Type to search

Featured सार्वमत

आजी-माजी आमदारांना एमआयडीसी विकासाचा उमाळा

Share

आ. जगताप यांच्या ‘आयटी’ बॉम्बनंतर राठोड यांनीही घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतर एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी आता आजी-माजी आमदारांमध्ये स्पर्धा रंगली आहे. गेले वीस वर्षे धूळखात पडलेल्या आयटी पार्क इमारतीमध्ये सात ते आठ आयटी कंपन्या येणार असल्याचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी जाहीर करताच शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांनी थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत एमआयडीसीमध्ये नवीन कंपन्या सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली.

एमआयडीसीमध्ये असलेल्या एकूण कारखान्यांपैकी काही कारखाने आजारी आहेत. काही कारखाने कामगार संघटनांचे कारण देऊन बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकड़े एमआयडीसी विस्तारीकरणास जागा मिळत नसल्याचा तक्रारीचा सूर असताना दुसरीकडे आहे त्या कंपन्या कशा थांबवायच्या असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मोठ्या कंपन्या हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढ्याच असल्याने रोजगारासाठी नगरमधील युवकांना पुणे, मुंबई, नाशिक आणि औरंगाबादवर अवलंबून राहावे लागत आहे. राज्यात आयटी कंपन्या सुरू होऊ लागल्यानंतर येथील एमआयडीसीमध्येही अशा कंपन्या सुरू व्हाव्यात, यासाठी वीस वर्षांपूर्वी काहींनी प्रयत्न करण्यास सुरूवात केली. त्यास 2000 साली यश येऊन एमआयडीसीमध्ये आयटी पार्कसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली.

तत्कालीन उद्योगमंत्री (कै.) पतंगराव कदम यांच्याहस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले. त्यावेळी झालेली भाषणे पाहता नगरला आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात येतील, असा भास निर्माण झाला. मात्र आयटी कंपन्या पुण्याच्या बाहेर पडायला तयार नव्हत्या. आयटी पार्कसाठी इमारत उभी केली तरी त्यावेळी या कंपन्यांसाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नव्हते. शिवाय कामगार संघटना व सतत अशांतता यामुळे नगरला नवीन कंपन्या येण्यास तयार नसल्याचेही त्यावेळी राजकारण्यांकडून सांगण्यात येत असे. आयटी कंपन्या येतच नाहीत, म्हणून काही वर्षांपूर्वी या इमारतीचे पर्पज (वापराचे कारण) बदलण्यात आले. त्यानंतर या इमारतीतील गाळे निविदाद्वारे देण्यात आले.

आता याच इमारतीमध्ये सात ते आठ आयटी कंपन्या येणार असल्याचे आ. जगताप यांनी जाहीर केले. कोणत्या कंपन्या येणार, याबाबत मात्र त्यांनीही काहीही सांगितले नाही. पुढील आठवड्यात जॉब फेअर (नोकर भरती) आणि महिनाभरात कंपन्यांचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रक्रिया एवढ्या वेगाने होऊ शकेल, यावर नगरच्या काही उद्योजकांना शंका आहे. मात्र आ. जगताप यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता एमआयडीसीच्या विकासासाठी राज्य व केंद्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेनेही पुढाकार घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयडीसी विकासाचा आलेला हा उमाळा पाहून बेरोजगारांनाही हायसे वाटले आहे. आ. राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने गुरूवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी साकडे घातले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यांना यासाठी आश्‍वासन देत आगामी निवडणुकीत रंग भरला आहे.

शहर विकासासाठी निधीचीही मागणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेची सत्ता असताना दहा कोटी रुपये विशेष निधी म्हणून महापालिकेला दिले आहेत. त्यातील कामे अद्याप सुरू व्हायची आहेत. जी कामे करण्यात येणार आहेत, त्यासाठी आणखी दोन कोटींची गरज आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, यासाठीही राठोड यांनी ही भेट घेतली आहे. यासह इतर कामांसाठीही निधीची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!