नाशिक | देशाचे माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, जाणता राजा खा. शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी ‘देशदूत’साठी लिहिलेला खास ब्लॉग…

सन 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून एकापाठोपाठ एक असे पुरोगामी विचारसरणीचे आणि कर्तबगार मुख्यमंत्री या राज्याला लाभले.

श्री. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने विविध क्षेत्रांतील राज्याच्या प्रगतीचा पाया घातला. राज्याच्या विकासाचा एक रोडमॅप त्यांनी आखून दिला. पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांनी त्या रोडमॅपचा पुढे विस्तार केला आणि महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा अधिक बळकट केली.

याच परंपरेचे एक महान पाईक असलेल्या श्री. शरद पवार यांना स्व. यशवंतराव चव्हाण यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेला होता. त्यांच्याच आशिर्वादाने पवार साहेबांनी राज्यातील सर्वसामान्य  जनतेच्या भल्यासाठी राजकारण आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीच्या उत्थानाची सुरवात केली.

समाज मनाची नेमकी जाण असलेल्या या नेत्याने शेतकरी, कष्टकरी, दलित, शेतमजूर, दुर्बल, मागासवर्गीय, उपेक्षित अशा वंचितांच्या उत्थानासाठी स्वतःला वाहून घेतले. राज्यातील इतर मागासवर्गीय असोत, किंवा राज्याची परंपरागत कला जोपासणारे आराधी, गोंदळी, वाघ्या-मुरळी असोत; या सर्वांना या राज्याच्या, या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, हलाखीच्या परिस्थितीत त्यांना दिलासादेणारे निर्णय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांना त्यांनी उद्युक्त केले.

पवार साहेबांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी समाजातील हे सर्व तळागाळातील घटक आहेत, म्हणूनच त्यांचेराजकारण सर्वांपेक्षा वेगळे आहे. जातिधर्मांच्या पलिकडे जाऊन काम करण्याच्या त्यांच्या गुणामुळेच ते जसे सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत, तसेच उच्चभ्रू वर्तुळातहीत्यांना मान दिला जातो.

कोरडवाहू व पडिक जमिनीवर फळबाग लागवड करण्याच्या निर्णयातून पवार साहेबांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. विशेषतः अनुसूचित जाती-जमाती, नवबौद्ध, भटक्या जमाती, अल्प तसेच अत्यल्प भूधारक यांना या योजनेसाठी त्यांनी प्रोत्साहित केले. राज्याच्या अनेक दुष्काळी जिल्ह्यांमध्ये आज मोठ्या प्रमाणात फलोत्पादन घेतले जात आहे.

शेकडो एकर पडीक जमीन फळबाग लागवडीखाली आली आहे. आजही शेतकऱ्यांचे हित जपण्यास त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. म्हणूनच राज्यातीलच नव्हे तरदेशातील शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखण्यासाठी त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री या नात्याने सुमारे 71 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देशातील शेतकऱ्यांना दिले.

राज्याचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, त्याचबरोबर निर्णयप्रक्रियेत खऱ्याखुऱ्या लाभार्थींना सामील करून घेतलेपाहिजे, हा स्व. यशवंतराव चव्हाण यांचा विचार समोर ठेवून पवार साहेबांनी या सत्तेच्या विकेंद्रीकरणाला अधिक व्यापक स्वरुप दिले.

निर्णयप्रक्रियेत महिला तसेचमागासवर्गीयांना सामावून घेण्यासाठी या दोन्ही वर्गांसाठी आरक्षण लागू केले. त्यामुळे आज सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये या दोन्ही वर्गांना आपल्याआशा-आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हक्काचे स्थान मिळाले आहे.

माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांनी पूर्वीच ओळखले होते. भारतासारख्या गरीब देशातील अन्नधान्याच्या कमतरतेची समस्या सोडविण्याबरोबरच कृषीक्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवून आणण्याची क्षमता जैवतंत्रज्ञानात असल्याचे त्यांनी हेरले.

जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांची फळी घडविण्यासाठी ते कार्यरत आहेत. महाराष्ट्राची खडान्‌खडा माहिती असणारे पवार साहेब म्हणजे राज्याच्या राजकारणातील प्राण आहेत. खेडोपाड्यातल्या आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही नावानिशी ओळखणारा असा हा एकमेव नेता आहे.

आत्यंतिक परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न, विकासाची तळमळ आणि जिद्द हे त्यांचे स्थायीभाव आहेत. पराकोटीचा संयम हीतर त्यांची ख्यातीच आहे. कोणी कितीही तुटून पडाल, कितीही कडवट टीका झाली, तरीसुद्धा त्यांच्या मनावरील ताबा कधीही सुटला नाही, किंवा संयम ढळला नाही.

राज्याच्या क्रीडा क्षेत्राविषयी सुद्धा पवार साहेबांना खूप आपुलकी आहे. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात मल्लखांब, कुस्ती, कबड्डी, खो-खो यासारख्या इथल्यामातीतल्या खेळांना आणि खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना करून त्यांनी राज्याच्या क्रीडा विकासाला नवी दिशा दिली.

निरनिराळ्या क्षेत्रांतील व्यक्तींची, संशोधनाची अद्ययावत माहिती ठेवणे ही पवार साहेबांची खासियत आहे. या माहितीचा उपयोग ते सभांमधून जनसामान्यांचे प्रबोधनकरण्यासाठी करतात. देशपातळीवरील राजकारणात तसेच उद्योग, शिक्षण, कृषी, सहकार अशा विविध क्षेत्रांतील अद्ययावत माहितीचा खजिनाच त्यांच्याकडे असतो. याखजिन्यामुळे त्यांच्या उपस्थितीत झालेल्या अनेक बैठकांमध्ये भल्याभल्यांची दांडी उडालेली मी पाहिली आहे.

शरद पवार साहेबांच्या परीस स्पर्शाने अनेकांच्या जीवनाचे अक्षरशः सोने झाले आहे. त्यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन ज्या ज्या व्यक्तींना लाभले, ते राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग असे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसते.

व्यक्तिशः पवार साहेबांबद्दल माझ्या मनात नेहमीच एक आगळावेगळा आदर राहिला आहे. एक दूरदृष्टीचा, व्यापक सामाजिक न्यायाची भूमिका जोपासणारा आणि राज्याच्या, समाजाच्या सर्वंकष विकासासाठी झटणारा नेता म्हणून मी त्यांच्याकडे नेहमीच पाहतो.

पवार साहेबांनीसुद्धा पक्षीय आणि राजकीय भाग बाजूला ठेवून, मी ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी अंगिकारलेल्या सामाजिक कार्याला अगदी मनापासून पाठिंबा दिला आहे. केवळ पाठिंबा देऊन ते थांबले नाहीत, तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सभांमध्ये व्यासपीठावर उपस्थित राहून ओबीसी बांधवांना मोलाचे मार्गदर्शनही त्यांनी केले आहे. ओबीसी जनगणनेच्या मुद्यावर संसदेमध्येजनमत संघटित करण्याच्या कामीही शरद पवार साहेबांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.

आज वयाच्या सत्तरीतही तरुणालाही लाजवेल, अशा उत्साहाने पवार साहेब रात्रंदिवस काम करत असलेले दिसतात. शरद पवार साहेब म्हणजे राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या युवकांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभच आहेत.

फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा उदात्त आणि थोर सामाजिक दृष्टीकोन असणारा मुत्सद्दी नेता लाभला, ही बाब अभिमानास्पद आहे. त्यांना दीर्घार्युरारोग्य लाभो, हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

– छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य 

LEAVE A REPLY

*