छगन भुजबळ म्हणतात, मला सर्वात आधी येवल्यात जायचंय

0

येवला | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि येवला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांच्या सुटकेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर अनेक नेते भुजबळांच्या भेटीसाठी मुंबई गाठत आहेत.

नाशिकमध्येही भुजबळांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र भुजबळांना स्वादुपिंडाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना पुढील काही दिवस मुंबईत थांबावे लागणार आहे. तसेच भुजबळ कुटुंबियांकडून स्वागताची तयारी न करण्याचे सांगितल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्यात आले असून त्यांचे स्वागत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.

आज येवल्याहून भुजबळांचे स्वीय सहाय्यक सुनील पैठणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, महानंदचे संचालक सुभाष निकम व अनिल निकम यांनी भुजबळांची मुंबईत भेट घेत तब्बेतीची विचारपूस केली.

याप्रसंगी चर्चा करत असताना भुजबळ म्हणाले, मला सर्वात आधी माझ्या येवल्यात जायचंय, तिथल्या जनतेशी संवाद साधायचा आहे. मुंबईत दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन भुजबळ लवकरच येवल्यात दाखल होतील अशी माहितीदेखील देण्यात आली आहे.

भुजबळांची भेट घेणे आता शक्य आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नेते मंडळी भुजबळांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे कूच करत आहेत.

सोशल मीडियात भुजबळांच्या भेटीचे अनेक छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर काहीशा प्रमाणात फोटो काढण्यासाठी मनाई करण्यात आल्याचेही समजते आहे.

भुजबळ कारागृहात असतानादेखील त्यांनी अनेक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून येवला तालुक्यातील विकासावर गदा येऊ दिली नाही. ते कारागृहात असतानाही अनेक कामे याठिकाणी मंजूर झाली आहेत याबाबतची माहितीही वेळोवेळी त्यांच्या स्वीय सहायकांकडून देण्यात येत होत्या.

येवल्यातील जनता भुजबळांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत 

मुंबईत जाऊन साहेबांची भेट घेऊ शकत नाही, पण साहेब आल्यानंतर आधी त्यांना भेटणार. साहेब कारागृहात असतानाही येवल्याच्या समस्यांवर स्वतः लक्ष घालत होते. साहेबांची प्रकृती लवकरात लवकर चांगली होवो. अशी प्रार्थना येवलावासीय करत असून साहेबांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात असल्याची माहिती एका भुजबळ समर्थकाने ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

*