायमास्ट बसवून पाडे उजळवले आहेत.

राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 35 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. अनेक ठिकाणी जलसंधारण, सर्वाजनिक पाणी उपसा सिंचनयोजना राबविल्या, तसेच विविध योजनांतून जमीन सपाटीकरण, कृषी तंत्रज्ञान पुरविण्यावर भर देण्यात आला आहे.

घोटी शहर व पाणीप्रश्न हे गेल्या वीस वर्षांतील समीकरण होते. वाढती लोकसंख्या पाहता, गेल्या अनेक वर्षांपासूनचा पाणीप्रश्न प्रामाणिक प्रमत्नांमुळे सुटण्यास मदत झाली आहे, थेट भावली धरणातून जलशुद्धीकरण प्रकल्पासाहित तब्बल 16 कोटींची नवीन योजना मंजूर करून आगामी वीस वर्षांचे पाण्याचे नियोजन करण्यात यश आले आहे. शहरातील सार्वजनिक गटारी, तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या व 199 खेड्यांशी निगडीत असलेल्या घोटी बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सभामंडप, सामाजिक सभागृह, तरुणवर्गाची व्यायामाची आवड लक्षात घेऊन व्यायामाचे साहित्य दिले गेले. जातीय सलोखा राखला जाऊन विकास हा सर्व घटकांपर्यंत पोहोचवावा या हेतूने प्रयत्न सुरू आहेत.

आदिवासी बहूल बर्‍याच गावांमध्ये डिसेंबर महिना संपला की, पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था या धरणाच्या तालुक्याची होती. यावर ठोस उपाययोजना करण्याचे आम्ही ठरवले व आदिवासी विकास विभागामार्फत उपसा जलसिंचन योजना आमच्याकडे राबवण्यात आली. त्यामुळे जवळजवळ साडेबाराशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. शंभर टक्के अनुदानावर केलेल्या या योजनेचा फायदा चार ते पाच गावांतील सहाशे कुटुंबांना होतोय. याचा परिणाम आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत झाली व आमच्या शेतातील कारले, काकडी, भेंडी, टोमॅटो असा शेतमाल जेव्हा परदेशात निर्यात होऊ लागला आहे. शेती हे समृद्धीचे खरेखुरे प्रतीक ठरू शकते.

आधुनिक तंत्रज्ञानाची मदत तसेच विविध आव्हाने स्वीकारून शेती व्यवसाय केल्यास तालुक्यात कृषीक्षेत्र समृद्ध होईल. कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल याचा विचार केल्यास हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. किमान जमीन, पाणी आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देणार्‍या पिकांच्या जाती विकसित व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतीला कुक्कुटपालन, फलोत्पादन, फूलशेती शेळीपालन या पूरक धंद्यांचीही जोड शेतकर्‍यांनी दिली जावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बांबू कलस्टर द्वारे आदिवासींच्या कलांना व्यासपीठ उपलब्ध करून जंगलातच रोजगार निर्मिती, वाडी प्रोजेक्टद्वारे विविध ठिकाणी काजू प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. यामुळे कोकणनंतर आपल्या येथील काजू सर्व बाजारपेठांमध्ये दिसेल.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यांना निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. तसेच बाराज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरसह अनेक तीर्थक्षेत्रे या जिल्ह्यात आहेत. याचा उपयोग करून पर्यटन विकासाला चालना देण्यावर आमचा भर राहिला आहे. भंडारदरा हे पर्यटनस्थळ मुंबईपासून 163 कि.मी. अंतरावर आहे. तेथे येणार्‍या पर्यटकांना इतर ठिकाणीही कसे आकर्षित करता येईल; यासाठी भावली धरण भागात या मार्गावर इगतपुरीपासून फक्त 5 कि.मी. अंतरावर 30 एकर जमीन पर्यटन विकास महामंडळाकडे उपलब्ध आहे. कसारा घाटापासून जव्हारकडे जाणार्‍या मार्गावर नहार फाटा विहितगाव येथील अशोका धबधबा पर्यटकांचा आकर्षणाचा बिंदू होऊ शकतो.

सध्या या ठिकाणी शनिवारी व रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. वैतरणा धरण मुंबई-आग्रा महामार्गापासून फक्त 18 कि.मी. अंतरावर आहे. येथे 50 ते 100 एकर शासकीय जमीन पर्यटनासाठी उपलब्ध होऊ शकते. भावली व भंडारदरा धरणातील अंतर 40 कि.मी. आहे. भंडारदरा ते शिर्डी अंतर 110 कि.मी. आहे. घोटी शहरापासून ट्रिंगलवाडी साधारण 10 कि.मी. अंतरावर असून तेथे जैन लेणी व ट्रिंगलवाडी किल्ला येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. शिर्डी ते त्र्यंबकेश्वर हा नुकताच राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर झाला आहे. त्यामुळे येथे पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाचा उत्तम प्रकारे विकास होऊ शकतो.

ही सर्व ठिकाणे ही अंदाजे 100 ते 150 कि.मी. परिसरातील असल्याने या ठिकाणी उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्यास पर्यटकांचा ओघ त्या भागाकडे प्रचंड प्रमाणात येईल. सर्व प्रकारच्या पर्यटकांच्या दृष्टीने इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ राहील, याची मला खात्री आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटातील जव्हार फाटा ते वैतरणा नदीपर्यंत रस्ता रूंद करून अशोका धबधब्याजवळ पर्यटनस्थळ विकसित करणे.

याच ठिकाणी मध्य वैतरणा धरण आहे. भावली धरणावर जलसंपदा विभागाने महामंडळाकडे वर्ग केलेल्या जमिनीवर अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ उभारणे, अपर वैतरणा धरणाकडे अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहाच्या जागेवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे जमीन वर्ग करून अत्याधुनिक पर्यटनस्थळ विकसित करणे तसेच वैतरणा धरणाच्या फुगवट्यात जवळपास 100 एकर जमीन आहे. ती विकसित केल्यास पर्यटनासाठी अत्यंत निसर्गरम्य परिसर बनेल. ही पर्यटन केंद्रे विकसित झाल्यास इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी जनतेस रोजगार निर्मितीचा फायदा होईल व जनतेला पर्यटनाचा आनंद उपभोगता येईल.

नाशिक बरोबरच 12 वर्षांनी कावनई या तीर्थक्षेत्रावर कुंभमेळा भरतो. वर्षभर येथे दर्शनाला येणार्‍या भाविकांची संख्याही मोठी आहे. यासह सर्वतीर्थ टाकेद येथेही मोठी गर्दी असते. या क्षेत्रांचा पर्यटन विकासाच्या माध्यमातून मजबूत रस्ते, पर्यटकांना राहण्याच्या सुविधा, उपबल्ध करण्याचा प्रयत्न असल्याने ते विकसनशील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!