महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वरिष्ठ न्यायालयात जलदगतीने सुनावणी व्हावी : आमदार नीलम गोर्‍हे

0
नगरच्या कौटुंबीक न्यायालयात लक्ष घालण्याचे आश्‍वासन
अहमदनगर (प्रतिनिधी) – महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन शिक्षा झाल्यानंतर आरोपी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अपील करतात. याठिकाणी सुनावणी उशीरा होत असल्याने आरोपींच्या शिक्षेला विलंब होतोे, वरीष्ठ न्यायालयातही जलदगती (फास्ट ट्रॅक) सुनावणी व्हावी, अशी अपेक्षा शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी नगरमध्ये व्यक्त केली.
नगरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आ. गोर्‍हे बोलत होत्या. 2001 मध्ये घडलेल्या कोठेवाडी प्रकरणात आरोपींना 13 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयात शिक्षा झाली. या प्रकरणात जिल्हा पातळीवर 5 वर्षांत शिक्षेवर शिक्कामोर्तब झाला होता. यामुळे वरिष्ठ न्यायालयातही महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत जलद गतीने सुनावणी होऊन आरोपींना शिक्षका व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संरक्षण विभागातील महिलांवर नागरिकांकडून अत्याचार झाल्यावर पीडितेला वैद्यकीय सुट्टी मिळत नाही. त्यामुळे संरक्षण खात्यासह सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत अत्याचारात शारीरिक दुखापत झालेल्या पीडितांना रजा आणि अन्य वैद्यकीय सेवा मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. हा विषय केंद्र सरकारशी निगडीत असून सेनेच्या खासदारामार्फंत त्यावर आवाज उठवण्यात येणार आहे.
पोक्सो न्यायालयात लहान मुले आणि मुलींना अश्वासक वातावरण असावे, यासाठी बालकांची व्हिडिओ कॉन्फरन्सने साक्ष होण्याची गरज आहे. याकडे न्यायव्यवस्थेने लक्ष देणे आवश्यक आहे. राज्यात 2014 पूर्वी गुन्हेगारी घटनांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण अवघे साडेतीन टक्के होते़ सध्या मात्र हे प्रमाण 57 टक्के आहे़ पोलिसांनी संवेदनशीलपणे काम केले तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल़ पीडित महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत़, असे आवाहन गोर्‍हे यांनी यावेळी केले़.
महिलांच्या समस्येवर सभागृहात महिला आमदार कमी असून मी एकटे पडली आहे. महिला आमदारांनी या विषयावर सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. सरकारच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे गंभीरतेने पाहण्याच्या दृष्टीकोनाचा अभाव आहे. सरकारला बुलेट ट्रेनला पैसा आहे. मात्र महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नगर येथे कौटुंबीक न्यायालयाचे कामकाज तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे गोर्‍हे यांनी सांगितले.

सरकारी वकिलाची मागणी करणार –
नगर येथील रेल्वेस्टेशनवर अडीच वर्षांच्या बालिकेवर अत्याचाराची घटना घडली होती़ याबाबत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे़ हा खटला प्रभावीपणे लढवून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष सरकारी वकिल देण्याची मागणी करणार आहे, असे आ. गोर्‍हे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

*